खरी कुजबुज: सरकारची अशीही हुशारी!

Khari Kujbuj Political Satire: कारापूरवासीयांनी पणजीत धडक दिली. आपल्या गावातील निसर्गाच्या रक्षणासाठी त्यांनी क्रांतिदिनी पणजीत आंदोलनाचा विचार केला होता.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

सरकारची अशीही हुशारी!

कारापूरवासीयांनी पणजीत धडक दिली. आपल्या गावातील निसर्गाच्या रक्षणासाठी त्यांनी क्रांतिदिनी पणजीत आंदोलनाचा विचार केला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि पार जुनेगोवेला नेले. सरकारच्या या वागणुकीविरोधात त्यांच्या मनात विचार येणे साहजिक होते. मात्र, सरकारने त्यांच्याविरोधात गुन्हे न नोंदवण्याचा विचार केला. महिलांना जुनेगोवेतून कारापूर येथे सोडण्यासाठी बसची व्यवस्था केली. यातून आमच्याविरोधात सरकार नाही तर सरकारमधील काही घटक आहेत, हे बिंबवण्याचा यशस्वी प्रयत्न झाल्याचे दिसत आहे. आंदोलकांंप्रती सरकारने दाखवलेली सहानुभूती त्याचमुळे चर्चेची ठरली आहे.

आता दिगंबर कामतांचा दरबार!

जनतेशी कनेक्ट राहिले तरच जनता नेत्यांना निवडून देते. जनतेशी कनेक्ट राहण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रत्येक आठवड्यात आपल्या मतदारसंघात ‘जनता दरबार’ भरवतात. आता सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनीही आपल्या मतदारसंघात ‘जनता दरबार’ सुरू केला आहे. मडगावकरांना भेटण्यासाठी ते दरबार भरवितात. केवळ दरबार घेतला म्हणून होत नाही, तर दरबारात येणाऱ्या लोकांची कामेही व्हायला पाहिजेत. त्याचीही खबरदारी दरबार घेणाऱ्यांनी घ्यायला नको का?∙

थातूरमातूर कारणे अन्‌ सारवासारव...

वीज बिल भरमसाट येत असल्याने आता लोकांमध्ये असंतोष वाढला आहे. लोक वाढीव बिल घेऊन वीज कार्यालयात येतात व अभियंत्यांना त्याबाबत प्रश्न विचारतात. नेमका काय सावळागोंधळ आहे, हे बिचाऱ्या लोकांनाही उमजेनासे झाले आहे. टॅरिफ रेट वाढल्याने ही वाढीव बिले येत असल्याचे वीज खात्याचे अधिकारी लोकांना सांगतात. त्यात तथ्य आहे. मात्र, पूर्वी महिन्याकाठी बिल येत होते आता दोन-तीन महिन्यांनी येते त्याचे काय? असा सवाल लोकांनी केला तर आमच्या स्टाफला जनगणना कामाची जबाबदारी सोपवली होती, त्यामुळे बिल देण्यास विलंब लागला, असे उत्तर देऊन येथे लोकांची बोळवण केली जाते. बुधवारी सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो यांनी वीज बिल वाढीचा प्रश्न घेऊन मडगाव वीज खात्याच्या कार्यालयात मोर्चा नेला असता, उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांना वरील उत्तर दिले तेव्हा उपस्थित लोकांनी आपल्या माथ्यावर हात मारून घेतला अणि त्या अभियंत्यावर प्रश्नांची सरबत्ती करून त्यांना असली थातूरमातूर कारणे देऊ नका, असे सरळ सुनावले.

Khari Kujbuj Political Satire
Goa Drugs Case: काणकोणमध्ये अंमली पदार्थांवर कारवाई; 26.9 ग्रॅम चरससह हॉटेलच्या वेटरला अटक

प्राथमिक कोकणी शिक्षणाची नाचक्की!

गोव्याच्या प्राथमिक शाळा क्षेत्रात, फक्त ८.८ टक्के विद्यार्थी कोकणी शिकत आहेत. ८८,८०० विद्यार्थ्यापैकी ७८६९ विद्यार्थीच कोकणी शिकतात. एकूणपैकी ३३ टक्के मराठी विद्यार्थी आहेत. कोकणीच्या क्षेत्रात सनदधारक व वायगणे दोन्ही तऱ्हेचे वकील खूप आहेत. यावर त्यांचे भाष्य नाही. मौन. कारण तिथे ते निशस्त्र. कारण आकडे बोलतात. कोकणी शिक्षणाचा प्रसार किती झाला, त्यासाठी प्रयत्न किती झाले, लोकांना कोणती भाषा पाहिजे, त्याची ही उघड स्थिती. सांगे व पेडणे तालुक्यात एकही कोकणी प्राथमिक शाळा नाही. मागील दशकात ३०० सरकारी शाळा बंद झाल्या. फक्त चार तालुक्यांत सरकारी कोकणी शाळा आहेत. मराठी राजभाषा नको म्हणत कंठशोष करणाऱ्या कोकणीवाद्यांनी हे आकडे वाचावे. फक्त द्वेष हे एकच शस्त्र वापरू नये. ते शस्त्र नसून तो दुबळेपणा असतो. सरकारने हे निकष ध्यानात घ्यावेत, असा मराठीप्रेमींचा आग्रह आहे.

काँग्रेसमधील असंतुष्टांची चर्चा!

कळप सांभाळणे हे कौशल्यवान वावराड्याचे काम. राजकारणात कार्यकर्त्यांना व नेत्यांना सांभाळून ठेवण्याची धमक ज्या नेत्यात आहे तोच खरा नेता. देशावर व राज्यात अनेक वर्षे सरकार चालविलेल्या काँग्रेस पक्षाची केंद्रात व राज्यात काय स्थिती झाली आहे, ते आपण बघतच आहोत. आता गोव्यात काँग्रेसने अमित पाटकर यांना बाजूला करून गिरीश चोडणकर यांना अध्यक्षपद बहाल केल्यामुळे काही काँग्रेसी नाराज आहेत. अनेक असंतुष्ट काँग्रेस नेते आता पक्षाशी बंड करण्याच्या पवित्र्यात असल्याची चर्चा आहे.

हॉटेलात ‘एल निनो’वर चर्चा!

कारापूरवासीयांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी आणि पोलिसांना जाब विचारण्यासाठी विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांनी दुपारी जुनेगोवे पोलिस स्थानक गाठले. त्यात गोवा फॉरवर्डचे प्रमुख तथा आमदार विजय सरदेसाई होते. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी सोडल्यानंतर सर्व राजकीय मंडळी परतली, तसे सरदेसाईही आपल्या पदाधिकाऱ्यांसमवेत पणजीकडे निघाले. येताना रायबंदरच्या हॉटेलात चहापाणी घेण्यासाठी ही मंडळी थांबली. चहापाणी झाले आणि चर्चा सुरू झाली ती पावसाने दडी मारण्याच्या कारणावर... ‘एल निनो’ या वादळामुळे पावसाचा परिणाम झाला आहे आणि तो ‘सुपर एल निनो’ होईल, असे सरदेसाईंनी भाकितही वर्तविले. आता ते खरे ठरू नये म्हणजे मिळविले. बरे, पावसावर बोलता बोलता उपस्थित पत्रकारांनी राजकारणाचा विषय काढला आणि सरदेसाईंनी युरी आलेमाव यांनी यापूर्वी पक्ष बदलला होता, अशी आठवण सांगत राजकीय चर्चेचा हा विषय आणखी लांबविला.

‘गांधी टोपी’ मिळाली नाही का?

काँग्रेसच्यावतीने म्हापशात गुरुवारी सायंकाळी ‘जनक्रांती’ आंदोलन करण्यात आले. त्यानिमित्ताने शहरात मशाल मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाची पक्षाच्या समाजमाध्यमातील अकाऊंटवरून बरीच जाहिरात करण्यात आली. त्याशिवाय या आंदोलनात काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी अंजली निंबाळकर, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा प्रतीक्षा खलप, आमदार एल्टन डिकॉस्ता, आमदार ॲड. कार्लुस फेरेरा, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष अर्चित नाईक सहभागी झाले होते. बहुतांश नेत्यांनी डोक्यावर ‘गांधी टोपी’ घातली होती. गांधी टोपी म्हणजे काँग्रेस नेत्याची ओळख. विशेष बाब म्हणजे निंबाळकर मॅडम, प्रतीक्षा खलप यांनीही डोक्यावर टोपी घातली होती; पण या सर्व नेत्यांमध्ये युरीबाब यांच्या डोक्यावर टोपी दिसली नाही. त्यामुळे त्यांनी ही टोपी का घातली नाही? यावरून चर्चा झाल्यास नवल वाटू नये!

चर्चा ‘त्या’ महिला अधिकाऱ्याची!

सरकारी नोकरी मिळविण्यासाठी परीक्षा द्यावी लागते, मुलाखत द्यावी लागते, कागदपत्रांची पडताळणी होते आणि मग कुठे खुर्ची मिळते; पण अनुभवी लोक सांगतात, खरी परीक्षा मात्र कार्यालयाच्या चार भिंतीत नसते, तर ती बाहेर असते; अनेक प्रश्नांसमोर आणि संतप्त नागरिकांसमोर. कार्यालयात फाईल बोलत असते; पण मैदानात लोक बोलत असतात. फाईलला उत्तर देता येते, लोकांना समजावून सांगावे लागते. आणि नेमकी हीच परीक्षा अनेकांना अवघड जाते, अशी चर्चा सध्या १८ जूनच्या आंदोलनानंतर एका महिला अधिकाऱ्याच्या वागणुकीबाबत चांगलीच रंगली. काहींना त्यात अहंकार दिसला. आंदोलन संपले, घोषणा थांबल्या, गर्दी पांगली. मात्र, त्या वागणुकीवरच्या चर्चा अजूनही वाफेसारख्या वर येत आहेत.

Khari Kujbuj Political Satire
Goa Drugs Case: काणकोणमध्ये अंमली पदार्थांवर कारवाई; 26.9 ग्रॅम चरससह हॉटेलच्या वेटरला अटक

छत्रीवर चढला पुन्‍हा भगवा रंग!

कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल हे आपल्‍या मतदारसंघातील मतदारांची योग्‍य ती काळजी घेतात, हे त्‍यांच्‍या आजवरच्‍या उपक्रमांतून दिसून आले आहे. चतुर्थीच्‍यावेळी मतदारसंघातील लोकांना चतुर्थीचे साहित्य पोहोचविण्‍याबरोबरच अन्‍यवेळीही वेगवेगळ्‍या निमित्ताने ते मतदारसंघातील लोकांकडे वस्‍तू पाेहोचवत असतात. आता पावसात त्‍यांनी मतदारसंघातील पोलिसांना हल्‍लीच रेनकोट वाटण्‍याचे काम पूर्ण केले. त्‍याबरोबरच मतदारसंघातील इतर लोकांना छत्र्या वाटण्‍यास सुरवात केली आहे. पावसाळ्‍यात छत्र्या वाटणे, हा त्‍यांचा नियमित कार्यक्रम असतो. मागच्‍यावर्षी त्‍यांच्‍या या छत्रीवर भगव्‍याऐवजी निळा रंग चढला होता. त्‍यामुळे काहीजणांच्‍या भुवया वर गेल्‍या होत्‍या. मात्र, यावेळी पुन्‍हा एकदा त्‍यांच्‍या छत्र्यांवर भगवा रंग चढला आणि त्‍यामुळे राजकीय स्‍तरावर कुडचडेत सर्वकाही आलबेल आहे, याचीही खात्री आता मतदारांना पटली, असे म्‍हटले तर त्‍यात कुठलीही अतिशयाेक्‍ती नसेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com