यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत समुद्रात साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा २२ वेळा उसळण्याची शक्यता आपत्कालीन विभागाने व्यक्त केली आहे.
त्यामुळे हे दिवस धोक्याचे असून मोठ्या भरतीच्या दिवसांत नागरिकांनी विशेषत: पणजीवासीयांनी काळजी घेण्याचे आवाहन येत्या काही दिवसांत केले जाणार आहे.
जून महिन्यातील सात दिवस, जुलै महिन्यातील चार दिवस, ऑगस्ट महिन्यातील पाच दिवस व सप्टेंबर महिन्यातील सहा दिवस धोक्याचे ठरू शकतात. यापैकी सर्वाधिक उंच लाटा या २० सप्टेंबरला मध्यरात्री एक वाजून तीन मिनिटांनी उसळणार आहेत. या लाटांची उंची ४.८४ मीटर एवढी असेल, अशी माहिती आपत्कालीन यंत्रणेकडून मिळाली.
मोठ्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले जाणार आहे. त्यासाठी कोणती काळजी घेतली जाऊ शकते, याची माहिती संकलित केली जातेय. पणजी शहराचा बहुतांश भाग हा भराव घालून तयार करण्यात आला आहे.
त्यामुळे मांडवी नदीच्या पात्रातील पाण्यापेक्षा शहर केवळ मीटरभर उंचीवर आहे. पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी किमान दोन ते अडीच फुटाने वाढते.
भरतीवेळी ही पातळी पणजीच्या बरोबरीची असते. त्यामुळे भरतीवेळीच जर जोरदार पाऊस पडला तर पणजीत पाणी तुंबण्याची भीती आहे. ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत पोर्तुगीजकालीन पाणी निचरा व्यवस्था सुरळीत करण्यात येत आहे.
पूर्वी नाले असलेल्या जागी आता रस्ते बांधण्यात आले आहेत. साहजिकच पूर्वीची निचरा व्यवस्था पूर्ववत करणे कोणत्याही यंत्रणेला शक्य होणार नाही. म्हणूनच पावसाळ्यात पूर नियंत्रण यंत्रणेचा कस लागणार आहे.
मोठ्या लाटा कधी उसळणार?
महिना : जून
वार तारीख वेळ उंची (मीटरमध्ये)
बुधवार ५ सकाळी ११.१७ मि. ४.६१
गुरुवार ६ दुपारी १२.०५ मि. ४.६९
शुक्रवार ७ दुपारी १२.५० मि. ४.६७
शनिवार ८ दुपारी ०१.३४ मि. ४.५८
रविवार २३ दुपारी ०१.०९ मि. ४.५१
सोमवार २४ दुपारी ०१.५३ मि. ४.५४
मंगळवार २५ दुपारी ०२.३६ मि. ४.५३
महिना : जुलै
सोमवार २२ दुपारी १२.५० मि. ४.५९
मंगळवार २३ दुपारी १.२९ मि. ४.६९
बुधवार २४ दुपारी २.११ मि. ४.७२
गुरुवार २५ दुपारी २.५१ मि. ४.६४
महिना : ऑगस्ट
सोमवार १९ सकाळी ११.४५ मि. ४.५१
मंगळवार २० दुपारी १२.२२ मि. ४.७०
बुधवार २१ दुपारी १२.५७ मि. ४.८१
गुरुवार २२ दुपारी १.३५ मि. ४.८०
शुक्रवार २३ दुपारी २.१५ मि. ४.६५
महिना : सप्टेंबर
मंगळवार १७ सकाळी ११.१४ मि. ४.५४
बुधवार १८ - सकाळी ११.५० मि. ४.७२
गुरुवार १९ - मध्यरात्री ००.१९ मि. ४.६९, दुपारी १२.२४ मि. ४.७८
शुक्रवार २० - मध्यरात्री १.०३ मि. ४.८४, दुपारी १.०२ मि. ४.७०
शनिवार २१ - मध्यरात्री १.४७ मि. ४.८२, दुपारी १.४२ मि. ४.५०
रविवार २२ - मध्यरात्री २.३३ मि. ४.६४
लाटांची सर्वसाधारण उंची व पडणारा पाऊस गृहीत धरून पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था केली आहे. मोठ्या उंचीच्या लाटा उसळणार आहेत, त्याचवेळी मोठा पाऊस पडला तर पाण्याच्या निचऱ्याची वेगळी व्यवस्था करावी लागेल. सध्या त्याचा विचार केला नसला तरी तो करावा लागणार आहे. काही तरी वेगळी संकल्पना त्यासाठी राबवावी लागेल. कारण ही समस्या खूप मोठी आहे.
- संजीत रॉड्रिगीस,
सीईओ (इमॅजिन स्मार्ट सिटी)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.