म्हापसा: गोवा पोलिसांनी मंगळवारी (दि. २९ ऑक्टोबर) रोजी आकय म्हापसा येथून गाईच्या चरबीपासून बनवलेल्या तुपाचे सुमारे १५ ते २० कॅन जप्त केले. यासोबत पोलिसांनी चाकू आणि इतर हत्यारे देखील जप्त केली आहेत.
राज्यातील काही हिंदू तरुणांच्या गटाने घरावर छापा टाकल्यानंतर हा भयंकर प्रकार उघडकीस आला. तरुणांच्या म्हणण्यानुसार हेच तूप बाजारात विक्रीसाठी पाठवले जाते आणि लोकं देवपूजेसाठी याचा वापर करतात. संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी त्वरित म्हापसा पोलिसांना याबद्दल माहिती दिली आणि पोलिसांकडून संशियतांना ताब्यात घेण्यात आले.
हिंदू तरुणांच्या गटामधून अरविंद रेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना म्हापशातील एका घरातून गाईचे मांस वापरून तूप बनवलं जाण्याचे, वापरलेल्या हत्यारांचे तसेच मांस शिजवण्याचे काही फोटो आणि व्हिडीओ मिळाले होते.
हाती आलेल्या माहितीची शहनिशा करण्यासाठी सर्वांनी या घरावर छापा टाकला असता त्यांच्या हाती गाईचे सुकवलेले मांस, तुपाने भरलेले डबे तसेच काही हत्यारे लागली. मिळालेले सर्व पुरावे संशयास्पद असल्याने त्यांनी पोलिसांना याबद्दल खबर केली.
म्हापशात बेकायदेशीरपणे गाईचे मास शिजवून ते डालडा तुपाच्या नावाखाली विकले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून परिवारातील सदस्य एकत्र येऊन घरच्या मागच्या अंगणात हा व्यवसाय करायचे. आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून गोवा पोलिसांनी त्यांना अटक केली आहे अशी माहिती अरविंद रेडकर यांनी दिली.
गोव्यातील हा पहिलाच प्रकार नसून काही दिवसांपूर्वी त्यांनी दक्षिण गोव्यातील मडगावमधून गाईच्या मांसापासून बनवलेल्या पदार्थांचे ४५ डबे जप्त केले होते, याच तुपाचा वापर मडगावात अनेक हॉटेल्समध्ये केला जायचा असे देखील रेडकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.