

मडगाव: मायणा-कुडतरी पोलिस स्थानकात अल्पवयीन मुलासह पाच जणांवर झालेल्या कथित क्रूर मारहाण प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांविरोधात एफआयआर दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी हळदोणा मतदारसंघाचे आमदार ॲड. कार्लुस फरेरा यांनी केली आहे.
गणवेशात असो वा नसोत, कोणत्याही पोलिसाकडून होणारी मारहाण अस्वीकार्य आहे. अशा ‘गणवेशातील गुन्हेगारां’ना राजकीय संरक्षण मिळत असल्याशिवाय अशा घटना घडू शकत नाहीत. पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या अशा घटकांना बाहेर काढणे गरजेचे आहे, असे फरेरा म्हणाले.
संबंधित व्यक्तींना पोलीस स्थानकात आणून त्यांच्यावर निर्दयी मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “पोलीस कर्मचारी हा नेहमीच जबाबदार असतो. गणवेश नसला तरी तो सरकारी सेवकच असतो. पोलीस स्थानकात न्यायासाठी आलेल्या लोकांवर हल्ला करणारे हे गणवेशातील गुन्हेगार आहेत,” असे ते म्हणाले.
या घटनेमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे स्पष्ट होत असल्याचे फरेरा यांनी सांगितले. प्रथम एका पोलिसाला निलंबित करण्यात आले, त्यानंतर आणखी दोघांना निलंबित करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजमधून सर्व बाबी स्पष्ट होतील. संबंधितांना सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत नेऊन मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे.
हे अत्यंत गंभीर आणि संशयास्पद आहे, असे त्यांनी म्हटले.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या प्रमोद सावंत यांनी याबाबत मौन बाळगू नये, अशी मागणी करत फरेरा म्हणाले, केवळ निलंबन आणि चौकशी पुरेशी नाही. संबंधित पोलिसांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.