Goa Politics: खरी कुजबुज; फाईल्सना पाय कधी फुटतात?

Goa Latest Political News: ढवळीकरांचे भाषण सुरू झाले. त्‍यांनी रितेश नाईक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

फाईल्सना पाय कधी फुटतात?

म्हापशात सध्या एक नवीनच चर्चा रंगू लागली आहे. निवडणुका जवळ आल्या की काही संस्था अचानक उगवतात आणि निवडणुका संपल्या की त्या तितक्याच वेगाने गायब होतात, असा टोला आमदार तथा उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी नुकताच लगावला. ‘टुगेदर फॉर म्हापसा’ या नव्या संघटनेच्या निमित्ताने त्यांनी ही फटकेबाजी केली. कोणतंही काम एका दिवसात होत नाही, त्यासाठी दोन-तीन वर्षांचा कालावधी, फाईल्सचा प्रवास, मंजुरीची वाट, हे सगळं आलंच. आमदार होण्यापूर्वी कदाचित ‘एका रात्रीत बदल’ घडवण्याचं स्वप्न असावं, पण खुर्चीवर बसल्यावर वास्तवाची ओळख झाली, हेही त्यांनी मान्यच केलं. पण म्हापसेकरांच्या मनातील एक ‘तांत्रिक’ कोडं मात्र अजूनही उलगडले नाही. जर कामांना इतका वेळ लागतो, तर मग निवडणुका तोंडावर आल्यावरच नारळ वाढवण्याचा मुहूर्त कसा काय सापडतो? पाच वर्षे निवांत पडलेल्या फाईल्स अचानक आचारसंहितेच्या आधीच धावायला कशा लागतात? आणि कामांची उद्‌घाटने धडाधड कशी होतात? कदाचित याच प्रक्रियेच्या गुंत्यात म्हापशाच्या रवींद्र भवनाचा प्रश्नही अडकून पडला असावा!

ढवळीकरांचे बोल!

भाजपची शुक्रवारी फोंड्यात प्रचार सभा झाली. या सभेला भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मंत्री सुभाष शिरोडकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, आमदार गोविंद गावडे, उमेदवार रितेश नाईक आणि मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांची उपस्थिती होती. ढवळीकरांचे भाषण सुरू झाले. त्‍यांनी रितेश नाईक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन उपस्थितांना केले. विशेष म्‍हणजे यावेळी त्‍यांनी केलेली कोटी व्यासपीठावरील काहींना नक्कीच झोंबली असेल. पक्षनिष्ठेविषयी ढवळीकर यांनी यावेळी मार्मिक टोला लगावला. ते म्हणाले, मी एका पक्षात वाढलेला माणूस आहे. आजपर्यंत जसे दामू आहेत, जसे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आहेत. ढवळीकरांचे हे बोल म्हणजे ‘लेकी बोले सुने लागे‘ असेच होते.

चूक झाली की दाखवली?

मडगावात सध्या बागेपेक्षा बांधकामाचाच बहर जास्त दिसतोय. नगरपालिका बागेत काय उभं राहणार यावरून चर्चा इतकी रंगली आहे की, झाडांनाही उत्सुकता लागली असावी. जीएसआयडीसीने तब्बल ३.९६ कोटींची निविदा काढली आणि त्यात दोन मजली इमारतीचा उल्लेखही आला. पण आमदार आणि नगराध्यक्ष म्हणतात, असं काहीच नाही. म्हणजे बागेत इमारत उभी राहण्याआधीच ‘गोंधळाची इमारत’ तयार झाली आहे. सगळ्यात मजेशीर म्हणजे हा प्रकार म्हणे नजरचुकीने झाला. आता मडगावकर विचारतात, ही नजर इतकी मोठी होती का की थेट दोन मजलेच दिसले? आणि जर चूक झालीच तर त्या नजरेला ‘कारवाईचा चष्मा’ बसवला का? की फक्त “चूक झाली, पुढे काळजी घेऊ” इतकंच? आता खरा प्रश्‍‍न असा, नेमका प्रकल्प तरी काय आहे? बागेत काय उभं राहणार, हे स्पष्ट कोण करणार? की हा सस्पेन्स निवडणुकीपर्यंत तसाच ठेवायचा?

Goa Politics
Goa Weather Update: कडाक्याच्या उन्हात पावसाची एन्ट्री! पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा अंदाज

पुरावे बोलले, बक्षीस मिळाले!

कला अकादमीतील न्याय संहिता प्रदर्शनात यंदा पुरावेच बोलके ठरले. वेर्णा येथील न्यायवैद्यक संचालनालयाच्या दालनाने अशी कमाल केली की ‘सर्वोत्कृष्ट स्टॉल – प्रथम क्रमांक’ सरळ त्यांच्या झोळीत जमा झाला. गुन्हे उकलण्यात पटाईत असलेले हे पथक यावेळी मांडणी, साधनसामग्री आणि सादरीकरणातही तितकेच हुशार ठरले. त्यांच्या स्टॉलकडे पाहून अनेकांना क्षणभर प्रश्न पडला, हे गुन्हे उकलतायत की लोकांची मनं जिंकतायत?. सगळं इतकं नेटकं आणि अभ्यासपूर्ण की परीक्षकांनाही फार डोकं खाजवावं लागलं नसावं. पुरावे ठोस, मांडणी जबरदस्त आणि सादरीकरण दमदार...म्हणजे निकाल काय लागणार, हे आधीच ‘स्पष्ट’ होतं. थोडक्यात, रोज पुरावे गोळा करणाऱ्यांनी यावेळी कौतुकाचेच पुरावे इतके पक्के सादर केले की पहिला क्रमांक हा फक्त ‘औपचारिक शिक्का’ ठरला. आता पुढच्या प्रदर्शनात इतर विभागांनी आधीच ‘केस मजबूत’ करून यावं, अशीच हसत-खेळत कुजबूज रंगली आहे!

तामिळनाडूत ‘गोवा मॉडेल’

तामिळनाडूत २३ एप्रिलला विधानसभा निवडणूक होणार आहे. तेथे तिकीट वाटपावरून काँग्रेस पक्षात वातावरण बरेच तापले आहे. त्‍या पक्षाच्या खासदार ज्योतीमनी यांनी काँग्रेसची तिकिटे विकली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्‍यांनी राष्ट्रीय वाहिनीवर हा आरोप केल्याने गोव्यात लगेच ती बातमी व्हायरल झाली. त्याचे कारण असे की सध्या तामिळनाडूचे प्रभारी हे गोव्याचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हे आहेत. २०२२ च्या निवडणुकीवेळी गोव्यातही अनेकांनी तिकिटे विकल्याचा आरोप केला होता. आता राहुल गांधींकडे जवळीक असलेल्या काँग्रेसच्याच खासदाराने तिकीट विक्रीचा आरोप केल्याने तामिळनाडूत ‘गोवा मॉडेल'' राबविल्याची चर्चा काँग्रेसच्या एका गटात सुरू होती. फोंड्यात भाजपने या विषयाचे भांडवल करू नये म्हणजे मिळविले.

प्रभाग २४, पण गोंधळ १०० टक्के

मडगावात सध्या प्रभागांची गणितं पाहून लोकांनी कॅल्क्युलेटर बाजूला ठेवून थेट ज्योतिष्यांकडे धाव घ्यावी का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कालपर्यंत २५ प्रभाग, मग २७ होणार अशी चर्चा आणि आता थेट २४...म्हणजे प्रभागसंख्या ‘घटते वाढते’ या सूत्रावर चालतेय की काय? आता या २४ प्रभागांचं आरक्षणाचं गणित मांडलं तर जवळपास १८ प्रभाग आरक्षित. म्हणजे उरले सहा ‘जनरल’ जागा आणि त्यासाठी इच्छुकांची रांग मात्र लांबलचक. परिस्थिती अशी की, तिकीट मिळालं तरी सीट मिळेल का? हा नवीनच प्रश्न उमेदवारांना पडला आहे. निवडणुका अगदी दारात येऊन ठेपल्या, पण आरक्षणाची घोषणा अजूनही ‘रहस्य’च. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार सध्या ‘वेट अँड वॉच’ नव्हे, तर ‘वेट अँड वरी’ मोडमध्ये गेले आहेत. प्रत्येकाच्या मनात एकच विचार आहे...आपला प्रभाग आरक्षित झाला तर? विरोधी पक्ष आरक्षण जाहीर करण्यासाठी आग्रही आहेत, तर इच्छुक उमेदवार दिवस मोजत बसले आहेत. तोपर्यंत मडगावात राजकारणापेक्षा ‘गणिताचा’ पेपरच जास्त अवघड ठरतोय, अशी कुजबूज रंगली आहे!

आयपीएलची बेटिंग अन्‌ पोलिस!

शनिवारपासून आयपीएलचा थरार सुरू झाला अन्‌ बेटिंगलाही सुरवात झाली आहे. सध्या रेट कमी असला तरी जसजशी स्पर्धा पुढे जाईल, तशी बेटिंग रेट जास्त होणार आहे. बुकीही सक्रिय झाले आहेत. सध्या बेटिंग ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने पोलिस करडी नजर ठेवून आहेत. मडगावातील काही बुकींची माहिती सध्या पोलिस गोळा करत आहेत. गुप्तचर पोलिसांकडे ही जबाबदारीही सोपविण्‍यात आली आहे. आता एवढेही करून हा सट्टेबाजार कमी होणार व बुकींवर कारवाई होणार या भ्रमात मात्र कुणी राहू नये बरे का! कारण उघड आहे. पोलिसांना आधीच त्याचा मोबदला हप्त्याच्या रूपात मिळालाही आहे आणि हीच तर खरी गोम आहे.

Goa Politics
Sexual Assault Cases Goa: राज्यात तीन महिन्यांत लैंगिक अत्याचाराच्या 34 घटना, कायदा- सुव्यवस्थेवर प्रश्‍न; तपासाऐवजी प्रकरणे दडपण्याचेच प्रकार अधिक

नगरपालिका निवडणूक आमदारांसाठी चाचणी परीक्षा ?

निवडणूक ही राजकारण्यासाठी एका प्रकाराची परीक्षाच असते यात वाद नाही. मे महिन्यात राज्यातील बहुतांश पालिकांच्या निवडणुका होणार आहेत.पालिका निवडणुकीनंतर लगेच विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळे या निवडणुका विद्यमान व भावी आमदारांसाठी महत्त्वाच्या असणार हे निश्चित. काणकोणचे आमदार व मंत्री रमेश तावडकर, सांगेचे आमदार व मंत्री सुभाष फळ देसाई, मडगावचे आमदार व मंत्री दिगंबर कामत, आमदार विजय सरदेसाई, आमदार व विरोधीपक्ष नेते युरी आलेमाव, आमदार नीलेश काब्राल या दक्षिणेतील आमदारांची परीक्षा आता मे महिन्यात होणार हे निश्चित. आता या आमदारांनी परीक्षेची तयारीही जोरदारपणे केली असणार. ज्या आमदाराने चांगला अभ्यास केला, तो उत्तीर्ण होणार. अन्यथा आमदारकीच्या निवडणुकीवेळी ‘नीड्स इम्प्रुव्हमेंट’ असा शेरा पडणार. आता पाहूया कोण कोण उत्तीर्ण होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com