खरी कुजबुज: जनता केवळ मतांसाठी!

Khari Kujbuj Political Satire: वैद्यकीय अभ्‍यासक्रम प्रवेशासाठी महत्त्‍वपूर्ण असलेल्‍या ‘नीट’ परीक्षेचे पेपर फुटल्‍याने केंद्र सरकारने ही परीक्षा नव्‍याने घेतली.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

जनता केवळ मतांसाठी!

वैद्यकीय अभ्‍यासक्रम प्रवेशासाठी महत्त्‍वपूर्ण असलेल्‍या ‘नीट’ परीक्षेचे पेपर फुटल्‍याने केंद्र सरकारने ही परीक्षा नव्‍याने घेतली. परंतु या पेपरफुटीचा देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना फटका बसल्‍याने सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्‍यासह कॉक्रोच जनता पार्टीचे संस्‍थापक अभिजीत दीपके यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन छेडले आहे. पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्‍या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही त्‍यांची प्रमुख मागणी आहे. या आंदोलनात उपोषणाला बसलेल्‍या वांगचूक यांची प्रकृती बिघडल्‍याने त्‍यांना शनिवारी उपचारांसाठी इस्‍पितळात दाखल करण्‍यात आले. परंतु, वांगचूक आणि दीपके यांनी ज्‍या विद्यार्थ्यांच्‍या भवितव्‍यासाठी हे आंदोलन छेडले आहे, त्‍या आंदोलनाचे गोव्‍यासह देशभरातील विद्यार्थी, त्‍यांचे पालक आणि महत्त्‍वाचे म्‍हणजे विरोधी पक्षांना कोणतेही सोयरसुतक नसल्‍याचे दिसत आहे. ‘आप’ आणि काही सामाजिक कार्यकर्ते वगळले, तर गोव्यातील प्रदेश काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, ‘आरजी’ हे विरोधी पक्ष मूग गिळून गप्‍प असल्‍याने या पक्षांना केवळ मतांसाठीच जनतेची गरज असल्‍याची नाराजी अनेकांकडून व्‍यक्त होऊ लागली आहे. ∙∙∙

चोरांसाठीही मध्यस्थी!

काहीजण आपण समाजकार्यकर्ते असल्याचा आव आणतात; पण त्यांच्या या समाजसेवेमागे भलतेच उद्योग चाललेले असतात. मडगाव कोकण रेल्वे परिसरातही असाच एक समाजकार्यकर्ता राहात असून त्याची नेहमीच पोलिसांत ऊठबस सुरू असते. काही दिवसांपूर्वी कोकण रेल्वे पोलिसांनी काही मोबाईल चोरट्यांना अटक केली होती. त्यावेळी हा तथाकथित समाजकार्यकर्ता पोलिसांना ते चोरटे नाहीत, आपल्या ओळखीचे कामगार आहेत, असे सांगायला गेला होता. त्यामुळे पोलिस त्यांना सोडून देण्याच्या वाटेवर होते; पण काहीजणांनी त्यावेळी हा विषय लावून धरल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली असता त्या चोरट्यांकडे थोडेथोडके नव्हे तर तब्बल ५० चोरीचे मोबाईल सापडले. अशा या अट्टल चोरट्यांच्या मदतीला तो समाजकार्यकर्ता धावून आला होता. सध्या या समाजकार्यकर्त्याला येत्या पालिका निवडणुकीत उभे राहून नगरसेवक होण्याची स्वप्नेही पडू लागली आहेत, अशी चर्चा सुरू आहे! ∙∙∙

आदेश न्यायालयाचा, सुरक्षा कुणाची?

मोरजीत वकिलावर हल्ला झाला, तो गंभीर जखमी झाला, बार असोसिएशनने निषेधही केला. सरकारकडे वकिलांच्या संरक्षणाचा कायदा मंजूर करण्याची मागणी केली, हे सगळे ठीकच. पण लोकांच्या गप्पांचा विषय काही वेगळाच आहे. हा प्रकार घडला तेव्हा न्यायालयाच्या पाडकाम आदेशावेळी पोलिस बंदोबस्त नेमका कुठे गेला होता? आदेश न्यायालयाचा होता तर अंमलबजावणीही कायदेशीरच! मग सुरक्षा कागदावर होती की घटनास्थळी, असा प्रश्न लोक विचारू लागले आहेत. आता वकिलांच्या सुरक्षेसाठी कायदा हवा, ही मागणी योग्यच. पण त्याचबरोबर विद्यमान यंत्रणा त्या दिवशी नेमकी का अपयशी ठरली, याचे उत्तरही लोकांना हवे आहे. कारण कायदे नंतर होतील; पण जेव्हा गरज होती तेव्हा सुरक्षा कुठे होती, हा प्रश्न अजूनही उत्तराच्या प्रतीक्षेतच आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेने एकदा स्पष्टपणे भूमिका मांडली, तर लोकांच्या मनातील ही ‘घालमेल’ तरी थांबेल! ∙∙∙

मोपा विमानतळ आणि सुरक्षा यंत्रणा

सुके कुळण येथे गुन्हे शाखेने छापा टाकून सोन्यासह दोघांना पकडले. त्यातला एक तर थेट दुबईहून मोपा विमानतळावर उतरला. मग आता एकच प्रश्न फिरू लागला आहे की, जर इतका मौल्यवान माल घेऊन प्रवासी विमानतळावरील सर्व तपासण्या पार करू शकतो, तर मोपा विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा नेमकी काय तपासत होती? लोक म्हणतात, गुन्हे शाखेचे डोळे एवढे तीक्ष्ण असतील तर विमानतळावरील यंत्रणांचे चष्मे बदलण्याची वेळ आली की काय? की गुन्हे शाखेकडे ‘गुप्त टीप’ होती आणि विमानतळाकडे ‘नो टीप’? अर्थात, या चर्चेत तथ्य किती आणि तर्क किती, हे तपासातूनच स्पष्ट होईल. पण जनतेच्या मनात एकच प्रश्न घर करून बसला आहे. आम्ही खरोखर सुरक्षित आहोत ना? ∙∙∙

कोकणी पुस्तकातील नवा घोळ

कोकणी (आणि इतर विषयांतीलही) पाठ्यपुस्तके तयार करताना आजवर अनेक घोळ घालणाऱ्या गोवा ‘एनसीआरटीई’ मंडळाने आठवीचे कोकणी पुस्तक तयार करताना आता आणखी एक घोळ करून ठेवला आहे. गोव्याची विंडसर्फर कात्या कुएल्हो हिच्यावर असलेल्या एका धड्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्‌घाटनाच्या प्रसंगी ज्योत घेऊन आलेल्या कात्यासोबत भारतीय महिला हॉकी संघाच्या कर्णधार हरमनप्रीत सिंग या उपस्थित होत्या. मात्र, या धड्यात त्याऐवजी क्रिकेट संघाच्या कर्णधार हरमनप्रीत कौर असा उल्लेख केला. आता यावर खुलासा करताना शिक्षण संचालक मेघना शेटगावकर यांनी नामसाधर्म्य असल्याने हा ‘ध’ चा ‘मा’ झाल्याचे म्हटले आहे. या पुस्तकाच्या निर्मिती मंडळावर शेटगावकर यांच्यासह ‘एनसीआरटीई’ मंडळाच्या प्रशासकीय संचालक सरिता गाडगीळ यांच्यासह ‘एनईपी’चे समन्वयक रूपेश सावंत आणि अर्चना शेट्ये हे आहेत. त्याशिवाय परीक्षण मंडळावर प्रा. धर्मा चोडणकर, गोपीनाथ गावस आणि प्रा. रजत हेगडे ही प्राध्यापक मंडळी आहे. असे असतानाही हा ‘ध’ चा ‘मा’ झालाच कसा? आता यावर कोकणी म्हालगडे आणि बालगडे काय बोलतात ते पाहूया.∙∙∙

बोलविता धनी!

काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या दोन्ही पक्षांमध्ये युती असताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विजय सरदेसाई यांना ‘ज्युदास’ म्हणण्याची घटना घडल्यावर गदारोळ माजला होता. मात्र, नंतर या वादावर पडदा पडला. आता पुन्हा एकदा त्याचीच पुनरावृत्ती होत तर नाही ना? असा प्रश्न गोवा फॉरवर्डचे कार्यकर्ते उपस्थित करू लागले आहेत. याचे कारण म्हणजे विजय सरदेसाई हे काल पहाटे गोव्यात पोहोचल्यावर फॉरवर्डच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषी स्वागत केले. याचे वृत्त सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यावर युरी आलेमाव यांचे जवळचे कार्यकर्ते सप्नील देसाई यांनी त्यावर कमेंट करताना, ‘तंबू नसताना विदूषकांच्या घोळक्याने केलेली सर्कस’ असा उल्लेख केला आहे. आता ही कमेंट सप्नील यांचीच की येथेही बोलविता धनी आणखी कोण आहे? हा सवाल केला जात आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Under 19 Cricket Team: गोव्याच्या युवा संघाचा रोमहर्षक विजय, कमी धावसंख्येच्या सामन्यात हिमाचलला दोन विकेटने नमविले

पहाटेचा जल्लोष!

‘यूके’मध्ये पीपल्स ॲवॉर्ड घेण्यासाठी गेलेले गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई हे काल गोव्यात पोहोचले. त्यावेळी पहाटेचे साडेतीन वाजले होते; पण त्यांचे स्वागत करण्यासाठी विकास भगत, मेश्यू डिकॉस्टा यांसारख्या भरभक्कम आवाजी कार्यकर्त्यांसह बरेच कार्यकर्ते दाबोळी विमानतळाच्या बाहेर हजर होते. ज्यावेळी विजय विमानतळाच्या बाहेर आले, तेव्हा अगदी बँडबाजाच्या साथीने त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी मेश्यूने ‘गोवा का सीएम कैसा हो, विजय सरदेसाई जैसा हो’ अशा घोषणाही दिल्या. पहाटेच्यावेळी दाबोळी येथे सुरू असलेला हा जल्लोष पाहून काहीजणांना विमानतळावर उतरलेले विजय गोव्याचे नसून कदाचित तामिळनाडूतील असावेत, असे वाटल्याशिवाय राहिले नाही! ∙∙∙

अपघात आणि ठप्प प्रवास

गोवा-जांबोटी-चोर्ला मार्गावर एक अपघात झाला आणि क्षणार्धात वाहनांच्या रांगा किलोमीटरपर्यंत वाढल्या. एखाद्या रुग्णवाहिकेला वाट मिळाली असती की नाही, हा प्रश्नच! रस्त्यांची क्षमता, वाहतूक नियोजन आणि पर्यायी मार्गांची व्यवस्था याबाबतची पोलखोल पुन्हा एकदा झाली. एक वाहन अडखळले की संपूर्ण यंत्रणाच गुडघे टेकते, हे या घटनेने अधोरेखित केले. अपघात दुर्दैवी असतोच; पण त्यानंतर निर्माण होणारा वाहतूक गोंधळ हा आपल्या व्यवस्थेच्या तयारीचा आरसाच ठरतो. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Dairy Consultant Appointment: कन्सल्टंट नियुक्तीखाली पैशांची उधळपट्टी; गोवा डेअरीवर दूध उत्पादकांचा आरोप

मराठी अकादमीत बदल का नाही?

गोवा मराठी अकादमीची समिती सध्या चर्चेचा विषय बनली आहे. दहा वर्षे झाली तरीही समिती काही बदलताना दिसत नाही. सरकार अनुदान प्राप्त संस्थांच्या समित्या दर तीन वर्षांनी बदलत असताना याच संस्थेवर सरकारची एवढी मेहरनजर का? यावर सध्या विविध अँगलने चर्चा सुरू आहे. यामुळे या संस्थेची ही समिती कायद्यात बसते की नाही, याचाही उहापोह सुरू आहे. बुद्धिवादी म्हणणारे साहित्यिकच जर इतरांना संधी न देता प्रदीर्घ काळ खुर्चीला चिकटून बसायला लागले तर मग राजकारण्यांना दोष देण्यात अर्थ तो काय राहिला, असेही लोक बोलायला लागले आहेत. मुख्यमंत्री याबाबतीत काय निर्णय घेतात, यावर लोकांचे लक्ष लागून राहिले आहे. आता बघूया ‘देरसे आये दुरुस्त आये’, असे होते की नाही ते? ∙∙∙

लेडी सिंघमचा दरारा...

गोव्यात पोलिस खात्यात पुरुष सिंघम काही कमी नाहीत. आता त्यात महिला सिंघमचीही भर पडू लागली आहे. मडगाव पोलिस ठाण्यात एक अशीच लेडी ‘पीएसआय’ आहे. तिचा दरारा भलताच आहे. ती कुणाला जुमानत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही ती किमत देत नाही. मडगाव पोलिस ठाण्यात ती एकमेव महिला ‘पीएसआय’ असल्याने तिचे सारे नखरे बिचाऱ्या पोलिसांना मुक्याट्याने सहन करावे लागतात. कधी तिची दुसरीकडे बदली होईल, या प्रतीक्षेत या मॅडमच्या हाताखाली कार्यरत असलेले पोलिस आहेत. या पोलिसांचे स्वप्न लवकर पूर्ण होण्याची तशी शक्यता धुसरच आहे म्हणा. कारण मॅडमचा राजकीय वशिला पॉवरफुल आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com