
डिचोली: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (AAP) राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्या गोवा दौऱ्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. केजरीवाल यांनी भाजप-काँग्रेसमध्ये साटेलोटे असल्याचा आरोप केल्यानंतर, गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी त्यांच्यावर थेट प्रतिहल्ला करत, भाजपला मदत करण्यासाठीच ते गोव्यात आल्याचा आरोप केला आहे.
डिचोली येथे झालेल्या सभेत अरविंद केजरीवाल यांनी राज्यात 'आप'चे सरकार आल्यास मयेवासीयांना त्यांच्या मूलभूत जमिनीचे हक्क मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. यावर प्रतिक्रिया देताना अमित पाटकर यांनी केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवला.
पाटकर म्हणाले, "माजी मुख्यमंत्री राहिलेल्या केजरीवालांना तथ्यांचा आधार न घेता, केवळ अफवांवर विश्वास ठेऊन बोलणं शोभत नाही. त्यांनी तथ्यांवर भाष्य करायला हवे." पाटकर यांनी मये येथील खाण व्यवसायाचा मुद्दा उपस्थित करत, स्थानिक लोकांना रोजगार मिळत नसल्याचा मुद्दा काँग्रेसने वारंवार समोर आणला होता, पण केजरीवाल यांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून काँग्रेसलाच धारेवर धरल्याचा आरोप केला.
अमित पाटकर यांनी केजरीवाल यांच्यावर थेट भाजपचा एजंट असल्याचा गंभीर आरोप केला. ते म्हणाले, "बेळगाव, सारमानससारख्या ठिकाणचे शेतकरी त्रस्त आहेत, त्यांच्या जमिनी हडपल्या जात आहेत. लाईराई देवीच्या विषयाचे भाजपने राजकारण केले. मात्र, या दोन्ही महत्त्वाच्या विषयांवर केजरीवाल यांनी मौन बाळगले. यामुळे स्पष्ट होते की, भाजप सरकारनेच केजरीवालांना निवडणुकीत मत फोडण्यासाठी गोव्यात पाठवले आहे." पाटकर यांनी केजरीवाल यांना आव्हान देत म्हटले, "राहिलेल्या दोन दिवसांत त्यांच्यात हिम्मत असेल, तर त्यांनी समोर येऊन चर्चा करावी."
स्वतःच्या खाण व्यवसायाच्या आरोपावर पाटकर यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, "माझे आजोबा खाणीचा व्यवसाय करायचे आणि याचा मला अभिमान आहे, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०१४ पासून गोव्यात खाण व्यवसाय बंद आहे आणि सध्या माझा कोणताही खाण व्यवसाय सुरू नाहीये."
पाटकर यांनी 'आप'च्या अंतर्गत विरोधावरही बोट ठेवले. ते म्हणाले, "केजरीवाल स्वतःच्या पक्षात झाकून बघत नाहीत. ज्या रामावर जेनीटोने हल्ला केला, त्याला अमित पालेकरांनी जामीन मिळवून दिला, त्यामुळे 'आप'ला नेमकं काय हवंय हेच समजत नाहीये."
अमित पाटकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केजरीवाल यांना त्यांच्या दिल्लीतील कारभारावर उत्तर देण्याचे थेट आव्हान दिले आहे.
पाटकर यांनी विचारलेले प्रमुख प्रश्न:
२००० कोटींचा क्लासरूम घोटाळा
दारू धोरण घोटाळा
३८२ कोटींची आरोग्य क्षेत्रातील अनियमितता
मोहोल्ला क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांचे न मिळालेल्या वेतनावरून आंदोलन
"गोव्याला तुमच्या उपदेशांची गरज नाही, तर तुमच्या एजंटने चालवलेल्या सर्वात भ्रष्ट भाजप सरकारकडून तुम्ही स्पष्टीकरण मागावे," असा कठोर हल्ला पाटकर यांनी चढवला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.