

पणजी: ऑक्टोबरमध्ये पावसाची उघडीप आणि वाढत्या उष्णतेने गोमंतकीयांची काहिली सुरू झाली आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हामुळे राज्यातील कमाल तापमानाने ३७.२ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला असून, उपलब्ध आकडेवारीनुसार ऑक्टोबर महिन्यातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान ठरले आहे.
सामान्य तापमानाच्या तुलनेत पारा तब्बल ५.३ अंशांनी वाढल्याने उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. पुढील दोन दिवसही तापमानाचा पारा ३५ ते ३६ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता असून, उष्ण आणि दमट वातावरणाच्या पार्श्वभूमीवर ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यापूर्वी २००८ मध्ये ऑक्टोबर महिन्यात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. यंदा मात्र तापमानाने हा आकडा ओलांडला आहे.
मान्सूनची उघडीप, कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव
ऑक्टोबर महिन्यात सामान्यतः मान्सूनचा प्रभाव जाणवत असल्याने उष्णतेची तीव्रता तुलनेने कमी असते. मात्र, यंदा मान्सूनने उघडीप घेतल्याने आणि पूर्वेकडून कोरडे वारे वाहत असल्याने तापमानात वाढ झाली आहे. त्यातच वातावरणातील आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवत आहे. गोव्यासह संपूर्ण कोकण पट्ट्यात उष्णतेची अशीच स्थिती असून, रत्नागिरीतही सर्वाधिक तापमानाची नोंद झाल्याचे गोवा वेधशाळेचे संचालक नहूष कुलकर्णी यांनी सांगितले.
दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यातील कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. सकाळी आणि दुपारच्या सुमारास उष्णतेच्या झळा अधिक तीव्रतेने जाणवण्याची शक्यता असून, दमट हवामानामुळे नागरिकांना अधिक त्रास होऊ शकतो.
राज्यात ऑक्टोबरमध्ये मान्सूनचा प्रभाव असल्याने उष्णतेची तीव्रता जाणवत नव्हती. मात्र, यंदा मान्सूनने उघडीप घेतल्याने, तसेच पूर्वेकडून वाहणारे कोरडे वारे आणि वातावरणातील आर्द्रता यांमुळे असह्य उष्णता जाणवत आहे. गोव्यासह कोकण पट्ट्यातही अशीच स्थिती असून, काल रत्नागिरीतही सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. नागरिकांनी वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घ्यावी.
- नहूष कुलकर्णी,
संचालक, गोवा वेधशाळा
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.