
पणजी: पणजी शहराची सरकारने जी स्थिती केली आहे, ती अत्यंत वाईट आहे. जुगार, अमलीपदार्थ व वेश्याव्यवसाय येथे दिसून येतो. पणजीतील रात्रीचे जीवन हे भयानक झाले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विधानसभेत केली.
छपाई आण लेखन सामग्री, पर्यटन आणि माहिती तंत्रज्ञान या खात्यावरील मागण्यांना विरोध करण्यासाठी सुचवलेल्या कपात सुचनांना पाठिंबा देताना ते बोलत होते. राज्यात विदेशी पर्यटक घटण्यामागील कारण बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, कचऱ्याची समस्या कारणीभूत आहे.
इतर राज्ये देखील गोव्याशी पर्यटनात स्पर्धा करत आहेत आणि जर गोव्याला बदनाम करण्यासाठी चुकीची माहिती पसरवली जात असेल, तर राज्य सरकारने या परिस्थितीचा सामना करण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
ते म्हणाले, गोव्यात उच्च दर्जाचे पर्यटक आकर्षित करण्यात, तसेच पर्यटनाला चालना देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. पर्यटकांची संख्या का कमी होत आहे याचे सरकारने आत्मपरीक्षण करावे.
असुरक्षिततेमुळे गोव्यात येण्यास आता लोक घाबरतात. गोव्यात ज्येष्ठांवर हल्ले, महिलांवर बलात्काराचे प्रकार घडत आहेत. ज्या पद्धतीने पर्यटनास प्रोत्साहन दिले पाहिजे, तसे होत नाही. सोशल मीडिया इन्फ्युलन्सर पर्यटकांची संख्या कमी झाल्याचे दाखवून देत आहेत.
राज्यातील किनाऱ्यांवर ३१ मे पूर्वी शॅक्स बंद होऊ लागले आहेत. हे शॅक्स बंद होण्यामागे पर्यटकांची घटलेली संख्या हे कारण आहे. दाबोळीवरून मोपाला विमाने स्थलांतरित केली आहेत. त्यामुळे दक्षिण गोव्यातील पर्यटकांची संख्याही घटली आहे.
श्रीमंत पर्यटक राज्यात पर्यटन खाते आणू पाहात आहे, पण सरकार त्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे पर्यटनाशी संबंधित धोरण बदलावे, अशी मागणी व्यवसायिक करीत आहेत, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. इतर देशांप्रमाणे व्हिसा प्रक्रिया सुटसुटीत करावी, अशी सूचनाही युरी यांनी केली.
किनारी भागात मध्यरात्रीपर्यंत संगीत सुरू आहे, परंतु लग्न सोहळे रात्री दहा वाजेपर्यंत आटोक्यात आणावे लागतात याकडे लक्ष वेधत युरी म्हणाले, सर्वत्र पर्यटकांना कचरा दिसतो.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे २०१६ मध्ये विरोधी आमदार होते, तेव्हा त्यांनी किनारा स्वच्छतेवर स्वच्छता कंत्राटाविषयी सीबीआय चौकशीची अपेक्षा व्यक्त केली होती.
वर्षाला ९ कोटी रुपये खर्च केले जात होते, तेव्हा लोकायुक्तांनी या प्रकरणाची चौकशी केली जाईल असे सांगितले होते. त्यात १४ कोटींचा तोटा झाल्याचे दिसून आले होते.
आम्ही मागणी करूनही अजून लोकायुक्त नेमला नाही, कॅगनेही त्यावर बोट ठेवले आहे. किनारा स्वच्छतेसाठी कोणतेही नियोजन दिसत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.