

पणजी: गोवा पोलिसांना एका अत्यंत गंभीर प्रकरणात मोठे यश मिळाले. एका तरुणीचे खासगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करुन लैंगिक छळ आणि खंडणी मागणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. याप्रकरणी तिसवाडी येथे राहणाऱ्या नेपाळी तरुणीने 28 नोव्हेंबर 2025 रोजी गोवा सायबर गुन्हे पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रारदार तरुणीचा प्रियकर असलेला कुबेर सिंह हा मुख्य आरोपी आहे. आरोपीकडे तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ होते. त्यांच्या नात्यात कटुता आल्यानंतर बदला घेण्यासाठी आरोपीने 77XXXX53, 98XXXXX14 आणि 95XXXX14 या मोबाईल क्रमांकांचा आणि 'ऑस्कर डिसोझा', 'सुभाष डिसोझा' आणि 'निरंजन' अशा खोट्या नावांचा वापर केला. त्याने 'भूमि दँगौरा' नावाचे खोटे इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट्सही तयार केले. या अकाउंट्सचा वापर करुन आरोपीने (Accused) पीडितेचे खासगी फोटो आणि व्हिडिओ तिच्या मित्रांना पाठवले. या कृतीतून त्याने तरुणीचा लैंगिक छळ केला.
आरोपीने केवळ छळच नव्हे, तर पीडितेकडे लैंगिक संबंधांचीही मागणी केली. त्याने तिच्याकडून 35000 हजारांची खंडणी देखील मागितली आणि ही रक्कम युपीआयद्वारे दोन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. आरोपीच्या सततच्या आणि टोकाच्या छळामुळे ही तरुणी इतकी त्रस्त झाली की, तिने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला.
दुसरीकडे, गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर गुन्हे पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. एसपी राहुल गुप्ता, एएसपी बी. व्ही. श्रीदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नवीन नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या प्रकरणाचा तांत्रिक तपास केला. सखोल तांत्रिक तपासानंतर संशयित आरोपी कुबेर सिंह (वय 34) याचा माग काढत पोलीस पथक धारवाड, कर्नाटक येथे पोहोचले. आरोपी मूळचा नेपाळचा रहिवासी असून धारवाडमध्ये तो वेटर म्हणून नोकरी करत होता.
अटक केल्यानंतर आरोपी कुबेरने आपला गुन्हा कबूल केला. प्रेयसीकडून 'बदला' घेण्यासाठी आपण हे कृत्य केल्याचे त्याने गोवा पोलिसांना (Goa Police) सांगितले. आरोपीला कोर्टासमोर हजर करण्यात आले असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सायबर गुन्हे पोलीस स्थानक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.