

सुशांत कुंकळयेकर
मडगाव : कुडचडे येथील अल्पवयीनांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची प्रकरणे गाजत असतानाच बड्डे येथील शॉपिंग सेंटरमध्ये दोन चिमुरड्या मुलींसमोर ६२ वर्षीय इसमाने अश्लील चाळे केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने राज्यात मुली आणि महिला सुरक्षित आहेत का, हा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. यंदा जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत महिला आणि मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या एकूण ३४ घटनांची नोंद झाल्याची माहिती पोलिस नोंदीतून उपलब्ध झाली आहे.
या वर्षाचा तिसरा महिना संपायला अद्याप दोन दिवस बाकी आहेत, तरी जानेवारी ते आतापर्यंत राज्यात १० बलात्कार, ८ विनयभंग, १३ अल्पवयीन मुलींचे अपहरण, तर महिलांना बळजबरीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या तीन प्रकरणांची नोंद झाली आहे. हे प्रमाण पाहता राज्यात दर महिन्याला सरासरी ११ लैंगिक शोषणाच्या घटना घडत आहेत. विशेष म्हणजे, ही फक्त पोलिसांत नोंद झालेली प्रकरणे आहेत. नोंद न झालेल्या प्रकरणांची संख्या त्याहूनही जास्त असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या सगळीकडे गाजत असलेल्या कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित सोहम नाईक याच्या विरोधात सध्या चार बलात्कार आणि दोन विनयभंगांची प्रकरणे नोंद झाली असून प्रत्यक्षात हे अत्याचार तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०२३ मध्ये घडले होते. त्यामुळे राज्यात सगळीच प्रकरणे नोंद होत नाहीत, तर दडपून ठेवलेल्या प्रकरणांची संख्या बरीच असते, या शक्यतेला दुजोरा मिळत असल्याची प्रतिक्रिया महिलांचे प्रश्न हाताळणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो यांनी व्यक्त केली आहे.
सासष्टी तालुक्यात एका भाड्याच्या घरात राहणाऱ्या हिस्ट्रीशीटर गुंडाने एका अल्पवयीन मुलीवर २०२४ सालापासून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार जानेवारीत नोंद झाली होती. याच महिन्यात सासष्टी तालुक्यातील एका सेल्सगर्लने दुकानमालकाने विनयभंग केल्याची तक्रार नोंद केली होती. १७ मार्च रोजी कुठ्ठाळी येथील पुलाजवळ एका महिलेवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार आगशी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
२०२५ मध्ये राज्यात वर्षभरात २२० महिलांवरील लैंगिक अत्याचाराची प्रकरणे नोंद झाली होती. त्यात ५४ बलात्कार, ६५ विनयभंग, ९० अपहरणे, तर ११ प्रकरणे वेश्या व्यवसायाशी संबंधित होती.
राज्यातील वाढते अत्याचार, ही चिंतेची बाब असून ९ वी ते ११ वीच्या विद्यार्थिनी याला बळी पडत आहेत, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. स्नॅपचॅट व इन्स्टाग्रामच्या माध्यमातून लग्नाचे आमिष दाखवून त्यांना मोहजालात ओढले जाते. वास्तविक अशा घटनांची पोक्सो कायद्याखाली नोंद व्हायला हवी. असे प्रकार कुणाला समजल्यास त्याची तक्रार पोलिसांत करणे या कायद्याखाली सक्तीचे केले पाहिजे!
- आवडा व्हिएगस,
अध्यक्ष, ‘बायलांचो एकवोट’
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.