Rahul Gandhi: राहुल गांधींचे श्‍‍वानप्रेम आणि गोवा दौरा !... वाचा हे अनोखे वृत्त

गाठले गोवा : ‘जॅक रसेल टेरियर’ची दोन पिल्ले नेली स्‍वत:सोबत; अन्‍य राज्‍यांतही घेतला होता शोध
Rahul Gandhi
Rahul GandhiDainik Gomantak

Rahul Gandhi अनेकजण प्राणी पाळतात. त्यांची काळजी घेतात, त्यांना मनापासून जपतात. कुत्रा हा पाळीव प्राण्यांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय आहे. असे म्हटले जाते की, कुत्रा हा माणसाचा खरा मित्र असतो आणि याच श्वानाच्या प्रेमापोटी काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते राहुल गांधी हे चक्क दिल्लीहून आकय-म्हापसा येथे पोहोचले.

सामाजिक कार्यकर्ते तथा ‘अ‍ॅनिमल किंगडम’ या पेट शॉपचे सर्वेसर्वा स्टॅनली ब्रागांझा यांच्याकडून राहुल गांधी यांनी ‘जॅक रसेल टेरियर’ नामक प्रजातीच्या कुत्र्याची ही दोन पिल्ले विकत घेत आपल्यासोबत नेली. राहुल यांचा दोन दिवसीय गोवा दौरा हा खासगी होता आणि याच कुत्र्यांच्या पिल्लांसाठी ते खास गोव्यात आल्‍याचे समजते.

काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांच्या कार्यालयाने स्टॅनली यांच्याशी संपर्क साधून ‘जॅक रसेल टेरियर’ या प्रजातीच्या कुत्र्यांबाबत चौकशी केली. राहुल यांच्याकडे या प्रजातीची यापूर्वी दोन कुत्री होती.

त्‍यातील एकाचा मृत्‍यू झाला. त्यामुळे या कुत्र्यासाठी त्यांना साथीदार हवा होता. मागील काही दिवसांपासून या श्‍‍वानाच्‍या शोधार्थ होते. यासाठी ते देशातील अन्य राज्यांमध्‍येही फिरले. अखेर हा शोध गोव्यात म्हणजे आकय-म्हापसा येथे पूर्ण झाला.

आकय येथील स्टॅनली ब्रांगाझा यांच्या निवासस्थानी राहुल गांधी येणार याची कल्पना ब्रागांझा कुटुंबाला शेवटच्या क्षणी मिळाली. आज गुरुवारी सकाळी नऊच्‍या सुमारास राहुल गांधी ब्रागांझा यांच्‍या घरी पोचले व त्यांनी ब्रागांझा कुटुंबीयांशी गप्पा मारल्या.

तब्बल २० मिनिटे ते येथे थांबले. यातील अधिक वेळ हा राहुल यांनी पेट शॉपमध्येच घालविला. घराशेजारीच स्टॅनली यांचे पेट शॉप आहे. दरम्यान, राहुल गांधी यांची ही भेट इतकी गुपित ठेवली होती की त्‍याबाबत माध्यमांसह स्थानिक पोलिसांनाही कल्पना देण्यात आली नव्हती.

देशभरात गोव्‍यामध्‍येच सापडते ही प्रजाती

देशात ‘जॅक रसेल टेरियर’ ही प्रजात गोव्‍यातच सापडते. राहुल गांधींनी या प्रजातीची दोन पिल्ले आपल्‍यासोबत नेली. यातील एक नर व दुसरी मादी आहे. जी पिल्ले राहुल यांनी आपल्यासोबत नेली त्या पिल्लांच्‍या आई-बापाला स्टॅनली यांनी परदेशातून आयात केले होते.

या आयात कुत्र्यांच्या जोडप्याने तीन पिल्लांना जन्म दिला. या तीन पिल्लांपैकी राहुल यांनी दोन पिल्ले निवडली. स्टॅनली यांचे ‘अ‍ॅनिमल किंगडम’ हे पेट शॉप असून, गेल्‍या २३ वर्षांपासून ते या व्यवसायात आहेत.

Rahul Gandhi
Goa Revenue Department: महसूलमंत्र्यांच्‍या कार्यालयाकडून बांधकाम व्‍यावसायिक वेठीस! राज्‍याचा कोट्यवधींच्या महसूलावर पाणी

राहुल गांधी हे ‘जॅक रसेल टेरियर’ प्रजातीच्या शोधार्थ होते आणि या श्‍‍वानाची पिल्ले त्‍यांना माझ्‍याकडे मिळाली. हा माझ्‍यासाठी अविस्मरणीय क्षण होता. बॉलिवूड स्टार जसे की करण जोहर, करिना कपूर तसेच काही उद्योजकांनीही यापूर्वी माझ्‍याकडून विविध श्‍‍वानांच्‍या प्रजातीची पिल्ले नेली आहेत.

- स्टॅनली ब्रागांझा, आकय-म्‍हापसा

Rahul Gandhi
Goa BJP: मुख्‍यमंत्र्यांनी तानावडेंसह घेतली नरेंद्र मोदी, शहा, नड्डा यांची भेट

राहुल गांधी यांच्‍या गोवा दौऱ्यात राजकीय चर्चाही झाली. त्‍यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती काय असावी, याबाबत सूचना दिल्या. त्‍या ८ आमदारांचा विषयही चर्चेला आला.

- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com