
डिचोली: डिचोली आयडीसी परिसरातील कातरवाडा येथील रस्त्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून धड पक्का रस्ता नसल्याने स्थानिकांना अनेक समस्या आणि संकटांचा सामना करावा लागत आहे. कातरवाड्याला जोडणाऱ्या मातीच्या रस्त्याची सध्या वाताहात झाली असून हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय बनला आहे. आता पावसाळ्यात स्थानिक लोकांचे अक्षरशः हाल होत असून ते संबंधितांना दोष देत आहेत.
दोन महिन्याच्या आत कातरवाडा येथील रस्त्याची समस्या कायमस्वरूपी सोडवली नाही, तर रस्त्यावर उतरून आयडीसी परिसरात ‘चक्का जाम’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा डिचोली गट काँगेसने दिला आहे. डिचोलीतील आयडीसी परिसरात असलेल्या आणि पालिका क्षेत्रात येणाऱ्या कातरवाड्यावर शंभरहून अधिक घरे आहेत.
मात्र, या वाड्यावर जाण्यासाठी धड रस्ता नसल्याने स्थानिक लोकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. कातरवाड्याला जोडणारा साधारण एक किलोमीटर अंतराचा कायमस्वरूपी रस्ता करावा अशी लोकांची कित्येक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, आजपावेतो या मागणीकडे दुर्लक्ष झाले असून लोक अजूनही रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.
काँग्रेसच्या संविधान बचाव अभियानांतर्गत गेल्या शनिवारी डिचोलीत झालेल्या कार्यक्रमावेळी कातरवाड्यावरील रस्त्याच्या समस्येचा विषय मांडण्यात आला होता. कातरवाड्यावर जाण्यासाठी ‘आयडीसी’च्या पुढे पक्का रस्ता नाही. त्यामुळे लोकांना मातीच्या रस्त्यावरून ये-जा करावी लागते. हा मातीचा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे.
सध्या या रस्त्यावरील खड्डे पाण्याने भरले असून सर्वत्र चिखल झाला आहे. या रस्त्यावरुन वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. चिखलामुळे दुचाकी घसरून लहानसहान अपघात घडत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.