Goa News: सुभाष वेलिंगकर यांच्या अटकेसाठी आंदोलन करणाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी कॉंग्रेसचे खासदार, आमदार, नेते पोहोचले. त्यांनी त्या आंदोलनामुळे सर्वसामान्यांना झालेल्या मनस्तापाबद्दल निषेध का केला नाही, अशी विचारणा भाजपचे प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. कॉंग्रेसने त्यांना या विषयावरून राजकारण करायचे नाही असे सांगितले असले तरी त्यांना राजकारण करायचे होते हे दडून राहिलेले नाही, असे ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक होते.
वेर्णेकर म्हणाले, कॉंग्रेसच्या नेत्या अंजली निंबाळकर यांनी माहिती घेऊन विधाने करावीत. म्हादईचा प्रश्न का कर्नाटकाच्या बेकायदेशीरपणामुळे निर्माण झाला आहे. कर्नाटक बेकादेशीरपणे बांधकामे करून म्हादईचे पाणी पळवण्याचा प्रयत्न करत आहे. निंबाळकर यांनी त्यांच्या कॉंग्रेसच्या कर्नाटकमधील सरकारला हे प्रकार बंद करण्यास सांगितले तर म्हादईचा प्रश्नच शिल्लक राहणार नाही. तसे न करता पंतप्रधानांनी बैठक बोलवावी, असे म्हणणे म्हणजे दिशाभूल करण्यासारखे आहे.
म्हादईचे पाणी वाटप ठरले आहे. त्यासाठी प्रवाह अधिकारीणी नियुक्त झाली आहे. म्हादई जलतंटा लवादाच्या निवाड्याला सर्व राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले तरी न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. असे असताना कायदेशीर मार्गाने पाणी मिळू शकत असताना कर्नाटक बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करते आणि निंबाळकर त्याचे समर्थन करतात, यालाच दुटप्पी भूमिका म्हणतात. कॉंग्रेसलाच ती शोभते.
वेर्णेकर म्हणाले, कॉंग्रेसमध्ये नैराश्य पसरले आहे. हरियानात भाजपच्या आमदारांची संख्या वाढली तर जम्मू काश्मिरमध्ये कॉंग्रेसची आमदार संख्या १२ वरून ६ वर आली. असे असतानाही कॉंग्रेस तेथे आनंदोत्सव साजरा करते. यावरून नेतृत्वाची वैचारीक दिवाळखोरी दिसते. त्यानी खिलाडू वृत्तीने पराभव मान्य केला पाहिजे.
गिरिराज पै वेर्णेकर म्हणाले, कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांना पक्षातून कोणी साथ देत नाही. ते, विजय सरदेसाई आणि अमित पालेकर मिळून कॉंग्रेस संपवायला निघाले आहेत. त्यांना पाटकर यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवले गेलेले हवे आहे. यापैकी दिल्लीत कोणा कोणाची भेट घेण्याचा प्रयत्न केला. कोणाला भेट मिळाली नाही, याचा तपशील योग्यवेळी जाहीर केला जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.