Goa Politics: खरी कुजबुज; एकी राहणार की तुटणार?

Goa Politics Khari Khujbuj: दोतोर केतन भाटीकर हे फोंड्यातील एक क्रियाशील राजकारणी. फोंड्याहून ते एकदा विधानसभा निवडणूक लढले आहेत.
Goa Politics Khari Khujbuj
Goa Politics Khari KhujbujDainik Gomantak
Published on
Updated on

एकी राहणार की तुटणार?

नगरनियोजन खात्‍याच्‍या कलम ‘३९ अ’ विरोधात रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍सचे आमदार विरेश बोरकर यांनी छेडलेल्‍या आंदोलनाने उग्र रुप धारण केलेले आहे. त्यांना लागलेला धक्काही अनेकांनी मनावर घेतला. त्यामुळे आंदोलनाची धार अधिक वाढली. आंदोलनात रविवारी अनेकजण सहभागी झाले. एकूणच आंदोलकांची संख्या वाढली. आता तर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्‍यासह विरोधातील सर्वच आमदारांनी उडी घेतलेली आहे. अर्थसंकल्‍पीय अधिवेशनाआधी या आंदोलनाच्‍या माध्‍यमातून विरोधक एकवटल्‍याने मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याबाबत काय निर्णय घेणार? याकडे संपूर्ण राज्‍याचे लक्ष आहे. परंतु, विरोधक आता दाखवत असलेली एकी अधिवेशनापर्यंत कायम राहणार? की ती फोडण्‍यात मुख्‍यमंत्री यशस्‍वी ठरणार? हे पाहण्‍यासाठी सर्वचजण उत्सुक आहेत.

केतनबाबची कसरत!

दोतोर केतन भाटीकर हे फोंड्यातील एक क्रियाशील राजकारणी. फोंड्याहून ते एकदा विधानसभा निवडणूक लढले आहेत. स्व. रवी नाईक यांना गत निवडणुकीत नाकीनऊ केले आहे. नाईक केवळ अवघ्या काहीच मतांनी निवडून आले. आता ते पोटनिवडणूक लढू पहात आहेत. एरव्ही त्यांना मगो पक्ष चांगला पडला असता, पण भाजपच्या दावणीला बांधलेल्या मगो नेत्यांनी भाजपने रवी नाईकच्या मुलाला उमेदवारी द्यावी, असे म्हटल्यावर केतनबाब काही प्रमाणात हबकले. मात्र त्यांनी धीर सोडलेला नाही. ते कॉंग्रेसतर्फे निवडणूक लढवू पहात आहेत, असे ऐकिवात आहे. मात्र काँग्रेसमध्ये सुद्धा अनेक इच्छुक असल्याने केतनबाब काँग्रेस पक्षात येतील व उमेदवारी मिळवतील? या भित्तीने काँग्रेसमधील इच्छुकांनी आताच त्यांच्या विरोधात फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. ‘घोडा मैदान दूर नाही’. बघूया काय होते?

Goa Politics Khari Khujbuj
Goa Spiritual Festival: कळंगुट किनारी भव्य महाआरती, संत-महंतांच्या सान्निध्यात 'गोवा स्पिरिच्युअल फेस्टिव्हल' उत्साहात

लोकांचा विश्वास महत्त्वाचा

सध्या गोव्याच्या राजकारणात काँग्रेस पक्ष परत एकदा आपली प्रतिमा उंचावू पहात आहे. भाजप सरकारबद्दल असलेल्या नाराजीचा फायदा काँग्रेस घेऊ पहात आहे. पण लोकांमध्ये काँग्रेसबद्दल विश्वास नाही. काँग्रेसच्या सरचिटणीस मनीषा बाय सांगतात, त्याप्रमाणे कार्यकर्ते संपर्क करतात, तेव्हा लोक सरळ सांगतात काँग्रेसच्या नावावर निवडून आलेले नंतर भाजपमध्ये जातात. काँग्रेसबद्दल लोकांमध्ये अशा प्रकारची असलेली भावना दूर करणे आवश्यक आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसवाले भाजपमध्ये गेल्याने काही प्रमाणात काँग्रेस स्वच्छ झाली आहे, असे लोक मानतात. याचा फायदा काँग्रेसचे नेते कसे घेतील, हे भविष्यात पहावे लागेल.

परत एकदा घराणेशाही?

नगर नियोजन खात्याने कलम ‘३९-ए’ रद्द करावे, म्हणून सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांच्या नेतृत्वाखाली पाळे-शिरदोन येथील लोकांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सर्व विरोधी पक्षांचे आमदार तसेच प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले. रविवारी पणजीतील आझाद मैदानावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्याबरोबर त्यांची पत्नी मेलीसाबाईंना पाहून काँग्रेसवाल्यांच्या मनात नक्कीच संशयाची पाल चुकचुकली असणार. कारण अवघ्या काही दिवसांमागे वॉरन आलेमाव यांनी काँग्रेस नेतृत्वाला पत्र लिहून पक्षप्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर, चर्चिल व वालंका आलेमाव काँग्रेस प्रभारी माणिकरावांना भेटल्याची वंदता होती. आता मेलिसा मॅडमना पाहून त्या राजकारणात येणार का? आणि त्या आल्या तर काँग्रेसचा घराणेशाहीमुळे २०२७ मध्ये परत एकदा २०१२ तर होणार नाही ना? अशी चर्चा काँग्रेसवाले करू लागले आहेत.

मोफत सेवेचा प्रस्ताव

राज्य सरकारातील एका आमदाराने आपल्या मतदारसंघातील फेरीबोट सेवा पूर्णतः मोफत देण्याचा घाट घातला होता. परंतु नदी परिवहन मंत्री आणि खात्यातील अधिकाऱ्यांना हा प्रस्ताव पटला नाही. अगोदरच दुचाकीस्वारांना मोफत सेवा दिली जात आहे. खाते अगोदरच ७० कोटीवर तोट्यात आहे. मंत्र्यांनी ही बाब वारंवार बोलून दाखवली आहे. ज्या मतदारसंघांना फेरीबोट सेवेचा लाभ होत आहे, त्यातील एकही आमदार फेरीबोट सेवा फायद्यात यावी, यासाठी कोणताही प्रस्ताव आणत नाही. पण मोफत सेवा देऊन मतदारांना खूष करण्याचा असा केविलवाणा प्रयत्न करणे, याला काय म्हणावे?

दीपक सरांचा दबदबा!

मडगाव पालिकेत सध्या दीपक फळदेसाई यांचा बोलबाला आहे. पालिका मुख्य अभियंता म्हणून ते कार्यरत आहेत. हल्लीच रात्रीच्या वेळी उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांवर त्यांनी धडक करवाई केली होती. पालिकेचे मुख्याधिकारी मधू नार्वेकर ही एकाद्या विषयावर त्यांच्याशी सल्लामसलत करून निर्णय घेत असतात. दीपकरावांचा दबदबा अनेकांना खटकतो. मात्र त्यांचे समर्थक म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी.

Goa Politics Khari Khujbuj
Goa Unseasonal Rain: कुठे सुखद गारवा, तर कुठे नुकसानीचा मारा! गोव्यात अवकाळी पावसाची एन्ट्री; आंबा-काजू बागायतदार संकटात VIDEO

विजयबाबचे प्रस्ताव

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डेचे आमदार विजयबाब सरदेसाई हे कॉँग्रेसकडे जवळीक साधून आहेत हे सर्वश्रुत आहे. त्यांना काँग्रेसबरोबर युती हवी आहे. कारण त्यात त्याचा फायदा सुद्धा आहे. हल्लीच साजरा केलेल्या कार्निव्हल उत्सवाच्या वेळी विजयबाबने काँग्रेससमोर दोन प्रस्ताव ठेवले आहेत. ते सुद्धा गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्याकडे. हे प्रस्ताव नेमके काय याची वाच्यता अजून झालेली नाही. त्यातील एक प्रस्ताव युतीबद्दल असावा. सर्व मतभेद विसरून सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, हा एक असावा. दुसरा कोणता? कदाचित कॉँग्रेस पक्षाची सूत्रे स्वताच्या हातात घेण्याचा तर नव्हे ना! अशी उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. हे प्रस्ताव थेट पक्ष श्रेष्ठीला पोचते केले आहेत, असे सांगतात. सध्या या प्रस्तावाबद्दल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली आहे हे खरे!

पोटनिवडणुकीचे वारे!

फोंड्यात सध्या पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल, हे गुलदस्त्यात आहे, पण भाजप, काँग्रेस, आपसारख्या राजकीय पक्षांनी आपापली हवा करायला सुरवात केली आहे, पण ही हवा करताना अजून कोणत्याच पक्षाचा उमेदवार ठरत नाही, ही आश्‍चर्याची बाब आहे. सध्या तरी राजकीय पक्ष उमेदवाराच्या शोधात असून काही पक्ष तर उमेदवारांना गळ घालत आहेत. आता याला काय म्हणावे!

...आणि नगरसेवक सक्रिय झाले !

गेल्या पाच वर्षात कुंकळ्ळी नगरपालिका मंडळाने तसे एकही ठोस विकास काम केलेले पहायला मिळत नाही. तयार इमारतीत पालिका कार्यालयाचे स्थलांतर करण्याचे सोपे कामही या पालिका मंडळाकडे झाले नाही. चौदा नगरसेवकांचे प्रगती पुस्तक तपासल्यास नगरसेवकांचे परफॉर्मन्स कळणार? काही नगरसेवक तर व्हिजिटिंग नगरसेवक बनले होते. आता त्यांचा कार्यकाळ संपायला आल्यावर या नगरसेवकांना जाग आली आहे. काहीजण खांद्यावर फवारणी यंत्र घेऊन मच्छर मारायला लागले आहेत. काही जण मोर्चाची तयारी करीत आहेत. काही नगरसेवक मतदारांच्या भेटीस जायला लागले आहेत, तर काहीजण युतीच्या मागे पुढे घुटमळायला लागले आहेत. आता पुढे पुन्हा नगरसेवक बनण्यासाठी हे कासव गतीने काम करणारे नगरसेवक अचानक सशासारखे पळायला लागले आहेत. आता पाहूया जनता त्यांच्या या नाटकांना बळी पडते की नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com