

उशिरा का होईना, मंत्र्यांची झाली बॅटरी ‘चार्ज’
आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम पुढे अधिक तीव्र जाणवणार आहेत, असे विश्लेषकांचे मत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन, खाद्यतेल, सोने खरेदी आणि विदेश वाऱ्यांना कात्री लावा असा संदेश देशवासीयांना दिला आहे. त्याची अंमलबजावणी गोव्यातील मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनी केलेली दिसते. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आता इलेक्ट्रिक कारचा वापर करण्यास सुरुवात केल्याची पोस्ट सध्या व्हायरल झाली. यापूर्वी नीलेश काब्राल वीजमंत्री झाल्यानंतर त्यांनी त्वरित इलेक्ट्रिक कारचा वापर सुरू केला होता. पण ढवळीकर यांनी पंतप्रधानांच्या आवाहनानंतर इलेक्ट्रिक कारचा वापर सुरू केला. त्यामुळे मंत्र्यांनी थोडा विलंबानेच इलेक्ट्रिक वाहनाचा वापर केला, असे अनेकांच्या मनात नक्कीच आले असेल.
‘तीन फूल एक माली’
‘पाप-पुण्ण्याचा हिशोब याच जन्मी फेडावा लागतो’ असे आपल्या बुजुर्गानी सांगून ठेवले आहे. ‘एपस्टीन फाईल्स’ या घटनेने संपूर्ण जगाला हादरवून टाकले. ज्याला सगळा संसार ईश्वरासमान मानत होता, त्यांचा सगळा बुरसटलेल्या इतिहास एपस्टीन फाईलमधून समाजापुढे आला. आपल्या गोव्यातील कुडचडेनगरात सध्या अशाच प्रकारच्या एपस्टीन फाईल्स गाजत आहेत. पूर्वी गाजले ते सेक्स स्कँडल, नंतर एका प्राचार्याची लफडी बाहेर आली आणि आता एका स्थानिक राजकारण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो विवाहित राजकारणी म्हणे आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन लाँग लव्ह ड्रायवर गेला होता. त्याला त्याच्या बायकोने व सुपुत्राने म्हणे रंगेहाथ पकडून बराच चोप दिला. महत्त्वाचे म्हणजे त्या राजकारण्याची ही ‘चोरी चोरी... चुपके चुपके’ घटना आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या घटनेत म्हणे तीन महिला व एक पुरुष सहभागी असल्यामुळे संपूर्ण लव्ह स्टोरीला आता ‘तीन फूल एक माली’ असे संबोधले जात आहे.
म्हापसा पालिकेत ‘फाईल डान्स’
म्हापसा पालिका नेहमीच चर्चेत असते. आता तिथे एक अजबच प्रकार समोर आलाय. सामाजिक कार्यकर्ते संजय बर्डे यांनी पालिकेच्या कारभारावर टोमणा मारत एक गुपित उघड केले. त्यांच्या दाव्यानुसार, स्थानिक आमदाराच्या मर्जीतील एक अतिउत्साही व्यक्ती थेट पालिकेत जाते आणि तिथल्या फाईल्सची ढवळाढवळ करते; जणू पालिकेचा कारभार चालवण्याचा मक्ता याच माणसाने घेतलाय! फाईल्स वर-खाली करण्याचा हा खेळ गेल्या एप्रिल महिन्यात घडला. बर्डे यांनी यावर आक्षेप घेत सत्य समोर आणण्यासाठी त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज मागितले.पण प्रशासनाने मौन बाळगले. पालिकेतून फाईल्स गायब होणे हे म्हापसेकरांसाठी नवीन नाही. पण आता बाहेरच्या माणसाने येऊन थेट फाईल्सशी खेळणे हा गंभीर प्रकार आहे. आता आपले प्रशासकीय अधिकारी यावर काही ॲक्शन घेतात की नेहमीप्रमाणे डोळे झाकून या प्रकरणाचीही फाईल बंद करतात, हे पाहणे रंजक ठरेल!
‘आरजी’ पक्ष विसर्जित करण्याचा होता डाव?
सध्या ‘आरजी’ पक्षातील नेत्यांमध्ये जे ‘तू तू..मैं मैं’ चालले आहे, त्यामागे पक्षातील नेत्यांचा इगो प्रॉब्लेम असे सांगितले जात असले तरी खरे कारण वेगळेच असावे अशी शक्यता व्यक्त केली जातेय. पक्षाचे कार्यकर्ते असलेल्या काही नेत्यांकडून जी माहिती ऐकू येते ती म्हणजे, आमदार वीरेश बोरकर हे गोव्याबाहेर असताना येथील काही नेत्यांनी ‘आरजी’ पक्ष विसर्जित करण्याचा म्हणे निर्णय घेतला हाेता. त्यासाठी एक बैठकही झाली. मात्र बैठकीत उपस्थित असलेल्या एक-दोघांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला. पक्ष विसर्जित करण्यास वीरेश यांचाही विरोध होता. त्यामुळेच सध्या एका गटाकडून वीरेश आणि त्यांना जवळ असलेल्या अन्य नेत्यांना टार्गेट केले जातेय अशी चर्चा आहे. जोपर्यंत वीरेश बाेरकर याबाबत उघडपणे बोलत नाहीत, तोपर्यंत हा पक्ष विसर्जित करण्याचा निर्णय एक गूढच राहणार हे मात्र नक्की.
मनोजचा वीरेशबाबत तेव्हापासून जळफळाट!
रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे (आरजी) आमदार वीरेश बोरकर यांनी नगरनियोजन खात्याच्या ‘३९-अ’ कलमाविरोधात छेडलेल्या आंदोलनानंतरच पक्षात अंतर्गत वाद सुरू झाल्याचा दावा माजी पदाधिकारी आदित्य देसाई यांनी केला. या प्रकरणात आमदार बोरकर यांनी आझाद मैदानावर छेडलेल्या आंदोलनाला विरोधी पक्षांच्या आमदारांनी पाठिंबा देत, तेथे येऊन भाषणेही केली. पण त्यावेळी पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी ‘जे’ भाषण केले होते, त्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरला. मनोज यांच्या ‘त्या’ भाषणातून ते वीरेशवर ‘जळत’ असल्याचेच दिसून आले, असे ‘आरजी’चे कार्यकर्तेच म्हणत आहेत.
तरीही ‘ते’ गप्प का?
‘आरजी’त अंतर्गत युद्ध सुरू झाल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष असलेले मनोज परब यांनी फेसबुकद्वारे काही पदाधिकाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. यातील बहुतांशी पदाधिकारी हे आमदार वीरेश बोरकर यांच्या जवळचे आहेत. परंतु, त्यातील एकानेही आत्तापर्यंत मनोजच्या टीकेला उत्तर किंवा स्पष्टीकरण दिलेले नाही. उलट मनोज यांच्यानंतर अजय खोलकर, विश्वेश नाईक यांनी मनोजचाच किल्ला लढवण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमके कोण खरे? असा प्रश्न आरजीपीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.
वादळापूर्वीची शांतता
आगशीचे पंच ज्युलियस आल्मेदा यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर ‘आरजी’ पक्षात मनोज परब विरुद्ध वीरेश बोरकर असे थेट दोन गट पडले. त्यानंतर सुरू झालेल्या अंतर्गत युद्धाला पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे ‘फोडणी’ दिली. पक्षाच्या सांतआंद्रेतील काही पदाधिकाऱ्यांवर त्यांनी सडकून टीका केली. त्यामुळे सांत-आंद्रेतील पदाधिकारी, कार्यकर्तेही आता परब यांच्याविरोधात आक्रमक बनले आहेत. त्यांचा पूर्ण पाठिंबा वीरेश बोरकर यांना आहे. तरीही बोरकर गेले काही दिवस गप्प बसले होते. परंतु, गुरुवारी त्यांनीही फेसबुकवर केवळ ‘शांतता’ इतकीच पोस्ट केल्याने ‘ही शांतता वादळापूर्वीची नाही ना?’ अशी कुजबूज पक्षाच्या कार्यकर्त्यांत सुरू झाली आहे.
‘त्या’ मातांच्या अश्रूंचे काय?
‘आरजी’चे अध्यक्ष मनोज परब यांनी पक्षातील अंतर्गत कलहाची खदखद सोशल मीडियावरून मांडत असतानाच पक्षाला काही पदाधिकारी बाधक ठरत असल्याचा दावा करत त्यांच्यावर सडकून टीका केली. त्याचवेळी ‘माझ्या आईच्या अश्रूंचा हिशोब ठेवला जाईल’ असा दमही दिला. मनोज यांच्या या पोस्टबाबत पक्षाचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. मनोज परब यांच्याप्रमाणेच तळागाळातील अनेक कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत करून पक्ष तळागाळापर्यंत नेण्यास मदत केली. त्यातील काहींवर परब यांच्याकडून अन्याय झाला. त्यांच्या ‘मातांचे अश्रू’ परब यांना दिसले नाहीत का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
तामिळनाडूत विजय, गोव्यात फक्त अभिनंदन!
तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री विजय जोसेफ यांनी विधानसभेत आपले संख्याबळ दाखवले आणि गोव्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी लगेच त्यांचे अभिनंदन केले. ‘विजय यांचे नेतृत्व तामिळनाडूतील तरुणांना प्रेरणा देणारे’ अशी प्रतिक्रिया युरीनीं दिल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये चर्चा रंगली. तामिळनाडूत विजय यांनी अवघ्या दोन वर्षांत राजकीय पक्ष स्थापन करून सत्तेत येण्याची किमया साधली. गोव्यात विरोधी पक्षनेते म्हणून मागची चार वर्षे कार्यरत असताना युरी फारसा प्रभाव गोमंतकीयांवर टाकू शकले नाहीत. त्यामुळे तामिळनाडूच्या तरुणांना सल्ला देण्यापेक्षा युरींनी विजय थलपतीकडूनच प्रेरणा घ्यावी. शिवाय एखाद्या दिवशी गिरीश चोडणकरांबरोबर तामिळनाडूनत जाऊन त्यांना भेटूनही यावे व कार्यरत व्हावे, असे आता आम्ही नव्हे, काँग्रेसवालेच म्हणू लागले आहेत.
लेखक आणि ‘घोस्ट रायटर’
हल्ली समाजात प्रत्येकाला लेखक व्हावे असे वाटते. कला-संस्कृती क्षेत्राला बहर आल्याची ही लक्षणं. आठवड्याला एक वा दोन पुस्तके येत आहेत. प्रकाशन सोहळे गडगंज. अगोदर पत्रकार परिषदाही होतात. एरव्ही कविता, कथा, निबंध वा इतर साहित्य कधी नियतकालिकांत वा वृत्तपत्रांत लिहिलेले नाही, कुणीही वाचले नाही असे लेखकराव थेट दाट पुस्तकच प्रकाशित करतात. हे एक कोडंच पडतं. कारण पैसे देऊन नोकऱ्या मिळवण्याचे प्रयत्न होत असतील, पण पैसे देऊन घोस्ट रायटरकडून पुस्तक लिहून घेण्याचा एक व्यवसाय जोर धरत आहे. नवनवीन लेखकांची नावे पाहिली की ते धाडस घोस्ट रायटरकरवी करून घेतलेले तर नसेल ना? अशी शंका लोक उपस्थित करू लागले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.