शिवोली: शिवोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक (Assembly Election) लढविण्यासाठी काँग्रेस (Congress) पक्षाचे सहा उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे योग्य उमेदवाराची निवड करण्याचे पूर्ण अधिकार येथील स्थानिक गट समितीला दिलेले आहेत. जाहीर करण्यात येणाऱ्या उमेदवाराच्या पाठिशी कार्यकर्त्यांनी खंबीरपणे उभे राहून त्याच्या विजयासाठी एकजुटीने कार्य करावे, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा गोव्याचे निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी शिवोलीत केले. शिवोली काँग्रेस गट समितीतर्फे आयोजित विशेष मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, माजी कायदामंत्री ॲड. रमाकांत खलप, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन, माजी मंत्री ॲड. चंद्रकांत चोडणकर, संगीता परब, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, शिवोली सेवा दलाचे अध्यक्ष दत्ताराम पेडणेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते फ्रान्सिस फर्नांडिस, शिवोली गटाध्यक्ष पार्वती नागवेकर, युवा अध्यक्ष ॲड. रोशन चोडणकर, एल्विस गोम्स, चंदन मांद्रेकर, गावकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.कार्यकर्त्यांच्या भरगच्च उपस्थितीत सुरू झालेल्या या मेळाव्याची सुरूवात कार्यकर्त्यांकडून विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांवरुन तापलेल्या वातावरणातच झाली.
मागच्या सारखेच यंदाही शिवोलीतून शेवटच्या क्षणी काँग्रेस पक्ष माघार तर घेणार नाही ना, या व अशा अनेक प्रश्नांवरून शेखर शिरोडकर, व्हिक्टर फर्नांडिस, राजेश कोचरेकर आदींनी वरिष्ठांना भांबावून सोडले. काकासाहेब कालेलकर आयोगाला काँग्रेसकडून का नाकारण्यात आले, असा सवाल उपस्थित करून जनार्दन ताम्हणकर यांनी सभागृहात गोंधळच घातला. अखेर चिदंबरम यांना ग्वाही द्यावी लागली की, मतदारांचा विश्वासघात करून पक्षांतर केलेल्या पूर्वाश्रमींच्या काँग्रेसजनांना पक्षात फेरप्रवेश देणार नाही.
दिनेश गुंडू राव यांनी, इतर पक्षांच्या नेत्यांप्रमाणे काँग्रेस पक्षश्रेष्ठी लोकांवर आपली मते लादण्यासाठी आलेले नसून कार्यकर्त्यांच्या समस्या तसेच सूचना ऐकून घेण्यासाठी गोव्यात आलेले आहेत असे सांगितले. तर, दिगंबर कामत यांनी भाजप सरकारवर टीका करताना गोरगरीब माणसाला या सरकारने महागाईच्या विळख्यात ढकलले असल्याचा आरोप केला.अन् सभागृह झाले शांत सभेच्या प्रारंभी उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवरुन सभागृहातील वातावरण तापत चालले असताना ज्येष्ठ कार्यकर्ते फ्रान्सिस फर्नांडिस तसेच सेवा दलाचे दत्ताराम पेडणेकर यांनी उपस्थितांना आपापसात न लढता शिवोलीच्या हानीस कारणीभूत ठरलेल्या भाजपविरोधात लढा असे आवाहन केले आणि सभागृह शांत झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.