

मंत्री, आमदारांना 'तो' आयोग नकोच आहे!
विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या की याआधी मंत्री, आमदार आपापल्या मतदारसंघांतील तरुण–तरुणींना वशिल्याने सरकारी नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत होते. सरकारी नोकऱ्या दिल्या की तरुणाई आपल्या बाजूने वळते हे त्या काळात सिद्धही झाले होते. त्यामुळे त्यांचे अधिक प्राधान्य सरकारी नोकऱ्या देण्यावर असायचे. परंतु, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतलेल्या निर्णयानुसार डिसेंबर २०२३ पासून सरकारी नोकऱ्या कर्मचारी भरती आयोगाद्वारे भरल्या जात आहेत. त्यामुळे सरकारी नोकऱ्या देण्यातील भ्रष्टाचार जवळपास संपुष्टात आला आहे. आता विधानसभा निवडणूक अवघ्या दहा महिन्यांवर येऊन ठेपल्याने मंत्री, आमदार याबाबतीत पुन्हा जागे झाले आहेत. पुन्हा एकदा या नोकऱ्या आयोगामार्फतच भरण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच ठासून सांगितले. तरीही काही मंत्री, आमदारांना जिंकण्याचा विश्वास नसल्याने ते मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आयोग बंद करण्याबाबतची मागणी करणार असल्याची कुजबूज सुरू आहे.
हुशार सरकार
ज्वलंत विषयावर जर सत्ताधाऱ्यांना घेरले व ज्वलंत विषय सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जायला लागले की सत्ताधारी नको असलेले विषय वर काढून विषयांतर करण्यात पटाईत असतात. आम जनतेचे लक्ष ज्वलंत विषयावरून दुसरीकडे वळविण्याचे षड:यंत्र रचल्याचा आरोप व्हायला लागला आहे. सध्या राज्यात भ्रष्टाचार, जमीन घोटाळा, जॉब स्कँडल, ‘३९-अ’ कलम, कॅसिनो, निसर्गाचा नाश असे अनेक विषय गाजत आहेत. ‘इनफ इज इनफ’ने सरकारच्या नाकीनऊ आणले आहेत. आता या विषयावरून आम जनतेचे लक्ष विशेष करून एसटी समाजाचे लक्ष विचलित करण्याच्या उद्देशाने राजकीय आरक्षणाचे गाजर पुढे केल्याची कुजबूज सुरू झाली आहे.
आता पुत्र आमने सामने?
विधानसभा निवडणुका सहा महिन्यांवर आल्याने फोंडा मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यात काँग्रेसचे राजेश वेरेकर आणि भाजपचे रितेश नाईक यांच्यात संभाव्य लढत होण्याची शक्यता आहे. दोन्ही नेत्यांची राजकीय पार्श्वभूमीही लक्षवेधी आहे. राजेश वेरेकर यांचे वडील स्व. शिवदास वेरेकर हे फोंड्याचे आमदार तसेच मंत्री होते, तर रितेश नाईक यांचे वडील स्व. रवी नाईक हे आमदार आणि माजी मुख्यमंत्री राहिले आहेत. १९८९ मध्ये दोघांचे वडील वेगवेगळ्या मतदारसंघांत मगोचे आमदार होते. त्यानंतर १९९४ आणि १९९९ मधील निवडणुकांमध्ये रवी नाईक आणि शिवदास वेरेकर यांच्यातील राजकीय सामना चर्चेत राहिला होता. गेल्या निवडणुकीतही रवी नाईक यांचा सामना राजेश वेरेकर यांच्याशी झाला होता. आता मात्र आगामी निवडणुकीत फोंड्यात प्रथमच या दोन दिवंगत नेत्यांचे पुत्र आमने-सामने येण्याची शक्यता आहे. हा सामना प्रत्यक्षात झाला तर त्याला राजकीयबरोबरच भावनिक रंगही लाभू शकतो.
आता पुत्र आमने सामने?
विधानसभा निवडणुका सहा महिन्यांवर आल्याने फोंडा मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यात काँग्रेसचे राजेश वेरेकर आणि भाजपचे रितेश नाईक यांच्यात संभाव्य लढत होण्याची शक्यता आहे. दोन्ही नेत्यांची राजकीय पार्श्वभूमीही लक्षवेधी आहे. राजेश वेरेकर यांचे वडील स्व. शिवदास वेरेकर हे फोंड्याचे आमदार तसेच मंत्री होते, तर रितेश नाईक यांचे वडील स्व. रवी नाईक हे आमदार आणि माजी मुख्यमंत्री राहिले आहेत. १९८९ मध्ये दोघांचे वडील वेगवेगळ्या मतदारसंघांत मगोचे आमदार होते. त्यानंतर १९९४ आणि १९९९ मधील निवडणुकांमध्ये रवी नाईक आणि शिवदास वेरेकर यांच्यातील राजकीय सामना चर्चेत राहिला होता. गेल्या निवडणुकीतही रवी नाईक यांचा सामना राजेश वेरेकर यांच्याशी झाला होता. आता मात्र आगामी निवडणुकीत फोंड्यात प्रथमच या दोन दिवंगत नेत्यांचे पुत्र आमने-सामने येण्याची शक्यता आहे. हा सामना प्रत्यक्षात झाला तर त्याला राजकीयबरोबरच भावनिक रंगही लाभू शकतो.
म्हापशाचा ‘सावकार’ जोमात!
विधानसभा निवडणूक जवळ आल्याने इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. म्हापसा मतदारसंघही त्यास अपवाद नाही. सत्ताधारी भाजपचे तिकीट आपल्यालाच मिळावे, अशी इच्छा एका सावकाराने म्हणजे बोलून दाखविली आहे. त्यासाठी त्यांनी मतदारसंघात गाठीभेटी आणि बैठकांचे सत्रही सुरू केले आहे. मतदारसंघातील होतकरू आणि सक्रिय तरुणांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नुकतीच त्यांनी अनेक कार्यकर्त्यांची भेट घेऊन म्हापसा शहरासाठीचे आपले व्हीजन आणि प्रेम त्यांच्यासमोर मांडले. भाजपचे तिकीट आपल्यालाच मिळेल, असा विश्वास त्यांना आहे. मात्र सद्यःस्थितीत अनेक कार्यकर्ते त्यांना उघडपणे पाठिंबा देण्यास कचरत आहेत. कार्यकर्त्यांची ही द्विधा मनःस्थिती दूर करण्यासाठी आगामी तीन-चार दिवसांत अशीच आणखी एक महत्त्वाची बैठक घेणार असल्याची चर्चा आहे. आता ते या कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने वळवण्यात आणि भाजपचे तिकीट मिळवण्यात यशस्वी होतात का, हे येणारा काळच ठरवेल. विशेष म्हणजे, जोशुआचे समर्थक देखील या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत म्हणे!
‘एक पेड़ माँ के नाम’ की फोटोसाठीच काम?
गेल्या वर्षी ‘एक पेड़ माँ के नाम’ उपक्रमात भाजप कार्यकर्त्यांनी रोपटी लावत सोशल मीडियावर फोटोची जोरदार लागवड केली. यंदाही हा उपक्रम पुन्हा होणार असून कार्यकर्त्यांना दोन फोटो पाठवण्याचे आदेश आले आहेत...एक नवीन रोपट्याचा आणि दुसरा गतवर्षी लावलेल्या रोपट्यासोबतचा! नवीन रोपटं मिळेलही, पण गेल्या वर्षीचं रोपटं अजून जिवंत आहे का?, ते कुठे लावलं होतं? त्याला पाणी मिळालं का? हे प्रश्न आता कार्यकर्त्यांनाच पडले आहेत म्हणे. एका नेत्याने नुकताच, ‘गतवर्षीचं रोपटं अजून आहे ना?’ असा प्रश्न विचारताच कार्यकर्त्यांत एकच हशा पिकला. त्या हशातच बहुतांश रोपट्यांचं भविष्य दडलं होतं!
संतोष सायबाला सेवावाढ!
दक्षिण गोव्याचे ‘एसपी’ संतोष देसाई हे या महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होणार आहेत. ३१ मे हा त्यांचा सेवाकाळाचा शेवटचा दिवस असेल. आता संतोष सायब खरोखरच त्या दिवशी रिटायर्ड होणार की त्यांना सेवावाढ मिळणार याबाबत दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयात खुमासदार चर्चा सुरू आहे. या जिल्ह्याच्या एसपी पदासाठी दोन अधिकारी रेसमध्ये आहेत. त्या दोन्ही साहेबांनी यापूर्वी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकपद भूषविले आहे. त्यांना आता परत एकदा या खुर्चीवर विराजमान व्हायचे आहे. परंतु संतोष देसाई यांचे काम सरस आहे, शिवाय त्यांनी आपले सर्वांशी चांगले संबंध राखले आहेत. ते वादांपासूनही दूर राहिले आहेत. आता बघुया, यापुढे काय घडणार ते. तूर्त वेट अॅण्ड वॉच.
बाबूंची कॉलर ताठ
गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर हे अखिल भारतीय सेपाक टाकरो संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मलेशिया येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने उपविजेतेपद मिळविले. ज्या मलेशियात सेपाक टाकरो हा राष्ट्रीय खेळ आहे, त्या मलेशियाला भारतीय संघाने अंतिम सामन्यात अगदी चिवट अशी झुंज दिली. त्यामुळे या रौप्यपदकाची झळाळी अधिकच वाढली. या उपविजेत्या भारतीय संघाबरोबर बाबू जेव्हा दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले, तेव्हा ढोलांच्या गजरात या संघाचे स्वागत करण्यासाठी फक्त दिल्लीतीलच नव्हे तर चक्क हरयाणा येथून चाहते आले होते. या स्वागताचे व्हिडिओ सध्या गोव्यात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे बाबू सध्या अधिकच खुशीत आहेत.
प्रदेश काँग्रेसमध्ये पसरले चैतन्य
डी. के. शिवकुमार कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार असल्याचे निश्चित होताच, गोवा काँग्रेसचे पदाधिकारीही खूष झाले आहेत. डी. के. शिवकुमार गोव्याला परिचित आहेत. गेल्या काही विधानसभा निवडणुकांवेळी गोव्यात येऊन त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना सहकार्य तसेच मार्गदर्शन केले आहे. कर्नाटकातील शेकडो नागरिक गोव्यात स्थायिक झाले असल्याने २०२७च्या विधानसभा निवडणुकीत शिवकुमार यांचा प्रदेश काँग्रेसला आणखी फायदा मिळू शकतो, असा विश्वास प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना आहे. याच कारणामुळे प्रदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मात्र खळबळ माजल्याची चर्चा आहे.
फोंडा मतदारसंघ कमनशिबीच!
फोंड्याचे नशीब तरी किती परीक्षा पाहणार, असा सवाल आता मतदारच विचारू लागले आहेत. गेले सात महिने मतदारसंघाला आमदार नाही. ‘आमदार नसला तरी चालेल, पण पोटनिवडणूक तरी घ्या’ अशी हाकाटी सुरू होती. अखेर सरकार आणि निवडणूक आयोगाला दया आली आणि पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यानंतर काय, इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली, कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली, प्रचारसभांत आरोप-प्रत्यारोपांचे फटाके उडाले. काहींनी तर नवीन कपडे शिवून घेतले, तर काही कार्यकर्त्यांनी ‘आमचेच साहेब जिंकणार’ म्हणून आधीच जल्लोषाची तयारीही केली होती म्हणे! पण मतदानाच्या आदल्या दिवशीच अचानक निवडणूक रद्द झाली आणि सगळ्यांचाच हिरमोड झाला. आता ‘माशी कुठे शिंकली?’ याचा शोध घेत राजकीय पंडित अजूनही डोके खाजवत आहेत. विशेष म्हणजे, पुढील विधानसभा निवडणूक पुढच्या वर्षी मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. म्हणजे तोपर्यंत फोंडा तब्बल दीड वर्ष आमदारविनाच!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.