पणजी, दीक्षांत सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. विद्यार्थ्यांनी यश मिळाल्यानंतरही नम्र रहावे, असे प्रतिपादन इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी केले. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम येथे आयोजित गोवा विद्यापीठाच्या ३५ व्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी राज्यपाल तथा कुलपती पी. एस. श्रीधरन पिल्लई, कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन, कुलसचिव प्रो. विष्णू नाडकर्णी व मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. एस. सोमनाथ यांना विद्यापीठाद्वारे डॉक्टरेट ऑफ सायन्स पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. एस. सोमनाथ पुढे म्हणाले, की मला लहानपणी डॉक्टर व्हायचे होते, परंतु आयुष्यात काहीवेळा वेगळे करावे लागते. त्यावेळी त्यात आवड निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासोबतच आपण जेथे काम करत असतो तेथे एक मार्गदर्शक किंवा गुरू शोधणे गरजेचे आहे. इस्त्रोमध्ये मला रामकृष्णन मार्गदर्शक लाभले, अन्यथा मी आज इस्त्रोत नसतो, मी एखादा नागरी सेवा अधिकारी बनून राहिलो असतो. आयुष्यात जबाबदाऱ्यांपासूनही कधी दूर पळू नका. जबाबदाऱ्या नव्या गोष्टी शिकवतात. दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा.
‘विद्यापीठाला मिळणार १०० कोटींचे अनुदान’
गोवा विद्यापीठ हे देशातील एक लहान विद्यापीठ आहे, परंतु विद्यापीठात नवनवीन प्रकल्प, अभ्यासक्रम राबविले जात आहेत. यंदा १६, ४९९ पदवी, १९०९ पदव्युत्तर पदवी (मास्टर्स), ५७ डिप्लोमा आणि ५६ पी.एडी धारकांचा दीक्षांत सोहळा होत आहे. गोवा विद्यापीठात गुरू हे संशोधन पार्क उभारण्यात येत आहे.
काही दिवसांत त्याचे उद्घाटन केले जाईल. विद्यापीठातील नव्याने रुजू झालेल्या प्राध्यापकांना संशोधनासाठी १ लाख रुपयांचे आर्थिक मदत करण्यात येते. विद्यापीठातर्फे ई-ऑफीस प्रणाली वापरण्यात येत आहे. येत्या फेब्रुवारी दरम्यान केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान योजनेंतर्गत १०० कोटींचे अनुदान मिळणार असून त्याद्वारे विद्यापीठातील साधनसुविधा, संशोधन सुधारासाठी वापरण्यात येणार असल्याचे कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन यांनी सांगितले.
ठळक मुद्दे
१) इस्त्रो अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांना विद्यापीठाकडून डॉक्टरेट ऑफ सायन्स पदवी प्रदान.
२) विद्यापीठातील रिक्त पदे भरण्यासंबंधी राज्यपालांकडून विद्यापीठाला सूचना.
३) विद्यापीठात लवकर गुरू संशोधन पार्कची उभारणी.
४) गोवा विद्यापीठात नव्याने रुजू झालेल्या प्राध्यापकांना संशोधनासाठी १ लाख रुपयाचे आर्थिक मदत.
५) विद्यापीठात ई-ऑफीस प्रणालीचा वापर
६) प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान योजने अंतर्गत मिळणाऱ्या १०० कोटी अनुदानातून साधनसुविधा सुधारणार.
विद्यापीठातील रिक्त पदे भरा ः राज्यपाल
गोवा विद्यापीठात गोमंतकीयांना प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे. गोवा विद्यापीठात अनेक अध्यासन विभाग असे आहेत की ज्यामध्ये अनेक पात्र प्राध्यापकांची कमतरता आहे. ही पदे विद्यापीठाद्वारे तात्काळ भरण्यात यावीत, असे कुलपती तथा राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले. आजच्या युगात नावीन्यपूर्ण विचारांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. डॉ. एस. सोमनाथ एका दुर्धर आजारातून जात आहेत, तरी देखील ज्या पद्धतीने ते कार्यरत आहेत तो त्यांचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे, असेही ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.