
पणजी: सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून, नागरिकांची फसवणूक करण्यासाठी स्कॅमर्सकडून नवनवीन मार्गांचा अवलंब केला जात आहे. दरम्यान, गोवा पोलिसांनी नागरिकांना बनावट वीज बिल संदर्भातील एसएमएस फसवणुकीपासून सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. फसवणूक करणारे स्वतःला वीज विभागाचे अधिकारी असल्याचं भासवून ग्राहकांना खोटे मेसेज पाठवत आहेत.
अज्ञात क्रमांकावरून ग्राहकांना मेसेज पाठवत तत्काळ बिलं भरण्याची मागणी केली जाते. आपलं वीजबिल अद्याप भरलेलं नाही. त्वरित बिल भरलं नाही, तर वीजपुरवठा खंडित केला जाईल, असा मेसेज पाठवला जातो.
या मेसेजमध्ये अधिकृत वीज विभागाच्या वेबसाइटचा उल्लेख न करता दुसरीच पेमेंट लिंक तसंच नंवर दिला जातो.
गोवा पोलिसांनी नागरिकांना फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. तसंच, अशा प्रकरणांमध्ये कोणीही फसवले गेले असल्यास त्वरित सायबर गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असंही आवाहन केलं आहे.
संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नका,अनोळखी किंवा अविश्वसनीय स्रोतांकडून आलेल्या लिंकवर क्लिक करण्याचं टाळा. ओटीपी किंवा बँकिंग तपशील शेअर करू नका. अशा प्रकारचे मेसेज आल्यास अधिकृत वीज वितरण कंपनीच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून सत्यता तपासा, असं आवाहन पोलिसांनी केलंय.