
मडगाव: ७९ वा गाेवा क्रांतीदिन सोहळा काल होऊन ८०व्या वर्षात पदार्पण होत असताना याच संदर्भात आता एका नव्या चर्चेने वेग घेतला आहे. गोवा क्रांती दिवसाची तयारी करण्यासाठी डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेले डॉ. ज्युलियांव मिनेझिस यांच्या कार्याची गोवा सरकारने आतापर्यंत योग्य ती दखल घेतलेली नाही, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी डॉ. मिनेझिस यांच्या असोळणा येथील घराला भेट दिली होती. तेव्हा स्थानिकांनी राज्यपालांकडे चर्चा करताना, असाेळणा गावातही गोवा क्रांती दिन शासकीय पातळीवर साजरा व्हावा आणि डॉ. ज्युलियांव मिनेझिस यांच्या कार्याची शासनाने योग्य ती दखल घ्यावी, वस्तुसंग्रहालय उभारावे, अशी मागणी केली.
असोळणा आणि कुंकळ्ळीवासीयांच्या या मागणीला आता काही नेते आणि अभ्यासकांचाही पाठिंबा मिळत असून डॉ. लोहियांच्या प्रभावाखाली डॉ. मिनेझिस यांचे कार्य दुर्लक्षित झाले का, असा प्रश्न विचारला जात आहे.
गोवा स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाई यांनी सांगितले, डॉ. लोहियांचे कार्य फार मोठे असले तरी डाॅ. मिनेझिस यांचेही कार्य त्याच तोलामोलाचे आहे. मात्र, साजेशी पावती त्यांना मिळालीच नाही. ते म्हणाले, डॉ. लोहिया यांनी मडगावच्या खुल्या मैदानात येऊन भाषणबंदीचा हुकूम मोडून धैर्याचे कृत्य केले, तरी लोहियांसारख्या नेत्याला आपल्या घरी बोलावून डॉ. मिनेझिस यांनीही तेवढेच मोठे धाडस केले होते. त्यासाठी त्यांना अटकही होऊ शकली असती.
इतिहास अभ्यासक डाॅ. प्रजल साखरदांडे म्हणाले, गोवा क्रांती दिनाचे खरे खुरे प्रवर्तक जर कुणी असतील तर ते डॉ. मिनेझिस हेच. मात्र लोहियांच्या प्रभावामुळे त्यांचे कार्य झाकोळले गेले, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.
डॉ. नंदकुमार कामत म्हणाले , डॉ. मिनेझिस यांच्या घराचे स्मारक म्हणून जतन करण्याची गरज असून इतर नेत्यांप्रमाणे ज्युलियांव मिनेझिस यांचीही जयंती आणि पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करण्याची गरज आहे. मी स्वत: यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे.आमदार क्रूझ सिल्वा म्हणाले, डॉ. मिनेझिस यांचे असोळणेतील घर हे गोेवा मुक्ती चळवळीतील एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे त्याचे संवर्धन करून स्मारकात रूपांतर करण्याची गरज आहे.
मुक्ती चळवळीचा आढावा घेतल्यास कित्येक ज्येष्ठ नेत्यांच्या कार्याची याेग्य ती दखल घेतली नाही, असे म्हणावे लागेल आणि यात टी.बी. कुन्हा आणि पीटर आल्वारिस यासारख्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचाही समावेश करता येईल. स्वातंत्र्य सैनिकांतील अंतर्गत राजकारण आणि गोवा मुक्तीनंतर सत्तेवर आलेली सरकारे यांनी मुद्दामहून दाखविलेली अनास्था त्याला कारणीभूत आहे. गोवा स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे सरचिटणीस संदेश प्रभूदेसाई यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.