

योग दिनावरून राजकारण करू नका!
आंतरराष्ट्रीय योग दिनावरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. योग हा कोणत्याही धर्माशी संबंधित नसून जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त आंतरराष्ट्रीय दिवस असल्याचे काहीजण म्हणत आहेत. ‘एकदा घोषित झालेला आंतरराष्ट्रीय दिवस बदलता येतो का? नाताळच्या तारखेबाबत कधी अशी मागणी झाली आहे का?’ असा सवालही उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे, रविवारी ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जात असल्याने योग शिबिरांना उपस्थितीची सक्ती करू नये, अशी मागणी काहींकडून होत आहे. या भूमिकेलाही समाजातील काही घटकांचा पाठिंबा मिळत असून, यावरून विविध स्तरांत चर्चा रंगली आहे.
‘अपक्ष’ राहण्याची तयारी!
२०१२ पासून विधानसभेसह इतर सर्व निवडणुका सातत्याने जिंकणाऱ्या भाजपसमोर आगामी विधानसभा निवडणुकीत मोठे संकट उभे राहिले आहे ते उमेदवारी देण्याचे. विविध मतदारसंघांत अनेक इच्छुकांकडून आताच उमेदवारीवर दावा केला जात आहे. त्यात सावर्डे, पेडणे, मांद्रे आदी मतदारसंघांचा समावेश असल्याने भाजप तेथे काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. दुसरीकडे, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी ५० टक्के नवे चेहरे देण्याची घोषणा केल्यापासून भाजपच्या विद्यमान २८ मधील काही आमदार आतापासूनच पर्याय शोधत आहेत. त्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा ताबा घेतल्यानंतर काँग्रेस सोडून गेलेल्यांना पक्षात स्थान देणार नसल्याची भूमिका गिरीश चोडणकर यांनी घेतल्याने भाजपमधील अनेक इच्छुकांनी उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून उभे राहण्याची तयारी सुरू केल्याच्या चर्चा आहेत.
असंतुष्टांच्या मनात काय?
एल्विस गोम्स हे तसे हुशार व्यक्तिमत्त्व. सरकारी सेवेत अधिकारी म्हणून त्यांचा दरारा व रुबाब होता. मात्र, राजकारण त्यांना तेवढे जमले नाही. असे असले तरी ते बरेच आशावादी आहेत. त्यांनी एकवेळा ‘आप’च्या उमेदवारीवर कुंकळ्ळी मतदारसंघातून निवडणूक लढविली व दुसऱ्या वेळी पणजी मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर ते लढले. मात्र, त्यांना अपयश आले. आता पुन्हा एकदा ते राजकारणात व समाजकारणात बरेच सक्रिय झाले आहेत. ‘इनफ् इज इनफ्’च्या बावट्याखाली ते सक्रिय आहेत. एल्विस गोम्स पुन्हा कुंकळ्ळीतून निवडणुकीत उतरणार असल्याचे चित्र आहे. भाजपविरोधी पक्षातील काही नेते एल्विस गोम्स यांना पुढचा ‘मंत्री’ म्हणून पाहत आहेत. आता पाहूया जनतेच्या मनात काय आहे? ∙
फातोर्ड्यातही कमळ फुलेल?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे फातोर्डा मतदारसंघाचे माजी आमदार. आता ते प्रदशाध्यक्ष झाल्याने फातोर्ड्यात काय? असा प्रश्न साहजिकपणे राजकीय वर्तुळात चर्चेत असतो. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई सध्या फातोर्ड्याचे आमदार आहेत. त्यामुळे आता पुढे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर नाईक यांनी फातोर्ड्यातही या खेपेला कमळ फुलेल, असे सांगून उत्कंठा वाढवली आहे. फातोर्ड्यातून भाजपचा उमेदवार कोण? याविषयी चर्चेला नाईक यांच्याच वक्तव्याने खतपाणी मिळाले आहे.
३८ किलोचा केक
संकेत आर्सेकर यांचा वाढदिवस होऊन तीन दिवस उलटले तरी त्या समारंभाच्या आयोजनाच्या वार्ता अजूनही सावर्डेच्या लाेकांमध्ये सुरू आहेत. त्यांच्या वाढदिवसाला काले येथील युवकांनी तब्बल ३८ किलाेचा केक बनवून आणला होता. कालेचे माजी सरपंच किशोर देसाई यांनी आपल्या सहकाऱ्यांच्यावतीने संकेतला हा केक भेट म्हणून दिला. संकेतचा यंदाचा वाढदिवस ३८वा होता. त्यामुळे त्यांच्या वयाच्या वजनाचा केक तयार करून कालेच्या या युवकांनी एक अनोखी भेट संकेतला दिली असेच म्हणायचे का?
वाढदिवसाचे कवित्व!
मुख्यमंत्र्यांचे संयुक्त सचिव संकेत आर्सेकर यांनी वाढदिवस साजरा करताना आता माघार नाही, असे सूचक उद्गार काढले. आर्सेकर हे भाजपचे सावर्डे मतदारसंघातील उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. तेथे सध्या सभापती गणेश गावकर हे भाजपचे आमदार आहेत. माजी खासदार विनय तेंडुलकर हेही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र, असे वाढदिवस कितीतरी साजरे होतात. सहा-सहा महिन्यांनी वाढदिवस साजरे होत असतात, असे सांगून आर्सेकर यांच्या वक्तव्याची दखल घेत नसल्याचे गावकर यांनी सूचित केले आहे.
आठजणांचे स्मरण!
मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आल्यानंतर काही महिन्यांनी आठ आमदार फुटले आणि भाजपमध्ये सामील झाले. काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत, त्यामुळे पक्षाने ‘या आठ धोकेबाजांना लक्षात ठेवा’ म्हणून समाजमाध्यमांतून प्रचार सुरू केला आहे. आपल्या समाजमाध्यमांतील पेजवर आठही आमदारांच्या छायाचित्रांसह ‘धोकेबाज’ नावाखाली पोस्ट व्हायरल केली आहे. या आठांनी मंदिरे, चर्च आणि इतर धार्मिक स्थळांना भेटी देऊन, आपण काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहू आणि प्रामाणिकपणे सेवा करू, असे गोव्याच्या जनतेला आश्वासन दिले होते, हे लोकांनी आठवावे, असेच काँग्रेसला सुचवायचे आहे का? सध्या काँग्रेसचा डिजिटल मीडिया विभाग सक्रिय झाला आहे, त्यातच ‘एआय’च्या मदतीने वेगवेगळ्या पोस्ट तत्काळ अपलोड करणारे लोकही कामाला लागेल आहेत, हे यावरून दिसते.
मायकलची जादू चालेल?
कळंगुटमध्ये सध्या वाढदिवसाच्या केकपेक्षा एका घोषणेचीच जास्त चर्चा आहे. मायकल लोबो यांनी आपल्या वाढदिवशी मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले की, पुढची निवडणूक आपण भाजपच्या तिकिटावरच लढवणार! हे ऐकून काहीजणांना मागची निवडणूक आठवली. त्यावेळी भाजपचे तिकीट सोडून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. कारण मतदारसंघात भाजपला मतदान मिळणार नाही, अशी हवा होती; पण आता पुन्हा भाजपच्या तिकिटाची चर्चा सुरू झाल्याने लोकांच्या डोक्यात नवे प्रश्न उभे राहिले आहेत. राजकारणात कायमस्वरूपी मित्र नसतात, शत्रू नसतात आणि कधी-कधी पक्षही कायमस्वरूपी नसतात. त्यामुळे सध्या कळंगुटमध्ये एकच चर्चा आहे की मायकलना कमळ लाभणार का?
पेडण्याचा उमेदवार कोण?
पेडणे मतदारसंघात सध्या राजकारणाची भन्नाट चर्चा रंगली आहे. एकेकाळी आमदार, मंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळलेले बाबू आजगावकर पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे सांगत आहेत. ‘मी लढणारच!’ हा त्यांचा आत्मविश्वास पाहून कार्यकर्त्यांची छाती फुगत असली, तरी काहींच्या कपाळावर आठ्याही पडू लागल्या आहेत. कारण प्रश्न साधाच आहे... पक्ष एकच, तिकीट एकच आणि इच्छुक मात्र दोन! सध्या मतदारसंघात प्रवीण आर्लेकर भाजपचे आमदार आहेत. तेही तिकीट आपलेच असल्याच्या विश्वासात आहेत. दुसरीकडे आजगावकरही ‘लढणारच’ असे ठामपणे सांगत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते गोंधळलेले आहेत. या दोन उमेदवारांव्यतिरिक्त इतरही काहीजण या तिकिटासाठी इच्छुक असल्याने पेडण्यात गंमत वाढली आहे.
गोवा फॉरवर्डचे आकर्षण?
राजकारणात कधी काय होणार, हे सांगता येत नाही. तामिळनाडू राज्यात सिनेअभिनेता असलेल्या विजय यांच्या नव्या पक्षाच्या हाती जनतेने सत्तेची धुरा सोपवली. बंगालात ममता दिदीला जोर का झटका दिला. गोव्यातही येणाऱ्या निवडणुकीत असेच काही वेगळे घडणार का? गोव्यात स्थानिक पक्षाचे राज्य येणार का? अशी चर्चा खासकरून युवावर्गात सुरू आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे आकर्षण दक्षिणेतील युवकांना व्हायला लागले आहे. अनेक युवक गोवा फॉरवर्डशी जोडण्यास उत्सुक असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, विजय सरदेसाई यांचे अजून तळ्यात-मळ्यात चालल्याने युवक थोडे गोंधळलेले असल्याचेही चित्र आहे. ‘चल या फुडें’ हा नारा घेऊन जर विजय आताच बाहेर पडले तर काही तरी बदल घडू शकतो, असा कयास काही राजकारणी व्यक्त करतात. आता पाहूया हा कयास खरा ठरतो की, फुसका बार!
पक्षाचे नवे कार्यालय कधी?
काँग्रेस पक्षाचा चेहरा-मोहरा बदलणारा नेता सध्या भाजपच्या मंत्रिमंडळात आहे; परंतु त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यालय बदलाची चर्चा वारंवार होत राहिली. आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसकडे येणाऱ्या लोकांची गर्दी पाहता कार्यालयातील जागा अपुरी पडते. याशिवाय पक्षाच्या खजिनदारपदाची जबाबादारी स्वीकारल्यानंतर दत्ता नायक यांनी पत्रकार परिषदेत नव्या कार्यालयाची संकल्पनाही व्यक्त केली होती. आता ही संकल्पना सत्यात उतरवण्याचे काम निवडणुकीपूर्वी होणार की सत्ता आल्यानंतर होणार, हे काँग्रेसवाल्यांना कधीतरी जाहीर करावेच लागेल. काँग्रेससारख्या जुन्या पक्षाला अजूनही नव्या कार्यालयाची कल्पना सत्यात उतरवता आलेली नाही, अशी खंत जुन्या कार्यकर्त्यांना आणि येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वाटतेय.
चमच्यांची लुडबूड!
म्हापसा पालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपून कारभार प्रशासकांच्या हाती गेला असला, तरी राजकीय हस्तक्षेप थांबलेला नसल्याची चर्चा आहे. एका बड्या लोकप्रतिनिधीच्या निकटवर्तीय तरुणाचा पालिकेतील वावर वाढला असून तो कर्मचाऱ्यांप्रमाणे फाईल्स चाळत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या प्रकारावर आक्षेप घेत एका सामाजिक कार्यकर्त्याने ‘सीसीटीव्ही’ फुटेजची मागणी केली होती. मात्र, संबंधितांवर नाराजी ओढवू नये म्हणून अधिकाऱ्यांनी फुटेज देण्याचे टाळल्याची चर्चा आहे. पालिका मंडळ बरखास्त झाल्यानंतर या बाहेरील व्यक्तीचा हस्तक्षेप अधिक वाढल्याचे बोलले जात आहे. महत्त्वाच्या फाईल्स व कागदपत्रांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे प्रशासक याप्रकाराची दखल घेऊन हस्तक्षेपाला लगाम लावणार की कारभार, असाच पडद्यामागून चालणार, याकडे म्हापसावासीयांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.