

पणजी: राज्यातील शांतता भंग करणाऱ्या आणि ध्वनिप्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांविरुद्ध गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आता आक्रमक पाऊल उचलले आहे. राज्यात ध्वनिप्रदूषण कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही आणि नियम मोडणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट आणि निर्वाणीचा इशारा मंडळाचे अध्यक्ष डॉ. लेविन्सन मार्टिन्स यांनी दिला. पर्यटनाच्या नावाखाली किंवा सण-उत्सवांच्या बहाण्याने मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणाऱ्यांवर आता मंडळाची 24 तास नजर असणार आहे.
डॉ. लेविन्सन मार्टिन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सप्टेंबर महिन्यापासून आतापर्यंत ध्वनिप्रदूषणप्रकरणी 36 जणांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून आतापर्यंत तब्बल 20 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून आगामी काळात ही मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ध्वनिप्रदूषणाच्या (Noise Pollution) तक्रारी वारंवार प्राप्त होतात, अशा राज्यातील 38 संवेदनशील ठिकाणांवर मंडळाने ऑनलाईन पद्धतीने 24 तास देखरेख सुरु केली आहे. या ठिकाणी आवाजाची ठराविक मर्यादा ओलांडली जाताच स्वयंचलित पद्धतीने यंत्रणा सक्रिय होते आणि कारवाईची प्रक्रिया सुरु केली जाते. त्यामुळे कोणालाही आता नियमातून पळवाट शोधता येणार नाही.
ध्वनिप्रदूषणाविरुद्धच्या या लढ्यात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगत डॉ. मार्टिन्स यांनी जनतेला आवाहन केले आहे. जर कोणालाही कुठे मर्यादेपेक्षा जास्त आवाज किंवा ध्वनिप्रदूषण होत असल्याचे आढळल्यास त्यांनी तात्काळ 8956487938 या हेल्पलाईन क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी. तक्रार प्राप्त होताच संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि स्थानिक पोलीस ठाण्याला ई-मेलद्वारे तातडीने माहिती पाठवली जाते. या माहितीच्या आधारे संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीने कारवाई करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.
केवळ नियम मोडणाऱ्यांवरच नाही, तर या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या किंवा कारवाईत दिरंगाई करणाऱ्या सरकारी यंत्रणांवर आणि अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित केली जाईल, असा सूचक इशाराही डॉ. मार्टिन्स यांनी दिला.
सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रम, विवाह समारंभ, मिरवणुका किंवा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाच्या नावाखाली ध्वनिप्रदूषण करणे कायद्याने गुन्हा आहे. कोणाच्याही आनंदाचा किंवा सोहळ्याचा त्रास इतरांना, विशेषतः वृद्ध आणि रुग्णांना होऊ नये, ही मंडळाची भूमिका आहे. गोव्याची (Goa) शांतता राखण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ आता कोणतीही तडजोड करणार नसल्याचे या कारवाईवरुन स्पष्ट होत आहे. या कडक भूमिकेमुळे ध्वनी मर्यादा पाळणाऱ्या आयोजकांचे धाबे दणाणले असून, सर्वसामान्यांनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.