Goa News: सुधीरबाब सत्ताधाऱ्यांच्या पंक्तीत! 'खरी कुजबूज'

Goa News: सुधीरबाब तसे आमदार मायकल लोबो यांच्या मर्जीतील आणि त्यांचे निकटवर्तीय मानले जातात.
Sudhir kandolkar | Goa news
Sudhir kandolkar | Goa news Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: म्हापशातील ज्येष्ठ नगरसेवक सुधीर कांदोळकर हे पुन्हा एकदा सत्ताधारी नेत्यांसोबत शहरात दिसले. निमित्त होते रामराज्य दिग्विजय रथयात्रेचे! ही रथयात्रा म्हापशात आली, त्यावेळी सुधीरबाबही याठिकाणी दिसले. मात्र, यावेळी विरोधी गटातील नेत्यांची अनुपस्थिती होती. पण सुधीरबाब तसे आमदार मायकल लोबो यांच्या मर्जीतील आणि त्यांचे निकटवर्तीय मानले जातात.

आता लोबोसाहेब हे भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे कदाचित ‘जिथे लोबोसाहेब, तिथे आपण’ असे म्हणत सुधीरबाबही कार्यक्रमस्थळी आले असावेत. येणाऱ्या काळात सुधीरबाबही भाजपमध्ये दिसल्यास कुणाला आश्चर्य वाटणार नाही, हेही तितकेच खरे!

गोव्यातही बुलडोझर

सांताक्रूझ पंचायतीने बेकायदेशीर बांधकामांवर धडक कारवाई सुरू केली आहे. बुलडोझरद्वारे पंचायतीने हे बेकायदेशीर बांधकाम जमीनदोस्त केले. देशातील इतर काही राज्यांमध्ये राजकीय फायद्यासाठी बुलडोझर वापरून बांधकाम पाडण्याचे प्रकार झाले आहेत. परंतु गोव्यात बुलडोझरचा वापर हा बेकायदेशीर बांधकामांसाठी झाला आहे, हे निर्विवाद सत्य आहे.

बऱ्याच काळापासून सांताक्रूझ पंचायत क्षेत्रात अतिक्रमण केलेल्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात होती; परंतु यापूर्वीच्या एकाही पंचायत मंडळाने ते काम केले नाही. अखेर नवीन पंचायत मंडळाने ते करून दाखवल्याने सांताक्रूझचे रहिवासी खूश झाले आहेत.

Sudhir kandolkar | Goa news
Destination Wedding: डेस्टिनेशन वेडिंगसाठी अशी करा पैशांची बचत...

बाबूश चिंतातूर

राजधानी पणजीत ‘इफ्फी’ची जय्यत तयारी सुरू आहे. दरवर्षी या महोत्सवाला देश-विदेशातून सिनेरसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहातात. सध्या या महोत्सवाच्या ठिकाणी रंगरंगोटी व रोषणाईचे काम जोरात सुरू आहे. रस्त्याच्या बाजूने रोपटी लावण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. केंद्रातून या महोत्सवाला निधी येत असल्याने दरवर्षी हे काम केले जाते. पण महोत्सव संपल्यानंतर त्याकडे वर्षभर कोणी ढुंकूनही पाहात नाही.

हा मतदारसंघ महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांचा आहे. मात्र, या तयारीची माहिती घेण्यासाठी ते कधी फिरकलेही नाहीत. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामातही त्यांनी लक्ष घातलेले नाही. त्यामुळे त्यांना या महोत्सवाचे काहीच पडलेले नाही की काय, असा प्रश्‍न लोकांना पडला आहे. नेहमी लोकांमध्ये मिसळून वागणारे मंत्री मोन्सेरात हे न्यायालयात सुरू असलेल्या दोन खटल्यांमुळे तणावाखाली दिसत आहेत.

Sudhir kandolkar | Goa news
Goa News: साळ नदीच्या प्रदूषणाला दिगंबर कामतच जबाबदार

त्यांचे ताळगावचे खंदे समर्थकही त्यांना सोडून गेले आहेत आणि भाजपचे कार्यकर्ते अजूनही जवळ येत नाहीत. त्यांच्याकडील महसूल खात्यामध्येही काही करण्यासाठी वाव नाही. खटल्यांवर काय निर्णय होऊ शकतो, या चिंतेने ते सध्या धास्तावले आहेत.

‘बुंद से गयी वो...’

गोवा पोलिसांचे देशभरात धिंडवडे काढणाऱ्या ड्रग्स प्रकरणाचे एक एक पैलू आता उघड होऊ लागले आहेत. वादग्रस्त कर्लीस बारचा चालक एडविन नुनीस याच्या मुसक्या हैदराबाद पोलिसांनी तिसऱ्यांदा आवळल्या आहेत. नुनीसवर हणजूण पोलिस ठाण्यात 5 आणि हैदराबादमध्ये 3 प्रकरणांत ड्रग्सचा पुरवठा केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, त्याने देशभर ड्रग्सचा पुरवठा केल्याचा पर्दाफाश हैदराबाद पाेलिसांनी केला आहे.

हैदराबाद पोलिसांच्या सूत्रांनुसार, नुनीसकडे देशभरातील 50 हजार संपर्क क्रमांक आहेत आणि त्याच्या संपर्कात असंख्य एजन्ट आहेत. त्यांच्या आधारे तो ग्राहकांना ड्रग्सपुरवठा करायचा. आता त्याच्या एकूण मालमत्तेची चौकशी करण्याची तयारी हैदराबाद पोलिसांनी चालवली आहे. हाच तपास गोवा पोलिसांनी केला असता तर दलाची लाज राखता आली असती, अशा प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

Sudhir kandolkar | Goa news
LIVE : गोव्यातील आजच्या बातम्या | Latest News Updates Of Goa | Morning News

व्हडल्या दिवाळीतही नाचला नरकासुर?

स्पर्धेच्या नावाखाली आपली परंपरा, धर्मग्रंथ आणि पौराणिक कथांचा अर्थ व सार बदलणे म्हणजे आपल्याच परंपरेशी प्रतारणा केल्यासारखे आहे. गोवा राज्यात धाकट्या दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासुर प्रतिमा नाचविण्याची पद्धत आहे. मात्र, मडगावात तुळशी विवाहाच्या पूर्वसंध्येला पिकेन नरकासुर स्पर्धेचे आयोजन केले होते.

या स्पर्धेचे आश्रयदाते होते खुद्द आमदार दिगंबर कामत. आता व्हडल्या दिवाळीलाही नरकासुर नाचतात, हे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. आता लोक विचारू लागले आहेत की, ही कुठली परंपरा? नरकासुराचा श्रीकृष्णाने दोनदा वध केला होता की काय? धाकट्या दिवाळीला आल्त म्हणजे मोठा नरकासुर आणि व्हडल्या दिवाळीला पिकेन म्हणजे लहान नरकासुराचा वध झाला होता की काय? बाबा...व्हडल्या दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासुर नाचवण्याची आयडिया दिली कोणी?

मॅडम, आता तरी लक्ष द्या...

राजधानी पणजीचाच भाग असलेल्या भाटले परिसरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. साहजिकच कामे कूर्मगतीने होत असल्याने लोक नाराज होणारच. काही दिवसांपूर्वीच जलवाहिनी फुटल्याने पणजी बसस्थानकाकडे जाणारा हा रस्ता पूर्णत: बंद होता. हा रस्ता अजूनही दुरुस्त झालेला नाही.

Sudhir kandolkar | Goa news
Margao Dindi Utsav: मडगावच्या दिंडीला पुढील वर्षी राज मान्यता मिळणार; CM प्रमोद सावंत यांची घोषणा

धुळीचे साम्राज्य, खड्ड्यांमुळे अपघातांची भीती वाढली आहे. नगरसेवक माहिती घेतात आणि आश्वासने देऊन परततात. येथील आमदार मॅडमनी तर गेल्या वर्षभरात या परिसराचा दाैरा केलेला नाही. त्यामुळे या परिसरातील समस्या सोडविणार तरी कोण, असा सवाल लोक करत आहेत. निवडणुकीवेळी मोठमोठी आश्वासने दिली होती आता त्याचे काय? ताळगावच्या मॅडमनी भाटले भागाचा दाैरा करून लोकांची दैनावस्था पाहावी, अशी चर्चा सध्या या भागात सुरू आहेत.

भाजपचे फेवरिट आश्‍‍वासन

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 12 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर तेथे प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष जे. पी. नड्डा यांनी रविवारी शिमला येथे भाजपचा जाहीरनामा सार्वजनिक केला. समान नागरी कायदा लागू करण्यासोबतच नोकरी, करकपात, स्टार्टअप्सविषयक आश्वासनांचा त्‍यात समावेश आहे. विशेष म्‍हणजे, गरीब कुटुंबांना 3 मोफत गॅस सिलिंडर देण्‍याची घोषणाही करण्‍यात आली आहे.

Sudhir kandolkar | Goa news
Goa Petrol Price: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ गोव्यातील इंधनाच्या किमतीवर परिणाम?

गोव्‍यात विधानसभा निवडणुकीपूर्वी असे आश्‍‍वासन देण्‍यात आले होते. 7 महिने उलटूनही अद्याप त्‍याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे लोक सरकारच्‍या नावाने बोटे मोडत आहेत. हिमाचल प्रदेशात याची पुनरावृत्ती झाली नाही म्‍हणजे मिळवले! कारण, भाजप नेत्‍यांना आश्‍‍वासन आणि जुमला हे दोन समानअर्थी शब्‍द वाटतात की काय, अशी आता शंका येऊ लागली आहे.

कॅप्टन...हे वागणे बरे नव्हे!

सुसंस्कृत लोक रस्त्यावर भांडण करत नाहीत, असे आपले पूर्वज सांगून गेलेत. पण नव्याने निवडून आलेले काही आमदार, मंत्री ज्याप्रमाणे वागतात आणि भर रस्त्यावर भांडतात, ते पाहून या लोकप्रतिनिधींची किव येते. परवा मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पावरून साबांखा मंत्री नीलेश काब्राल आणि बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांच्यात बरेच वाजले.

वेंझी आणि नीलेश हे हमरातुमरीची भाषा करत एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान देत होते. हे पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला. त्यांच्या या भांडणाचा व्हिडिओ बराच व्हायरल झाला असून नेटिझन या व्हिडिओवरून दोघांनाही उपदेशाचे डोस देऊ लागले आहेत. एक मात्र खरे, हे दोघे ज्याप्रमाणे वाद घालत होते, ते पाहिल्यावर ‘झाले तरी काय या राजकारण्यांना’ असेच लोक म्हणू लागले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com