खरी कुजबुज: आमदार-प्रदेशाध्यक्षांना प्रश्‍न!

Khari Kujbuj Political Satire: ‘इनफ्‌ इज इनफ्‌’ या नागरी संघटनेने शुक्रवारी ‘टीसीपी’ कार्यालयावर धडक दिली. ‘टीसीपी’ कार्यालयाच्या बाहेर सभेला वेळेत सुरवात झाली.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

आमदार-प्रदेशाध्यक्षांना प्रश्‍न!

‘इनफ्‌ इज इनफ्‌’ या नागरी संघटनेने शुक्रवारी ‘टीसीपी’ कार्यालयावर धडक दिली. ‘टीसीपी’ कार्यालयाच्या बाहेर सभेला वेळेत सुरवात झाली. सभा सुमारे ९० मिनिटे चालणार, हे अगोदरच जाहीर झाले होते, त्यामुळेच कदाचित काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि आमदार कार्लुस फेरेरा, ‘आरजी’चे आमदार वीरेश बोरकर ही मंडळी तासभर इतर वक्त्यांची भाषणे होणार, असे गृहीत धरूनच सभास्थळी पोहोचले. चोडणकर यांचे भाषण नेहमीप्रमाणे दमदार झाले. त्यांनी आपल्या भाषणातून भाजप सरकारवर कडाडून टीका केली; परंतु याचवेळी उपस्थितांतून नागरिकांची प्रतिक्रिया आली. उपस्थित नागरिकांनी थेट चोडणकर आणि आमदार फेरेरा यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. कारापूर येथे एवढ्या दिवस आंदोलन सुरू असताना काँग्रेसचे नेते का तेथे आले नाहीत, असा सवाल उपस्थितांनी केला. तर दुसरीकडे हळदोणे मतदारसंघातील युवकाने आमदार फेरेरा यांना ‘रो व्हिला’ प्रकल्पावरून सवाल केले. त्यामुळे आमदार फेरेरा यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

‘नक्शा’ला जनतेचा नकार!

अती घाई संकटाला आमंत्रण ठरते, असे म्हणतात ते खरे. राज्यात सरकारच्या सेटलमेंट आणि लँड रिकॉर्ड्‌स खात्याने मडगाव व कुंकळ्ळी पालिका क्षेत्रात येणाऱ्या जमिनीचे डिजिटल सर्वेक्षण केले असून आता सरकार जमीनमालकांना भूमी कार्ड बहाल करणार आहे व नवीन सर्व्हे नंबर देणार आहे, अशी माहिती आहे. मात्र, एकट्या कुंकळ्ळीतील सोळा हजार प्रॉपर्टीजचे सर्वेक्षण अल्पकाळात पूर्ण करण्यात आले आहे. केवळ तीस सेकंदांत एका प्रॉपर्टीचे डिजिटल सर्वेक्षण केले असल्याची माहिती मिळाली आहे. आता या खात्याने जनतेला भूमी सर्वेक्षणाची तपासणी करण्यास आमंत्रित केले आहे. मात्र, पहिल्या दिवशी अठरा हजार जमीन मालकांपैकी केवळ हातावर मोजण्याएवढेच जमीनमालक ‘नक्शा’ जाणून घेण्यासाठी मडगावात गेले. याचा अर्थ सरकारचा हा ‘नक्शा’ जनतेला पसंत पडला नसावा?

विनाकारण कोंडी कशासाठी?

पणजीत सांतिनेज परिसरात काँक्रिटीकरणाचे रस्ते तयार झाले. वाहतूकही सुरळीत झाली; पण काहीवेळा याठिकाणी होणारी वाहतूक कोंडी डोकेदुखी ठरू लागली आहे. त्याला विविध कारणेही आहेत. गुरुवारी सायंकाळी बांदोडकर मार्गावरून जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात आली आणि संथ वाहतुकीबरोबरच कोंडी झाली. रथयात्रेत मुख्यमंत्र्यांसह इतर नेते सहभागी झाले होते, त्यात त्यांच्याबरोबर इतर कार्यकर्त्यांच्या वाहनांचा ताफा होता. बांदोडकर मार्गावरील वाहतूक संथ झाल्याने शहराबाहेर जाणाऱ्या वाहनधारकांनी अंतर्गत मार्गाचा वापर केला आणि वाहतूक कोंडीला आणखी हातभार लागला. सांतिनेजमधील बोरकर हॉटेल ते अग्निशामक दल रस्त्यावर दररोज अनेकजण वाहने बेशिस्तपणे उभी करून ठेवत असल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांचा अडथळा होतो आणि त्यामुळे सांतिनेजकडून येणारी सर्व वाहतूक खोळंबून पडते, हा नेहमीचाच प्रकार. त्यात या रस्त्यावर वाहतूक नियंत्रक पोलिस अजिबात दिसत नाही, त्यामुळे त्यांची अनुपस्थिती ही येथील वाहतूक कोंडीला आणखीनच हातभार लावणारी ठरते. वाहतूक नियंत्रण खात्याच्या पोलिसांनी जरा याकडे लक्ष दिले तर अधिकच बरे होईल, नाही का?

‘एआय’ चलन आणि हॅकर्सची ‘खेळी’!

सरकारने ‘एआय’ चलन पाठवण्याचा नवा प्रयोग सुरू केला आणि हॅकर्सनीही बहुतेक त्याच दिवशी ‘स्वागत मोहीम’ सुरू केली. लोकांच्या मोबाईलवर चलन येण्याआधीच वेगवेगळ्या लिंक येऊ लागल्या. काहींनी उत्सुकतेपोटी त्या उघडल्या आणि मग मोबाईलनेच ‘मी थोडा आराम करतो’ म्हणत हँग होण्याचा मार्ग स्वीकारला. आता चर्चा अशी रंगली आहे की, ‘एआय’ चलनाची योजना तयार झाली; पण त्याचवेळी हॅकर्सही सक्रिय होतील याचा अंदाज कोणाला नव्हता का? की ‘चलन आधी आणि जनजागृती नंतर’ असा फॉर्म्युला होता? दुसरीकडे, लिंक आली की लगेच क्लिक करणाऱ्यांनाही लोक विचारू लागले आहेत की, ‘प्रत्येक लिंक ही लॉटरीच असते का?’ शेवटी दोष सरकारचा की बेफिकीर क्लिक करणाऱ्यांचा, यावर मतभेद असतील; पण एक गोष्ट मात्र खरी की, आजकाल मोबाईलवर आलेली प्रत्येक लिंक ही मित्राची असतेच असे नाही, कधी-कधी ती हॅकर्सची ‘खेळी’ही असू शकते!

Khari Kujbuj Political Satire
Goa Heavy Rain: पावसाच्या पुनरागमनाने बळीराजा सुखावला, पण सत्तरीत ढगफुटीसदृश पावसामुळे रस्ते जलमय, जनजीवन ठप्प

युरी-एल्टन यांच्या दौऱ्यामागील गुपित!

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार एल्टन डिकॉस्ता ही जोडगोळी ‘यूके’ला गेली आहे. तेथील त्यांच्या स्वागताचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांतून व्हायरल झाला आहे. फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई हे काही दिवसांपूर्वी ‘यूके’ला जाऊन आले आणि त्यांनी स्वीकारलेल्या पुरस्कारावरून वाद सुरू झाला होता; पण आता भरीस भर म्हणून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि त्यांचे खास मित्र आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी ‘यूके’ गाठले आहे. ‘इनफ्‌ इज इनफ्‌’च्या शुक्रवारच्या सभेला ही मंडळी दिसली नाही, त्यामुळे सभास्थळावर काहीजण तर्कवितर्क वर्तुवू लागले; परंतु या दौऱ्यामागील काही घटना घडवून आणल्या गेल्या आहेत व त्याची कल्पना त्यांनाच असणार आहे. तसेच सत्ताधारी गटातून त्यांच्या दौऱ्याची पटकथा लिहिली गेल्याचीही चर्चा होती आणि त्यात किती सत्य आहे, हे त्या दोघांनाच माहीत.

गोंयकारपण... व्‍हाया लंडन?

गोव्‍यात गाेवेकरांचे भवितव्‍य सुरक्षित करण्‍यासाठी ‘पोगो बिल’ आणण्‍याचे आश्‍वासन देणाऱ्या ‘आरजी’ पक्षाची धोरणे लंडनमध्‍ये असलेले गोवेकर ठरवतात अशातऱ्हेची टीका यापूर्वी केली जात हाेती. सध्‍या गोव्‍यात ‘आरजी’ पक्ष गोवेकरांचे भवितव्‍य सुरक्षित करण्‍याऐवजी स्‍वत:चे अस्‍तित्‍व कसे सुरक्षित ठेवावे, या विवंचेनेत पडलेला आहे. या अशा परिस्‍थितीत काही दिवसांपूर्वी गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी ‘यूके’चा दौरा केला आणि तेथील गोवेकरांशी आपला ‘कनेक्‍ट’ वाढविला. आता काँग्रेसचे युरी आलेमाव आणि एल्‍टन डिकॉस्टा हे दोेघे ‘यूके’ला गेेलेले आहेत. हे सर्व पाहता गोव्‍यातील गोंयकारपणाची धोरणे आता ‘यूके’तील गोयकार ठरविणार तर नाहीत ना? असा प्रश्‍न कुणालाही पडल्‍यास त्‍याला वेड्यात काढता येणार नाही. आता गोयकारपणही व्‍हाया लंडन रूट होणार आहे का?

चर्चा एका प्रतिनिधीची!

म्हापशातील पत्रकारितेच्या वर्तुळात सध्या एका प्रतिनिधीच्या कथित कारभाराची चर्चा रंगली आहे. इतर वार्ताहर किंवा प्रतिनिधींची नावे पुढे करून विविध कारणांसाठी रक्कम गोळा केली जात असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, संबंधित व्यक्तींपर्यंत ती रक्कम पोहोचत नसल्याचे बोलले जात आहे. सुरवातीला विश्वास ठेवून मदत करणाऱ्यांना नंतर वेगळीच माहिती मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेकांनी या प्रकारापासून सावध राहण्यास सुरवात केली आहे. पत्रकारिता हे विश्वासावर चालणारे क्षेत्र असल्याने अशा कथित प्रकारांमुळे संपूर्ण पत्रकार बांधवांच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. मात्र, कोणीही उघडपणे पुढे येत नसल्याने हा विषय सध्या चर्चेपुरताच मर्यादित आहे.

अंदाजाला धक्का!

हवामान खात्याच्या अंदाजानुसार २२ जुलैपर्यंत पावसाची फारशी शक्यता नव्हती; पण पावसाने बहुतेक तो अंदाज वाचलाच नसावा! तो वेळेआधीच हजर झाला आणि आता गावागावांत चर्चा सुरू झाली आहे की, ‘अंदाज चुकला की वाचणारा चुकला?’ काहीजण म्हणतात, तंत्रज्ञान कधीच खोटे बोलत नाही; पण त्यातून नेमके काय समजून घ्यायचे, हे समजले नाही तर अंदाजही उलटाच पोहोचतो. तर काहीजण म्हणतात, एवढे अत्याधुनिक तंत्रज्ञान असूनही जर पाऊस स्वतःच आश्चर्याचा धक्का देत असेल, तर ढगांचे ‘मन’ अजून कोणत्याच यंत्राला वाचता आलेले नाही.

धास्तीतून शिस्तीचे धडे

राज्यात एआय-आधारित ‘कॅमेरे’ सुरू झाल्याची बातमी काय आली, पणजीच्या रस्त्यांवरचे चित्रच बदलले. कालपर्यंत सिग्नल सुटताच झपाझप पुढे जाणारे, जागा मिळेल तिथे ओव्हरटेक करणारे वाहनचालक गुरुवारी मात्र अगदी शिस्तीत दिसले. पुढची गाडी जाईल तेव्हाच आपण... अशा संयमानेच सर्वजण प्रवास करत होते. दुचाकीस्वारांनीही लेन सोडण्याचे धाडस फारसे केले नाही. बहुधा ‘उपरवाला सब देख रहा है...’ एेवजी आता ‘कॅमेरा सब देख रहा है...’ ही भावना त्यांच्या मनात घर करून बसली असावी! नियम मोडला तर दंड अटळ, ही जाणीव ब्रेकवरचा पाय अधिक घट्ट ठेवत होती. धास्तीमुळे का होईना; पण रस्त्यावर शिस्त मात्र अवतरली. आता उत्सुकता एवढीच... ही शिस्त कॅमेऱ्यांच्या धाकामुळे टिकणार, की काही दिवसांत पुन्हा ‘जैसे थे’ होणार?

Khari Kujbuj Political Satire
Goa Section 39A: कलम '39-अ' रद्द करा, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन; 'टीसीपी'ला 'इनफ्‌'चा अल्टिमेटम!

बाबूश यांच्याविषयी अफवा!

मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी हळूहळू पणजी मतदारसंघावर आपली पकड मजबूत केली आहे. महानगरपालिका निवडणुकीत ज्या पद्धतीने घवघवीत यश मिळविले आहे, त्यावरून पणजी मतदारसंघातून ते येणारी विधानसभा निवडणूक लढवणार, हे निश्चित आहे; परंतु काही दिवसांपूर्वी सांताक्रुझमध्ये भाजपचा आमदार होणार, असे भाकित त्यांनी व्यक्त केले होते, त्यावरून बाबूश स्वतः सांताक्रुझमधून निवडणूक लढवणार, अशा बातम्या तयार झाल्या. आजही बाबूश यांच्याविषयी असाच एक संदेश समाजमाध्यमातून व्हायरल झाला. बाबूश आगामी निवडणूक सांताक्रुझमधून लढवणार आणि पणजीतून उत्पल पर्रीकर भाजपच्या उमेदवारीवर रिंगणात उतरणार, असा हा संदेश. आता हा संदेश कोणी व्हायरल केला असेल, हे नाही म्हटले तरी अनेकांनी ओळखलेच असणार. विशेष बाब म्हणजे मोन्सेरात यांनी ही शक्यता फेटाळूनही लावली. त्यामुळे यापुढे निवडणुकीपर्यंत बाबूश यांच्याविषयी अशाच वेगवेगळ्या अफवा येत राहणार, असेच दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com