खरी कुजबुज: 'तो' इन्फ्लुएंसर झाला गब्बर!

Khari Kujbuj Political Satire: भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करता करता काँग्रेस पक्षाच्या जवळच्या एका इन्फ्लुएंसरने सासष्टी तालुक्यात एक भला मोठा बंगला बांधायला सुरुवात केलेली आहे.
Khari Kujbuj Political Satire
Khari KujbujDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

'तो' इन्फ्लुएंसर झाला गब्बर!

भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करता करता काँग्रेस पक्षाच्या जवळच्या एका इन्फ्लुएंसरने सासष्टी तालुक्यात एक भला मोठा बंगला बांधायला सुरुवात केलेली आहे. काँग्रेसला हल्लीच्या काळात झालेल्या निवडणुकांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. पण काँग्रेसचे काही नेते आणि त्यांचे इन्फ्लुएंसर मात्र गब्बर झाल्याची चर्चा सध्या सासष्टीत चालू आहे. कारण, हा इन्फ्लुएंसर गोव्यापेक्षा मध्य प्रदेश आणि तामिळनाडूतही एका गोव्यातील काँग्रेस नेत्याबरोबर प्रचारासाठी गेला होता. तिथे प्रचाराची धुरा वाहता वाहता आणि इन्फ्लुएंसरचे काम करता करता त्याने अमाप संपत्ती मिळवली. इतकेच नव्हे, तर मध्य प्रदेशमध्ये त्याचे फार्मही आहे. गोव्यात त्याचा भला मोठा बंगला आपले जुने घर पाडून उभारला जात आहे. एवढा मोठा पैसा एखादा नेता जर अशा प्रकारे मिळवून बंगला उभारत असेल, तर त्याच्यावर सक्तवसुली संचालनालय व आयकर खात्याचे लक्ष अजून कसे गेले नाही? याची चर्चा सध्या काँग्रेस गोटातच सुरू आहे. ∙∙∙

ढवळीकरांचा सल्ला!

गेल्‍या दोन विधानसभा निवडणुकांत काँग्रेसच्‍या उमेदवारीवर निवडून आलेल्‍या तब्‍बल १८ आमदारांनी भाजपात प्रवेश करून, राजकारणात काहीही होऊ शकते, हे गोव्‍यासह संपूर्ण देशाला दाखवून दिलेले होते. सलग घडलेल्‍या या दोन पक्षांतरामुळे राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले मंत्री तथा मगोचे ज्‍येष्‍ठ नेते सुदिन ढवळीकरही चिंतेत आहेत. त्‍यामुळेच त्‍यांनी आमदारांपेक्षा आपल्‍या पक्षाच्‍या कार्यकर्त्यांवर अधिक विश्‍‍वास ठेवला आहे. मंगळवारी मडकईत झालेल्‍या कार्यक्रमात बोलतानाही, ‘‘विधानसभा निवडणूक झाल्‍यानंतर निवडून आलेला कोणता आमदार कोणत्‍या पक्षात जाईल हे सांगता येत नाही. अशा स्‍थितीत कार्यकर्ते महत्त्‍वाचे आहेत. त्‍यामुळे त्‍यांना जपणे महत्त्‍वाचे आहे’’, असे ते म्‍हणाले. शिवाय मगोप्रमाणेच कार्यकर्ते जपण्‍याचा सल्ला त्‍यांनी भाजपलाही दिला. यातून पुढील काळात पक्षांतराचा धोका भाजपलाही बसू शकतो, हेच ढवळीकरांना प्रकर्षाने सांगायचे नसेल ना?

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-मगो एकत्रच लढणार; युतीचा अंतिम निर्णय दिल्ली दरबारी!

युरीचे हातवारे!

काँग्रेसच्या ‘गोवा रक्षण यात्रे’ची आखणी करणारे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दसऱ्याच्या दिवशी दोन स्थानिक वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या. मात्र, या मुलाखतींमधील त्यांचा आक्रमक आविर्भाव अनेकांना कितपत भावला, हा प्रश्नच आहे. मुलाखत देताना आक्रमकतेसोबत संयम, विषयाचा अभ्यास आणि मुद्देसूद मांडणीही महत्त्वाची असते. विरोधी पक्षनेते म्हणून युरी यांची मुलाखत प्रभावी ठरेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या बोलण्यापेक्षा हातवारे आणि देहबोलीच अधिक ठळकपणे जाणवली. पत्रकार परिषद असो वा विधानसभा, हातवारे करण्याची त्यांची शैली मुलाखतीतही कायम दिसली. मुद्दे प्रभावी असले, तरी मांडणीही तितकीच प्रभावी हवी. त्यामुळे बोलण्यापेक्षा हातवारेच अधिक लक्षात राहतात, युरी यांनी याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला काही जण देत सुटले आहेत!

‘गवंडी बन गया ड्रायव्हर’!

बाबांच्या आशीर्वादाने असो किंवा अन्य कुणाच्या आशीर्वादाने, पण मडगाव पालिकेत गवंडी या पदावर कामावर घेतलेल्या एका सरकारी जावयाला आता म्हणे लगेच ड्रायव्हरचे काम देण्यात येणार आहे. वास्तविक, मडगाव पालिकेत गवंड्याचे काय काम आहे म्हणून त्याला या पदावर नियुक्त केले असावे? हा गवंडी म्हणे सध्या पालिकेत ड्रायव्हरबरोबर अधिक वेळ घालवतो. आता गवंड्याचे काही कामच नसल्याने तो तरी काय करेल म्हणा! आणि थोड्याच दिवसांत म्हणे तोच गाडी चालवणार. थोडक्यात, गवंडी ड्रायव्हर बनणार तर!

फोटोचा नियम सगळ्यांना सारखाच!

राजकीय नेत्यांसोबत पत्रकाराने फोटो काढला की लगेच चर्चा सुरू होते. त्यातही काँग्रेसच्या काही नेत्यांना पत्रकारांच्या फोटोंवर भाष्य करण्याचा जणू विशेष उत्साहच! पण याच पक्षाचे आमदार मंत्र्यांच्या खासगी बंगल्यावर भेटायला जातात आणि त्यांचे फोटो व्हायरल होऊन चर्चा रंगते, तेव्हा मात्र या नेत्यांची वाचा कुठे हरवते, असा प्रश्न पडतो. पत्रकाराच्या फोटोवर बोलायला अनेक जण पुढे येतात; पण स्वतःच्या आमदारांच्या भेटीवर बोलण्याची वेळ आली की सगळेच गप्प! मग राजकारणात फोटो काढण्याचे नियम वेगळे आणि फोटो व्हायरल झाल्यावर स्पष्टीकरण देण्याचे नियम वेगळे आहेत की काय? की दुसऱ्यांच्या फोटोवर बोलणे सोपे आणि स्वतःच्या फोटोचा विषय निघाला की मौन पाळणे सोयीचे!

म्हापशाचे रवींद्र भवन : स्वप्न की प्रतीक्षा?

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तुये येथे नव्या रवींद्र भवनाचे भूमिपूजन झाले, ही सांस्कृतिक क्षेत्रासाठी निश्चितच आनंदाची बाब. मात्र, हे पाहताना म्हापशेकरांच्या मनात थोडी हळहळ नक्कीच वाटते. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या म्हापसा शहरात कित्येक वर्षांपासून हक्काच्या रवींद्र भवनाची प्रतीक्षा सुरू आहे. दुर्दैवाने, अद्याप योग्य जागेची निश्चिती झालेली नाही आणि प्रशासकीय परवानग्यांच्या चक्रव्यूहात हा महत्त्वाचा प्रकल्प अडकून पडला आहे. शेजारच्या गावात काम सुरू झाल्याचा आनंद सर्वांनाच आहे; पण आमच्या शहरातील रसिक आणि कलाकारांना आपल्याच हक्काचे व्यासपीठ कधी मिळणार, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो. दर निवडणुकीत म्हापशेकरांच्या डोळ्यांत रवींद्र भवनाचे ‘हाऊसफुल्ल’ स्वप्न रंगवले जाते; पण निकालानंतर हातात मात्र ‘तारीख पे तारीख’चे फुकट तिकीटच पडते! आता पुढच्या दसऱ्यापर्यंत तरी आमच्या जागेचा ‘अंक’ सुरू होणार, याकडेच आता संपूर्ण शहराचे डोळे लागले आहेत.

Khari Kujbuj Political Satire
Goa Political Reservation: 2027च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय आरक्षण प्रक्रिया पूर्ण करा; अनुसूचित जमातींचा सावंत सरकारला अल्टीमेटम!

‘त्या’ फलकांनी वाढवली राजकीय धग!

दसऱ्यानिमित्त म्हापशात झळकलेल्या ‘बेटर म्हापसा’ होर्डिंग्जमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. ‘नव्या विचारांची व्यक्ती खास, विकसित म्हापसा होच ध्यास’ या घोषणेसह भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा राज्य दिव्यांग आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांचा चेहरा या फलकांवर झळकल्याने पक्षांतर्गत खलबतांना वेग आला आहे. गेल्या २५ वर्षांपासून म्हापसा हा दिवंगत नेते फ्रान्सिस डिसोझा आणि सध्या त्यांचे सुपुत्र, उपसभापती जोशुआ डिसोझा यांच्या घराण्याचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, अलीकडेच स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि संघ कार्यकर्त्यांच्या एका बैठकीत पर्यायी नेतृत्वाची मागणी पुढे आली. आधी सामाजिक कार्यकर्ते मयूर सावकार यांच्यानंतर आता पावस्करांनीही या मोहिमेतून थेट विधानसभा तिकिटावर दावा ठोकल्याची चर्चा रंगली आहे. ‘नव्या विचारांची व्यक्ती’ हा उल्लेख प्रस्थापित सत्तेला थेट आव्हान मानला जात असून, भाजपचे श्रेष्ठी पारंपरिक डिसोझा वारसा कायम ठेवणार की नव्या स्थानिक चेहऱ्याला कौल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कदंबच्या सेवेचा उतराईपणा!

गेली ४० वर्षे गावात येणाऱ्या कदंबच्या बसने अनेकांना सुखरूप पोहोचवले. आता या सेवेची उतराई होण्याची वेळ आली, तीही दसऱ्याच्या मुहूर्तावर! दोडामार्गच्या घोटेवाडीतील ऋषिकेश पावसकर आणि त्याच्या मित्रांनी कदंबची बस सजवून आपल्या कृतज्ञतेला अनोखा साज चढवला. मनजीत अस्नोडकर यांच्या हाती बसचे सारथ्य, तर सजावटीची धुरा ऋषिकेशसह मित्रमंडळींनी सांभाळली. एरवी बसमध्ये जागेसाठी धावपळ करणाऱ्या प्रवाशांनी यंदा बसलाच दसऱ्याची भेट दिली. बससेवेची अशी उतराई पाहून कदंबलाही अभिमान वाटला असेल!

ते पडले संभ्रमात!

गोवा विकास पक्षातून मिकी पाशेको आमदार झाले. नंतर त्या पक्षालाच त्यांनी सोडचिठ्ठी दिली. सीताराम बांदोडकर यांनी स्थापन केलेल्या पक्षाचा उमेदवार आमदार झाला, ही त्यावेळी बांदोडकर कुटुंबीयांसाठी मोठ्या आनंदाची बाब ठरली होती. पाशेको यांचा त्यानंतरचा राजकीय प्रवास वळणावळणाने झाला. यंदा पुन्हा ते गोवा विकास पक्षात परतले. पर्वरी येथे पत्रकार परिषद घेऊन रीतसर घोषणाही झाली. पक्षाध्यक्ष सर्वेश यांनी शुभेच्छांचे फलकही झळकावले. आता मिकी युगोडेपाची भाषा बोलू लागले आणि ते कधी गोवा विकास पक्षातून युगोडेपात गेले, हे कोणालाच कसे समजले नाही, याचीच तर चर्चा सुरू झाली आहे!

कोण बरे असेल तो?

सावर्डे मतदारसंघात एक नवीन राजकीय पायंडा गोव्यासाठी घालून दिला असावा. या मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीवर तब्बल सहा जणांनी दावा केला आहे. मात्र, विद्यमान आमदार आणि सभापती गणेश गावकर यांचा अपवाद वगळता अन्य पाच दावेदार कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात एकाच वेळी आलेले दिसतात. मागच्या चतुर्थीच्या काळात या सर्वांनी एकत्रित गणेशदर्शन घेतले. त्यानंतर सरस्वती पूजन कार्यक्रमालाही ते एकत्र दिसले. रविवारी दीपक पाऊसकर यांच्या वाढदिवशीही हे सर्व इच्छुक उमेदवार एकाच वेळी दिसले. उमेदवारी कुणालाही मिळो, सावर्डेसाठी आम्ही एकत्र काम करू, असे त्यांनी या कार्यक्रमात स्पष्ट केले. पण तो उमेदवार कोण असेल, ते मात्र कळू शकले नाही.

राजधानीची सुरक्षा की मौनाची व्यवस्था?

राजधानीत गेल्या आठवड्यात घडलेल्या धक्कादायक घटनांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता राजधानी सुरक्षित आहे की नाही, यावरच चौकाचौकांत चर्चा रंगू लागली आहे. या चर्चेचा आवाज एवढा वाढला आहे की, पोलिसांनी उत्तर द्यावे तरी काय आणि गप्प राहावे तरी किती, असा प्रश्न पडला आहे. आता पोलिसांकडून खुलासा येणार की मौनालाच उत्तर समजायचे, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण राजधानीत चर्चा थांबवायची असेल, तर केवळ बंदोबस्त पुरेसा नाही; सुरक्षिततेचा विश्वासही जनतेला द्यावा लागतो!

Khari Kujbuj Political Satire
Goa Beach: समुद्रकिनाऱ्यांवर औषधांना दाद न देणारे जीवाणू, NIO चा निष्कर्ष; पावसाळ्यात 50 टक्के पाण्याची गुणवत्ता खराब

राहुल, युरींची मागणी पूर्ण होणे अशक्‍य

येत्‍या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्‍पष्‍ट बहुमत देण्‍याची विनंती लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते राहुल गांधी यांनी गोमंतकीय जनतेला केल्‍यानंतर आता विरोधी पक्षनेते युरी आलेमावही तशीच मागणी हात जोडून करीत आहेत. काँग्रेसला कमी जागा मिळाल्‍यास निवडून येणारे आमदार कोणत्‍याही परिस्‍थितीत भाजपात जाणार, हे माहीत असल्‍यामुळेच राहुल आणि युरींनी हा आटापिटा चालवला आहे. परंतु, प्रदेश काँग्रेसची दुर्दशा, स्‍थानिक नेत्‍यांचा सुशेगादपणा आणि त्‍यांच्‍यातील स्‍वार्थी प्रवृत्तीला काँग्रेसचे पारंपरिक आणि कट्टर मतदारही कंटाळले आहेत. त्‍यामुळे राहुल आणि युरींची मागणी त्‍यांच्‍याकडून पूर्ण होणे अशक्‍य असल्‍याची चर्चा राज्‍यात सुरू आहे.

चर्चेची चर्चा!

एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि माजी आमदार दयानंद सोपटे एकत्र आले. सध्या मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्याविरोधात पार्सेकर आणि सोपटे एकत्र, असे चित्र तयार झाले आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमात दामू, पार्सेकर आणि सोपटे यांच्या चर्चेला वाचा फुटली आहे. अशी कोणती चर्चा ते तिघे करत असावेत, याचे अंदाज वर्तवले जाऊ लागले आहेत. केवळ चहापानासाठी एकत्र आलो, असे सांगत दामू यांनी या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, तरी चर्चा तर होत राहणारच आहे!

प्रार्थनेची ताकद!

जिल्हा पंचायत सदस्य संदीप साळगावकर सोमवारी रात्री पर्वरी येथील श्री देव रामेश्वर मंदिराच्या नवरात्रोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी निवेदकाने त्यांच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेताना पंच, सरपंच ते जिल्हा पंचायत सदस्य असा उल्लेख केला. एवढ्यावरच न थांबता, साळगावकर यांनी भविष्यात आमदार आणि मंत्री व्हावे, अशा शुभेच्छाही दिल्या. मात्र, पर्वरीचे आमदार रोहन खंवटे सध्या मंत्रिपदावर असून, साळगावकर हे त्यांच्या गटातील मानले जातात. त्यामुळे निवेदकाच्या या शुभेच्छा केवळ सदिच्छा होत्या की त्यामागे आणखी काही राजकीय संकेत दडले होते, याची चर्चा पर्वरीत रंगू लागली आहे. आता या शुभेच्छा देवाच्या दरबारात केलेली प्रार्थना समजायची की राजकीय मनसुब्यांची नांदी!

ग्रंथालयातील पुस्तके

पुस्‍तके उदंड आहेत, पण ती किती वाचली जातात, कुठे वितरित होतात त्याचा कानोसा, धांडोळा कुणी घेतलाय का? पुस्तकाला २अनुदान मिळतं, पुस्तकं सरकारी खाती विकत घेतात, भरघोस पुरस्कार मिळतात. कुणाला दुखत नाही, खुपत नाही. आपल्या पोटाला चिमटा नाही. हल्लीच एक कन्नड लेखक गोव्यात आले होते. सेंट्रल लायब्ररीची कीर्ती ऐकून ते तेथे गेले. त्यांना ग्रंथालय आवडलं. त्यांनी विचारलं, मराठी पुस्तकं किती लोक वाचतात?. आहेत हजारो. शेकडो वाचतात. कोकणी किती? ही पुस्तकं तुलनेने कमी, घरी नेऊन वाचणाऱ्यांची संख्या कमी. लेखक अवाक्‌. इंग्रजी मात्र शेकडो वाचक. त्याने ही माहिती नंतर सोशल मीडियावर टाकली. कोकणी पुस्तकांची ही स्थिती गोंयकारांनाच माहीत नसावी. असाे. अनुदान, पुरस्कार आहेत तोपर्यंत कूल, भिवपा गरज नाच.

पाण्याचा हिशेब

गोव्यात पाण्याचा पुरेसा साठा आहे की नाही, यावरून सध्या जनतेच्या मनात प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पाण्याची टंचाई जाणवायला लागल्यानंतर सरकारची धावपळ सुरू होणार की त्याआधीच पर्यायी व्यवस्था उभी राहणार, याचीच चर्चा रंगू लागली आहे. कारण तहान लागल्यावर विहीर खणण्याची वेळ आली, तर उन्हाळा सरकारची परीक्षा घेणार हे नक्की! त्यामुळे केवळ आश्वासनांचे ढग न दाखवता, राज्यातील उपलब्ध पाणीसाठा, भविष्यातील गरज आणि संभाव्य टंचाई यांचा अधिकृत आकडेवारीसह अहवाल जनतेसमोर ठेवावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अखेर पाण्याच्या प्रश्नावर जनतेला आश्वासनांचे घोट मिळणार की प्रत्यक्ष पाण्याचा हिशेब?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com