Traffic Police: फोंड्यात भरधाव वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून फोंडा पोलिसांनी सुरक्षित वाहतुकीसाठी कारवाई करून गेल्या अकरा महिन्यात बेशिस्त व बेजबाबदार वाहनचालकांकडून एकूण 1 कोटी 61 लाख रुपये दंड रूपाने वसूल केले आहेत.
या अकरा महिन्यात 41 हजार 58 प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती फोंड्याचे वाहतूक पोलिस निरीक्षक कृष्णा सिनारी यांनी दिली. जानेवारी ते सरत्या नोव्हेंबरपर्यंत ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विना हेल्मेट दुचाकीस्वारांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे.
पोलिसांनी फोंडा तालुक्यात विविध ठिकाणी गस्त घालताना भरधाव वाहने चालवणाऱ्या 1797 वाहनचालकांना दंड केला. याशिवाय मद्यपान करून वाहन हाकण्यास बंदी असतानाही गेल्या अकरा महिन्यात एकूण 142 जणांवर कारवाई करण्यात आली. वाहन हाकताना मोबाईल वापरणाऱ्या 103 चालकांना दंड आकारला.
हेल्मेट न वापरणाऱ्या 5923 दुचाकीस्वारांनाही दंड आकारला. याशिवाय धोकादायक स्थितीत वाहन चालवणाऱ्या 155 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. विशेषतः फोंड्यातील चौपदरी महामार्गावर धोकादायक स्थितीत अवजड ट्रक पार्क करून ठेवण्याच्या कृतीवर फोंडा पोलिसांनी कारवाई करीत आतापर्यंत 6610 जणांकडून दंड आकारला आहे.
बेशिस्त आणि भरधाव वाहतुकीवर ही कारवाई सातत्याने सुरूच राहणार असल्याचे यावेळी फोंड्याच्या वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
फोंडा शहरात वाहनांची प्रचंड गर्दी होत असल्याने वाट मिळेल तेथून वाहन हाकण्याचे प्रकार घडत असल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे शिस्तीसाठी वरचा बाजार तसेच अन्य ठिकाणी हे दुभाजक बसवल्याने आता सुरळीत वाहतुकीसाठी मदत होईल,असे सामाजिक कार्यकर्ते विराज सप्रे यांनी सांगितले.
अल्पवयीनांकडून ड्रायव्हिंग!
फोंडा तालुक्यात अल्पवयीन मुले वाहन चालवत असल्याचे प्रकार उघडकीस आले असून अशा अल्पवयीनांच्या पालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांना पाहताच हे अल्पवयीन पळ काढतात, मात्र पोलिसांनी या अल्पवयीन वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केल्यास त्यांच्या पालकांनाही कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे.
अखेर कुर्टीतील ‘ते’ ट्रक हटवले
कुर्टीतील आमिगोस हॉटेल तसेच येथील नेपाळी वस्तीलगतच्या रस्त्यावर अवजड वाहने पार्क करून ठेवण्याचे प्रकार वाढले होते. याप्रकरणी सातत्याने खांडेपार तसेच फोंड्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला होता. मात्र, हे परप्रांतीय वाहनचालक कुणाला जुमानत नसल्याने अखेर नागरिकांनीच त्यांना तंबी दिली. शेवटी पोलिसांनी दंडात्मक कारवाई करून ट्रकचालकांना हटवले.
"बेशिस्त आणि बेजबाबदारपणे वाहन हाकण्याचे प्रकार होत असल्यामुळे अपघातांत वाढ झाली आहे. शिस्तीने आणि व्यवस्थितरीत्या वाहन चालवल्यास अपघात रोखणे शक्य होणार आहे. शिवाय वाहतुकीचे सर्व नियम संबंधित वाहनचालकांनी पाळण्याची आवश्यकता आहे. असे झाले तर अपघातांना निश्चितच आळा बसेल."
- कृष्णा सिनारी, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग फोंडा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.