Quepem Ganesh Mandal Lottery: पहाटे 5 पासूनच बक्षिसांसाठी झुंबड, पोलिसांचा हस्तक्षेप आणि अखेर मंडळाने घेतला 'हा' निर्णय

पोलिसांचा हस्तक्षेप ः चेंगराचेंगरीच्या भीतीने केप्यातील कुपन विक्री बंद
Quepem Ganesh Mandal Lottery
Quepem Ganesh Mandal LotteryDainik Gomantak
Published on
Updated on

Quepem Ganesh Mandal Lottery केपे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही आज देणगी वजा लॉटरी कुपन विक्रीस प्रारंभ केला आणि त्याच्या खरेदीसाठी व लाखोंच्या बक्षिसांसाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली.

यावेळी एवढी गर्दी उसळली होती, की चेंगराचेंगरीचा प्रसंग ओढवू नये म्हणून पोलिसांना हस्तक्षेप करून ही लॉटरी कुपन विक्री बंद करावी लागली. तत्पूर्वी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांच्या उपस्थितीत या लॉटरी कुपन विक्रीस प्रारंभ करण्यात आला होता.

यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा, नगराध्यक्ष सुचिता शिरवईकर, माजी मंत्री प्रकाश वेळीप, मंडळाचे अध्यक्ष इचित फळदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

देणगी कुपन अवघ्या दोन दिवसांत हातोहात विक्री होणारे केपे गणेशोत्सव मंडळ हे राज्यातील प्रथम मंडळ आहे. लॉटरी कुपन खरेदीस लोकांचा अफाट प्रतिसाद लाभत असल्याने मंडळ सामाजिक कार्यात सहभागी होऊन आपली एक वेगळीच ओळख निर्माण करू शकते, असे उद्‍गार उद्‍घाटनावेळी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी काढले.

नीलेश काब्राल यांनी मंडळाने आता एखादे विद्यालय किंवा इस्पितळ सुरू करावे. या कामासाठी राज्य सरकार व आपलेसुद्धा सहकार्य मंडळाला मिळेल, असे सांगितले.

पहाटे 5.30 वाजल्यापासून गर्दी

देणगी कुपन खरेदी करण्यासाठी नागरिकांनी आज सकाळी ५.३० वाजल्यापासून केपे बाजारात गर्दी करण्यास सुरवात केली होती.

यासाठी उद्‍घाटन सोहळा पंधरा मिनिटात आटोपता घेऊन कुपन विक्रीला सुरवात करण्यात आली होती, पण कुपन विक्रीला सुरवात करून अवघ्या पंधरा मिनिटांत लोकांची वाढत जाणारी गर्दी पाहून अखेर ही कुपन विक्री मंडळाला बंद करावी लागली.

आता देणगी कुपन विक्री उद्या २८ रोजी सकाळी केपे सरकारी महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी ८.३० वाजता सुरू करण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष इचित फळदेसाई यांनी सांगितले.

Quepem Ganesh Mandal Lottery
Bhoma Village: भाजपने गोमंतकीयांच्या घरावर वरवंटा फिरवण्याचा विडाच उचललाय, रस्त्याचे प्रयोजन न थांबवल्यास....

उद्यानाचे प्रवेशद्वार मोडले

लॉटरी कुपन विक्रीला सुरवात होताच लोकांनी एकच गर्दी केली. पालिका उद्यानाच्या आवारात ही कुपन विक्री सुरू झाली. यावेळी लोकांनी रांगेत उभे रहायचे सोडून थेट कुपन विक्री काउंटरकडे धाव घेतली.

यावेळी झालेल्या गर्दीमुळे उद्यानाचे मुख्य प्रवेशद्वारही मोडले गेले. तसेच विक्री काउंटरही मोडला. यावेळी केपे पोलिसांनी व सुरक्षा रक्षकांनी लोकांना आवरण्याचा बराच प्रयत्न केला, पण लोकांची गर्दी वाढतच गेल्याने या गर्दीचे चेंगराचेंगरीत रूपांतर होऊन जीवित हानी होऊ नये म्हणून अखेर मंडळाने कुपन विक्री बंद करण्यात आल्याचे जाहीर केले.

Quepem Ganesh Mandal Lottery
Mhadai River Rafting: भर पावसाळ्यात म्हादईचे पाणी आटले, सत्तरीवासीयांवर संकट

चोरट्यांनी साधली संधी

लॉटरी कुपन खरेदीसाठी उडालेल्या गर्दीचा फायदा घेऊन काही चोरट्यांनी गर्दीतील लोकांच्या खिशातील पाकिटे लांबविली. यावेळी दहाजणांनी आपली पाकिटे चोरीस गेल्याच्या तक्रारी केल्या. कुपन विक्री बंद केल्यानंतर गर्दी ओसरली. त्यावेळी अनेकजणांनी आपले पाकीट चोरीस गेल्याचे बोलून दाखविले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com