
पणजी: शहरात वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे टोंक येथील १२.५ एमएलडी आणि १५ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. मात्र, सद्यस्थितीत या प्रकल्पांवर प्रचंड ताण पडत असून, दररोज ९० ते १२० टँकरद्वारे अतिरिक्त सांडपाणी आणले जात आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अहवालानुसार, प्रक्रिया प्रकल्पांवर पडणाऱ्या अतिरिक्त भारामुळे अनेक वेळा पंप आणि उपकरणे बंद पडण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच, सिक्वेन्शियल बेच रिऍक्टर तंत्रज्ञानामुळे सूक्ष्मजीव मृत्युमुखी पडत आहेत. परिणामी अतिरिक्त फेस निर्माण होऊन परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता वाढत आहे. अतिरिक्त सांडपाण्याच्या वाहतुकीमुळे (Transportation) सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला जास्त ऑक्सिजन वापरावा लागत आहे. त्यामुळे पंप, डिफ्युझर आणि इतर उपकरणांचे आयुष्य कमी होण्याची भीती सार्वजनिक बांधकाम खात्याने व्यक्त केली आहे. एसएफसी एन्व्हायरोमेंटल टेक्नॉलॉजिसच्या अहवालानुसार, अन्न प्रक्रिया उद्योगांमधून येणारे सांडपाणी अत्याधिक सेंद्रिय पदार्थ आणि पोषक तत्त्वांनी भरलेले असते. टोंक येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प फक्त घरगुती सांडपाण्यासाठी आहे. त्यामुळे अन्नप्रक्रियाजन्य सांडपाणी, तेलकट पदार्थ, रासायनिक आणि औद्योगिक कचरा येथे सोडल्याने प्रक्रिया प्रणालीवर विपरित परिणाम होत आहे.
साबांखाने अहवालात टँकर कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. सध्या सांतइनेज नाल्यात सांडपाणी मिसळले जात असल्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. जर औद्योगिक आणि कॅसिनो टँकरवर नियंत्रण ठेवले नाही, तर पणजीतील जलस्रोत गंभीर संकटात सापडू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
हे टँकर वाहतूक प्रामुख्याने कॅसिनो (Casino), मोठी हॉटेल्स, औद्योगिक युनिट्स आणि व्यावसायिक संकुलांमधून येणाऱ्या घनकचऱ्याने भरलेले असतात. ज्यामुळे प्रक्रिया प्रकल्पावर अतिरिक्त भार पडत आहे. विशेष म्हणजे, हे प्रकल्प फक्त गृहसांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी तयार केले आहेत. त्यामुळे औद्योगिक सांडपाण्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया केली जात नाही, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने अहवालात स्पष्ट केले आहे.
या विषयावर महापौर रोहित मोन्सेरात म्हणाले की, ही गंभीर आणि धोकादायक स्थिती आहे. काही निकष पाळले जावेत, असे आम्हाला वाटते. या प्लांटमध्ये येणाऱ्या टँकर आणि ट्रकची आधीच चाचणी होणे गरजेचे आहे. कारण हा आरोग्यासंबंधी गंभीर मुद्दा आहे. या परिसरात राहणारे अनेक रहिवासी सतत तक्रारी करतात. त्यामुळे ही समस्या लवकर सोडविली पाहिजे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.