Goa Agriculture: राज्यात यंदा मान्सून सरासरीहून कमी पडला असला तरी शेतीच्या दृष्टीने तो समाधानकारक मानला जात आहे. त्यामुळे यंदाच्या शेती हंगामात चांगली लागवड अपेक्षित आहे. पावसाळा संपल्यानंतर पिकांची कापणी सुरू झाली आहे.
सध्या 50 ते 60 टक्के काम पूर्ण झाले असून नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत ते 100 टक्के पूर्ण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती कृषी खात्याचे संचालक नेव्हिल आल्फोन्सो यांनी दै. ‘गोमन्तक’ला दिली.
अतिवृष्टी किंवा अनावृष्टीचा लागवडीवर परिणाम होतो. परंतु यंदा सरासरीहून 10 टक्के पाऊस कमी पडला. हवामानात बदल झाल्याने अवकाळी पाऊस पडण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. यावर्षी ऑगस्टमध्ये पावसाने जणू सुट्टी घेतली होती, तर सप्टेंबरमध्ये जोरात हजेरी लावली.
दुष्काळाची परिस्थिती झाली असती तर लागवडीवर परिणाम होण्याची शक्ता होती. तसेच अतिवृष्टी होऊन पूरसदृशस्थिती देखील निर्माण न झाल्याचे हंगाम सुरळीतपणे पार पडला आहे, असे आल्फोन्सो यांनी स्पष्ट केले.
लागवडीत सासष्टी तालुका अव्वल
गोव्यात दोन प्रकारच्या पिकांची लागवड केली जाते, ते म्हणजे खरीप आणि रब्बी. खरीप पिकांचा हंगाम जून ते ऑक्टोबरदरम्यान असतो तर रब्बी पीक डिसेंबर ते एप्रिल. 2021-2022 वर्षात खरीप पिकांच्या लागवडीत सासष्टी तालुका अव्वल क्रमांकावर होता.
तसेच 2021-22 मध्ये रब्बीत देखील हाच तालुका प्रथम होता. गोव्यात खरीप पिकांची सरासरी लागवड 4224 किलो हेक्टर तर रब्बी पिकांची सरासरी लागवड 4384 किलो हेक्टर जमिनीत केली जाते.
रब्बी हंगामात चवळी, मूग, हळसांदे, शेंगदाणे आणि विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड केली जाते. तर, खरीप हंगामात भातशेती केली जाते.
"ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस सुरू होता. यावेळी जास्त पाऊस पडण्याची शक्य असते. परंतु यंदा परतीचा पाऊस देखील कमी पडला असल्याने समस्या निर्माण झाली नाही. काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने कापणीची प्रक्रिया वेळेत सुरू करता आली नाही. कारण कापणी करणारे मशीन मातीत अडकण्याचे प्रकार घडले."
- नेव्हिल आल्फोन्सो, कृषी संचालक
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.