Pernem Road Issues पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 66 वरील तांबोसे, मोपा हा मुख्य सेवा रस्ता धोकादायक बनला आहे. रस्त्यावर शेकडो खड्डे पडल्याने खड्ड्यांतून रस्ता शोधावा लागत आहे. त्या निषेधार्थ काही युवकांनी या खड्ड्यांमध्ये मोठी वाहने जाऊ नये, त्यासाठी झाडे लावलेली आहेत.
शिवाय काही जण सरकारने याकडे लक्ष द्यावे,अशी मागणी करत आहेत. या रस्त्याला पूर्णपणे जबाबदार महामार्ग कंत्राटदार असल्याचे स्थानिकांनी सांगितले. नियोजनहीन कारभारामुळे लोकांना खड्ड्यांतून जावे लागते.
एका दुचाकीस्वाराने सांगितले, की आपल्याला आरोग्याचा त्रास आहे. आणि त्याही स्थितीत आपण दुचाकीवरून पेडणे शहरात ये जा करत असतो. तांबोसे परिसरात मोठमोठे खड्डे पडल्याने या खड्ड्यांत दुचाकी वाहन घातल्याशिवाय पुढे जाता येत नाही.
आणि त्याचा आपल्याला प्रचंड त्रास होतो. महादेव तांबोसकर यांनी सांगितले,की तांबोसे जंक्शन ते तोर्से हायस्कूलपर्यंत शिवाय उगवे येथील जे सेवा रस्ते सरकारने तयार केलेले आहेत. ते अत्यंत धोकादायक आहेत. तांबोसे मोप जंक्शनवर पूर्णपणे चिखल झालेला आहे.
या जंक्शनवर सिग्नल नसल्यामुळे व दुसऱ्या बाजूला संरक्षक भिंत नसल्यामुळे एखाद्या चालकाचा ताबा गेला, तर थेट घरामध्ये वाहने शिरून दुर्घटना घडू शकते.
शिवाय तांबोसे ते मोपा रस्त्यावर चिखल साचल्यामुळे तिथे दुचाकी चालवणे म्हणजे घसरून पडण्यासारखे आहे. त्यामुळे सरकारने तातडीने रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करावा.
अनेकांच्या घरात चिखलमय पाणी !
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून चिखलमय पाणी थेट लोकांच्या अंगणात, घरात जाते. तांबोसे येथे आसोलकर यांचे रस्त्यालगत घर आहे. रस्त्यावरचे पाणी थेट घरात शिरते.
परिणामी त्या घरमालकांनी मुख्य दरवाजाच बंद करून मागील दाराने ये जा सुरू केली आहे. या रस्त्याची स्थिती पाहिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खाते, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंते कसे दुर्लक्ष करतात,याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.