Politics of Goa: गेले काही दिवस धान्य चोरी प्रकरणावरून ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. याला प्रत्युत्तर देताना कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी आमदार सरदेसाई यांच्या आरोपांना खंडणीचा वास येत आहे, असा टोला लगावला आहे.
धान्य चोरीप्रकरणी आता तरी मुख्यमंत्री घोटाळेबाजांवर कारवाई करणार का? असा प्रश्न आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे. आज एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री गावडे यांनी सरदेसाई यांच्या वक्तव्याचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला.
ते म्हणाले की, ज्या झाडाला फळे लागतात, त्याच झाडाला दगड मारण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळेच गोव्याच्या कार्यक्षम प्रशासनावर सरदेसाई आरोप करत आहेत. आमदार सरदेसाई यांना आता स्वप्नातही गोविंद गावडेच दिसत आहेत.
सरदेसाई यांची ही तडफड सक्तीच्या खंडणी वसुलीकरिता आहे का? अशी शंका आता येते. त्यामुळे त्यांनी आपला उद्देश स्पष्ट करावा, म्हणजे त्याप्रमाणे नागरिक काय ते समजून जातील, असेही ते म्हणाले.
‘सरदेसाई रिकामटेकडे’
धान्य चोरी प्रकरणावर मी का बोलावे? कारण माझ्याकडे आता हे खाते नाही. तरीदेखील सरदेसाई हे माझ्या नावाचाच जप करताहेत. यापूर्वी माझ्याकडे हा विभाग होता. त्यामुळे माझा कारभार राज्यातील नागरिकांना चांगलाच माहीत आहे. आता सरदेसाई यांना काहीच काम नाही. त्यामुळे ते केवळ आणि केवळ टीका करत आहेत, असे कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे म्हणाले.
‘गावडे अजूनही शहाजहाँच्या काळात’
1970 मध्ये कला अकादमीची जी वास्तू 4 कोटी रुपयांत उभी केली, तिच्या दुरुस्तीवर 60 कोटी रुपये खर्चूनही ती व्यवस्थित होणार की नाही याची शाश्वती नाही.
अशा मंत्र्याचे मी कौतुक करावे? कोविड काळात सगळे भुकेकंगाल झालेले असताना 240 मेट्रिक टन तूरडाळ ज्याने कुजवली त्याचा मी सत्कार करावा असे जर गोविंद गावडे यांना वाटत असेल, तर ते अजूनही शहाजहाँच्या युगात वावरतात असे म्हणावे लागेल.
सत्ताधारी चुकत असतील, तर त्यांच्या चुका दाखवून देणे हे विरोधकांचे कर्तव्य आहे. जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यावर भाष्य करताना दुसरा कुणी खंडणीसाठी त्याचा वापर करतो असे म्हणणे जबाबदार मंत्र्यांना शोभत नाही, असे विजय सरदेसाई म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.