Quepem Paroda Woman Murder Case
पारोडा: केपे येथील 57 वर्षीय महिलेच्या हत्येप्रकरणी अखेर संशयित आरोपीला अटक करण्यात गोवा पोलिसांना यश आले आहे. मध्य प्रदेशमधून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या असून रामकुमार रावत असे या संशयिताचे नाव आहे. हत्येचे कारण काय, पोलिस आरोपीपर्यंत कसे पोहोचले हे अद्याप समजू शकलेले नाही.
मोडेवाडो- पारोडा येथे उबालदिना ब्रागांझा (वय 57) या राहत होत्या. ब्रागांझा यांच्या घराचे नुतनीकरणाचे काम सुरू असल्याने त्या तात्पुरत्या मडगावात मुलीच्या घरी राहत होत्या. घराचे काम पाहण्यासाठी त्या दररोज पारोड्यात यायच्या. 21नोव्हेंबरला देखील त्या पारोड्यात घरी आल्या होत्या. दुपारी 12. 45 च्या सुमारास त्यांचे मुलीशी मोबाईलवर शेवटचे बोलणे झाले.
दुपारी दोनच्या सुमारास टाईल्स लावण्यासाठी एक कामगार ब्रागांझा यांच्या घरी परतला असता त्यांनी दरवाजा उघडला नाही. हा प्रकार त्या कामगाराने शेजारी राहणाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. शेवटी स्थानिकांनी शिडीच्या मदतीने खिडकीतून घरात डोकावून पाहिले असता ब्रागांझा या जिन्यावर मृतावस्थेत पडल्या होत्या.
स्थानिकांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. ब्रागांझा यांच्या मुलीने दिलेल्या जबाबानुसार, आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी संध्याकाळी ब्रागांझा या कामगारांना देण्यासाठी रोकड घेऊन घरी परतल्या होत्या. हत्येनंतर ब्रागांझा यांच्याकडील रोकड आणि दागिने गायब झाले आहेत. यावरून चोरीच्या उद्देशाने ब्रागांझा यांची हत्या झाल्याचा अंदाज वर्तवत पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. हत्येच्या वेळी एक कामगार घरात होता आणि हत्येनंतर तो पळून गेल्याचे तपासात उघड झाले होते.
पोलीस उपनिरीक्षक गौतम शेटकर, हवालदार कल्पित रायकर आणि हवालदार साहिल शेटकर यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास केला. संशयित कामगार हा मध्य प्रदेशात असल्याचे उघड होताच पोलिसांनी तिथे जाऊन आरोपीला अटक केली. अद्याप या खुनाचं कारण स्पष्ट झालेलं नाही. सध्या आरोपीची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.