
मडगाव: काही वास्तू ऐतिहासिक घटनांच्या साक्षीदार असतात. असोळणा येथील मिनेझिस मेन्शन या घरालाही हे भाग्य लाभले आहे. या घरातील एका दालनात गोव्याच्या क्रांती पर्वाची बिजे रोवली गेली होती. मडगावातील ऐतिहासिक अशा १८ जून १९४६ च्या सभेची सर्व तयारी याच दालनात बसून डॉ. राम मनोहर लोहिया आणि डॉ. ज्युलियांव मिनेझिस यांनी केली हाेती.
१८ जून राेजी याच दालनाला राज्यपाल श्रीधरन पिल्लई हे भेट देणार असून त्यामुळे या दालनाला अधिकच उजाळा मिळणार आहे.
८० व्या क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येस आज ‘टीम गोमन्तक’ने या ऐतिहासिक वास्तूला भेट दिली. या घरातील त्या दालनात प्रवेश केल्यावर तिथे टेबलवर ठेवलेल्या डाॅ. लाेहिया आणि डॉ. मिनेझिस यांच्या तसबिरींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एकेकाळी ज्या दालनात या ऐतिहासिक घटना घडल्या, त्याच दालनात आम्ही प्रत्यक्ष उभे आहोत, ही भावनाच एकप्रकारे चैतन्य निर्माण करणारी होती.
याच दालनात एकेकाळी ॲड. जुझे इनासियो द लॉयोल, पुरुषोत्तम काकोडकर आणि अशा अनेक राष्ट्रवादी विचारांच्या नेत्यांनी डॉ. लोहिया यांची भेट घेतली आणि याच दालनात १८ जूनच्या त्या ऐतिहासिक आंदोलनाचा निर्णय पक्का झाला.
क्रांती पर्वाची साक्ष देणाऱ्या या मेन्शनमध्ये सध्या डॉ. मिनेझिस यांचे पुतणे रवी हे रहातात. त्यांनीच या घराची उत्तमप्रकारे देखभाल केली आहे.
रवी म्हणतात, ही ऐतिहासिक घटना घडल्यानंतर दहा वर्षांनी माझा जन्म झाला. त्यावेळी या दालनात नेमके काय झाले, याचा जरी मी प्रत्यक्ष साक्षीदार नसलो तरी माझे मुंबईत रहाणारे काका (डॉ. ज्युलियांव) हे मे महिन्यात येथे यायचे. त्यावेळी मी त्यांच्या तोंडून या घटना ऐकल्या आहेत. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांकडूनही या गोष्टी मी ऐकल्या आहेत.
इतिहास संशाेधक असलेल्या केपे शासकीय महाविद्यालयातील निवृत्त व्याख्यात्या प्रा. सुशिला मेंडीस याही ‘टीम गोमन्तक’सोबत होत्या. त्या म्हणाल्या, डॉ. लोहिया हे विश्रांतीसाठी गोव्यात आले, असे जरी म्हटले जात असले तरी ‘विश्रांती’ हा शब्द लोहियांच्या शब्दकोशात नव्हताच मुळी.
त्यामुळे त्यांनी ही गोवा भेट मनात काहीतरी ठरवूनच घेतली असावी, असे मला वाटते. ९ जून १९४६ रोजी डॉ. लाेहिया गोव्यात येण्यासाठी बाहेर पडले होते. त्यावेळी त्यांना मुंबईच्या रेल्वे स्थानकावर निरोप देण्यासाठी प्रा. मेंडीस यांचे वडील आणि आई उपस्थित होते.
मात्र, १८ जून १९४६ रोजी मडगावात भाषणबंदीचा हुकूम मोडण्यासाठी जी सभा घ्यायची ठरली, तो निर्णय मात्र याच मिनेझिस मेन्शनच्या त्या दालनात घेतला गेला. त्यामुळे अजूनही त्या दालनात डॉ. लोहिया आणि डॉ. मिनेझिस यांच्या तसबिरी ठेवल्या आहेत. डॉ. मिनेझिस यांचे छोटे बंधू राॅक मिनेझिस हेही गोवा मुक्ती चळवळीत सक्रिय होते. या दोन्ही बंधूंचेही फोटो दुसऱ्या एका दालनात ठेवले असून याच दालनात डॉ. मिनेझिस यांचे आई-वडील मारिया साल्वासांव आणि जेफरिनो यांचेही एकत्रित छायाचित्र लोकांचे लक्ष वेधून घेते.
डॉ. लोहिया आणि डॉ. मिनेझिस हे बर्लिनमध्ये शिकताना त्यांची एकमेकांशी मैत्री झाली होती. ही मैत्री शेवटपर्यंत कायम राहिली. भारत छोडो आंदोलनात त्यावेळी सक्रिय असलेले डॉ. लोहिया हे विश्रांती घेण्यासाठी असाेळण्यात आपल्या मित्राकडे आले आणि त्यांची ही गोवा भेट गोव्याच्या इतिहासाला कलाटणी देणारी ठरली.
लोहियांनी बदलली राहण्याची ठिकाणे: प्रा. मेंडीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. लाेहिया यांचे गोव्यात वास्तव्य ९ दिवस होते. या दिवसांत त्यांनी मडगाव, वास्को, पणजी अशा ठिकाणांना भेट देऊन मुक्ती चळवळीतील कार्यकर्त्यांची भेट घेतली. डॉ. लोहिया हे असोळण्यात थांबलेत, अशी माहिती मिळाली असती तर पोलिसांनी त्यांना अटक केली असती. अटक होऊ नये, यासाठीच डॉ. लोहिया यांनी ठिकाणे वेळोवेळी बदलली असावीत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.