

पणजी: सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी चार दिवस अगोदरच गोव्यात पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. येणाऱ्या पर्यटकांसाठी खासगी लक्झरी बससेवेचे दर परवडणारे असले, तरी गोव्यातून परत जाण्यासाठीचे आत्तापासूनचे ‘खासगी स्लिपर कोच बसेस’चे तिकीट दर ९०० ते साडेपाच हजार रुपयांपर्यंत तिकीट दर गेलेले असून नियमित दरांपेक्षा दुपटीने वाढले आहेत.
खासगी, सरकारी बसेससाठी अगाऊ आसनव्यवस्था आरक्षित करण्यासाठी विविध उपलब्ध असणाऱ्या ॲपवरून सध्या वाढीव दर स्पष्टपणे दिसत आहेत. गोव्यातून पुणे-मुंबईला जाण्यासाठी काही नामांकित बससेवेचे दर अडीच हजारापर्यंत आहेत.
तर नियमित सेवा देणाऱ्या लक्झरी बसेसचे साधारण वातानुकूलीत स्लिपर कोचचे दर १३०० ते १७०० रुपयांपर्यंत आहेत. याशिवाय इतर मार्गावरीलही दर अशाच प्रकारे वाढलेले दिसत आहेत. मात्र, बंगळुरू आणि हैदराबाद या मार्गावर एका नामांकित लक्झरी बससेवा देणाऱ्या कंपनीने गोव्यातून जाण्यासाठी तिकीट दर साडेपाच हजार रुपये आहे.
सायंकाळी साडेसहा वाजता ही बस गोव्यातून सुटते. काही बस कंपन्यांनीही या मार्गावर तिकीट दर पुणे-मुंबईपेक्षा तीनशे-पाचशे रुपयांना वाढविल्याचे दिसून येते. परराज्यात जाणाऱ्या खासगी लक्झरी बसेस या मडगाव, वास्कोवरून पणजी, म्हापशातून पुढे जातात. त्यामुळे ज्या ठिकाणाहून बसेस सुटतात तेथूनचा तिकीट दर कायम असल्याचे दिसते. एका बाजूला खासगी वाहनाने गोव्यात येणाऱ्यांचे प्रमाण वाढले असले तरी लक्झरी बसेसने ग्रुपने गोव्यात येणारेही कमी नाहीत.
एका खासगी बस कंपनीच्या एजंटने सांगितले की, वर्षाच्या शेवटच्या चार दिवसांत आणि नूतन वर्षाच्या पहिल्या दोन-तीन दिवसांत लक्झरी बसेचे तिकिटाचे दर वाढीवच राहतात. खरेतर प्रवाशांना वातानुकूलीत आणि स्लिपर कोचची सवय झाली आहे. पुण्याच्या अलीकडे जाणारे प्रवासी बसून प्रवास करू शकतात. परंतु अधिकतर मागणी स्लिपर कोचच्या तिकिटांची असते. मागणी वाढली की, दर आपोआप वाढतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.