

पणजी: सध्याच्या घडीला सरकार विरोधात जनतेच्या मनात निश्चितपणे रोष आहे, परंतु आज विरोधी पक्षांमध्येच एकी नाही. त्यामुळे जनतेत संभ्रम आहे. जर विरोधी पक्षांना सत्तेत यायचे असेल, तर त्यांनी १५ ऑगस्टपूर्वी युती आणि उमेदवार घोषित करणे गरजेचे असल्याचे मत राजकीय विश्लेषक ॲड. क्लियोफात कुतिन्हो यांनी व्यक्त केले. ‘गोमन्तक’ टीव्हीवरील संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
या चर्चेत राजकीय विश्लेषक मोहनदास लोलयेकर आणि रामा काणकोणकर यांनीही सहभाग घेतला होता. रामा काणकोणकर म्हणाले, विरोधक जर विचार करत असतील की, जनतेत सत्ताधारी पक्षाबाबत रोष आहे. त्यामुळे आम्ही जो उमेदवार देऊ तो जिंकून येईल, तर हा आत्मविश्वास धोक्याचा ठरेल. विरोधकांनी नागरिक भाजप विरोधातच मते मारतील हे गृहीत धरू नये. विरोधकांना सत्तेत यायचे असेल तर सर्वांनी एकत्रित येऊन लढण्याची गरज आहे.
‘...तर विरोधकांना नक्की यश’
भाजपला मागील विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के मते मिळाली, तर सर्व विरोधी पक्षांना ६७ टक्के मते मिळाली आहेत. आजच्या घडीला विरोधी बाकावर ७ आमदार आहेत. विद्यमान आमदारांना एकूण २१ आमदार निवडून आणण्यासाठी झटायला हवे. सर्व विरोधी आमदार एकत्रित युतीत निवडून येणे शक्य आहे, परंतु जर असे झाले नाही तर नागरिकच आपल्या मतदारसंघात कुणाला निवडून आणायचे हे ठरवतील, असे काणकोणकर यांनी सांगितले.
‘...तर फूट पाडणेही होईल कठीण’
आपचे गोवा प्रमुख वाल्मिकी नाईक आणि राष्ट्रीय नेते अरविंद केजरीवाल यांनी युतीसंबंधी अतिशय सकारात्मक भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही युती करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. युतीच्या अनुषंगाने आप, गोवा फॉरवर्ड यांना किती जागा द्यावात हे एकत्र बसून ठरविणे गरजेचे आहे. पुढील दोन महिन्यांत युती आणि उमेदवार कोण असणार हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. जर विरोधी पक्षांनी २२ हून अधिक आमदार निवडून आणले, तर आमदारांमध्ये फूट पाडणे कठीण होईल, असे मत ॲड. कुतिन्हो यांनी व्यक्त केले.
‘अहंकार बाजूला सारून एकत्र यावे’
आज जेवढे विरोधी पक्ष आहेत त्यांनी आपला अहंकार बाजुला सारून एकत्र यायला हवे. जनतेत हा संदेश जाणे जरूरीचे आहे की सर्व विरोधी पक्ष एक आहेत. अजून निवडणुकाच झालेल्या नसताना विरोधातील अनेक नेत्यांना मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पडत आहेत. पहिल्यांदा सत्तेत जाण्यासाठी आवश्यक आमदार कशा पद्धतीने निवडून आणता येतील त्याला प्राधान्य दिले पाहिजे. नाही म्हटले तरी कॉंग्रेसचे अस्तित्व सर्व मतदारसंघात आहे, परंतु कॉंग्रेसने इतर विरोधी पक्षांना एकत्र आणणे गरजेचे असल्याचे मत मोहनदास लोलयेकर यांनी व्यक्त केले.
‘सत्तेत जाण्यासाठीच निवडणूक लढवावी’
राष्ट्रीय स्तरावरचे राजकारण पाहिले, तर सक्षम विरोधक ही संकल्पना आज अस्तित्वातच नाही. काँग्रेस आणि इतर पक्ष हे मागील १५ वर्षांपासून सत्तेबाहेर आहेत. त्यामुळे यावेळी सक्षम विरोधक म्हणून नव्हे, तर सत्तेत जाण्यासाठीच निवडणूक लढणे गरजेचे आहे. काँग्रेससोबत युती करताना जर आपने १० जागा मागितल्या, तर तेवढ्या मिळणे अशक्य आहे. त्यामुळे प्रत्येक विरोधी पक्षाने आपली क्षमता ओळखणे आणि एकत्रित लढण्यासाठी काही वेळा त्याग करण्याची तयारी देखील ठेवणे गरजेचे असल्याचे मत मोहनदास लोलयेकर यांनी व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.