Goa Rain: हातातोंडाशी आलेला घास मातीमोल, 'पर्जन्यराजा' अवेळी कोपला; शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचे संकट

Goa Rain News: गेल्या जवळपास दहा दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे डिचोलीतील भातशेतीचे मोठे नुकसान झाले
Goa Rain
Goa RainDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: गेल्या जवळपास दहा दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे डिचोलीतील भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून, आज पडलेल्या जोरदार पावसामुळे तर शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या आशाही मातीत मिसळल्या आहेत.

पर्जन्यराजाचा कोप झाल्याने मयेसह साळ, बोर्डे, शिरगाव आदी भागातील भातशेती पाण्याखाली गेली असून भाताला ‘कोंब’ फुटू लागले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पुरते गळीतगात्र झाले आहेत. यंदा धड ‘पेज’ मिळणेही दुरापास्त होणार आहे, अशी कैफियत शेतकरी व्यक्त करीत आहेत. सरकारने त्वरित भरीव नुकसानभरपाई देऊन आम्हाला संकटातून सावरावे, अशी मागणी व्यथित झालेल्या शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Goa Rain
Goa Crime: बालकांवरील अत्याचारप्रकरणी हेमंत दास दोषी, बालन्यायालयाचा निवाडा; 2 मुलांना बनवले होते वासनेची शिकार

दिवाळीच्या पूर्वसंध्येपासून कहर केलेला पाऊस काही माघार घेत नसल्याने शेतकऱ्यांवर कोसळलेले संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. पाऊस एकदाचा कमी होईल आणि उरलेसुरलेले भातपीक घरात नेता येईल, अशी आशा काल-परवापर्यंत शेतकऱ्यांना वाटत होती.

मात्र, माघार सोडाच, उलट पावसाचा जोर वाढत आहे. आज (बुधवारी) तर जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. जोरदार पावसामुळे आता भातशेती पूर्ण पाण्याखाली येवून भातपीक भुईसपाट झाले आहे.

Goa Rain
Goa News : मुसळधार पावसानं उडवली दाणादाण, सत्तरीत गावकरांच्या घराचे छत पडले; आमदार देविया राणेंचा मदतीचा हात

शेती लागवडीवर केलेला खर्च आणि मेहनत पाण्यात गेल्यातच जमा आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे व्यथित झालेले शेतकरी आता सरकारी आधाराच्या प्रतीक्षेत आहेत. पाण्याखाली गेल्यामुळे भातशेतीची पूर्णपणे नासाडी झाली आहे.

भातशेतीची झालेली अवस्था पाहून चिंता वाढू लागली आहे, अशी व्यथा साळ, बोर्डे, मये आणि शिरगाव येथील शेतकरी व्यक्त करीत आहेत. आता कापणी सोडाच शेतीत पाय ठेवणेही मुश्‍कील झाले आहे, असे व्यथित शेतकरी सांगत आहेत.

पावसामुळे यंदा हातातोंडाशी आलेला घास पाण्यात वाहून गेला आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, त्याची आता चिंता लागून राहिली आहे. चतुर्थीवेळी भात देऊन चित्रशाळेतून गणपती आणण्याची आमच्या घरची परंपरा आहे. यंदा धड ‘पेज’ मिळणार नाही, ती नाहीच; गणपतीसाठी भातही मिळणार नाही. शेती करताना घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, असे अनेक प्रश्न सतावत आहेत. आता केवळ सरकारी मदतीची अपेक्षा आहे.

- रत्नाकांत आरोंदेकर, शेतकरी, मये

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com