Goa News: कचरा व्यवस्थापन महामंडळाने पणजी-कांपाल येथील भगवान महावीर उद्यानात 'वेस्ट टू आर्ट पार्क' उभारण्याचा निर्णय घेत कामाची निविदाही काढली होती. परंतु त्याला विरोध झाल्याने प्रकल्पाचे स्थलांतर करण्याचा निर्णय महामंडळाने काल घेतला. जवळपास 9 कोटी रुपये खर्च करून हे पार्क आता करंजाळे येथील उद्यानात उभारण्यात येईल.
'भगवान महावीर उद्यानात महामंडळाने वेस्ट टू आर्ट पार्क उभारण्याचा निर्णय घेतला होता. पणजीत पर्यटकांची गर्दी होत असल्याने या पार्कला अनेकांनी भेट दिली असती, परंतु त्याला झालेला विरोध पाहता महामंडळाने तो स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
करंजाळे येथे उद्यान असून त्याठिकाणी हा प्रकल्प उभारला जाईल,’ अशी माहिती कचरा व्यवस्थापन मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दै. ‘गोमन्तक’ला दिली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या या पार्कसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या आणि त्यांना प्रतिसादही मिळाला.
मात्र, आता निविदाधारकांकडून घेतलेली बयाणा रक्कमही परत करण्यात येणार आहे. आता परत एकदा नव्याने निविदा मागविण्यात येणार आहे. तर सरकारी कार्यालयातील विविध प्रकारच्या भंगारात काढलेल्या वस्तूंचा वापर या पार्कसाठी केला जाणार आहे.
भ्रष्टाचाराचा आरोप
भगवान महावीर उद्यानातील ‘वेस्ट टू आर्ट पार्क’ या प्रकल्पावर प्रसिद्ध चित्रकार सुबोध केरकर यांनी टीका केली होती. त्याशिवाय विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी प्रकल्पात भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. क्युरेटर न नेमता कामाची निविदा काढल्याने त्यांनी सरकारच्या कामावर आक्षेप घेतला होता. त्याशिवाय या कामाची चौकशीची मागणीही आलेमाव यांनी केली होती.
बाबूश मोन्सेरात, मंत्री-
लोकांनी या प्रकल्पाविषयी तक्रारी व आक्षेप नोंदविले होते. त्याचा आम्ही आदर करतो. लोकांना हा प्रकल्प नको असल्यास तो स्थलांतर करण्याशिवाय पर्याय नाही. याची स्थलांतराची प्रक्रिया सुरू आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.