

सासष्टी: फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाई यांनी राष्ट्रीय महामार्गावर कचरा फेकणाऱ्यांवर निगराणी ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची केलेली सूचना मान्य करून सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी राष्ट्रीय महामार्गावर ज्या ठिकाणी कचरा फेकण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची व्यवस्था करण्यात येईल, अशी घोषणा केली. यासंदर्भात त्यांनी खात्याच्या मुख्य अभियंत्यांना आदेश दिले आहेत.
सार्वजनिक बांधकाम खाते, पर्यावरण खाते, हवामान बदल विभाग आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नुवे येथील राष्ट्रीय महामार्गावर वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाई, नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, मडगावचे माजी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर तसेच विविध खात्यांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री कामत यांनी पुढे सांगितले की, वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर कचरा व्यवस्थापनासाठीही असे कॅमेरे रस्त्यांवर बसविण्यात येतील. तसेच, कोणतीही झाडे लावून चालणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांनुसार जांभूळसारखी फळझाडे लावावीत, असे सुचविले आहे. ५ सप्टेंबरपर्यंत १० लाख झाडे लावली जातील.
आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले की, हरित गोवा आणि स्वच्छ गोवा या सरकारच्या अभियानांना आम्ही पाठिंबा देत आहोत. आम्ही विरोधक असलो तरी सरकारची चांगल्या कामांना पाठिंबा देणे हे आमचेही कर्तव्य आहे. औषधी, फुले व फळे देणारी झाडे लावली पाहिजेत. गोव्यात काही ठिकाणी ऑस्ट्रेलियन अकॅसिया या विदेशी वृक्षप्रजातीची झाडे लावण्यात आली आहेत. ती आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने धोकादायक असून ती तातडीने तोडली पाहिजेत, असे सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.