Mopa Airport: दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव मोपा विमानतळाला देण्याची मागणी जोर धरत आहे. या अनुषंगाने आज मधलामाज-मांद्रे येथील भाऊसाहेब बांदोडकर उद्यानात धरणे कार्यक्रमात ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी मगो पक्षाचे माजी आमदार परशुराम कोटकर यांनी आजारी अवस्थेत उपस्थित राहून नामांतरासाठी पाठिंबा दिला.
‘मोपा’ला बांदोडकर यांचे नाव देण्यासाठी आज अनेक मान्यवरांनी धरणे आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी विनायक च्यारी, माजी जि.पं. सदस्य श्रीधर मांजरेकर, अमृत अगरवाडेकर, जनार्दन ताम्हणकर, संजय बर्डे, दीप्तेश नाईक, उमेश तळावणेकर, मिलन वायगंणकर, तुषार टोपले, सुभाष केरकर यांची नामकरणास पाठिंबा दर्शवणारी भाषणे झाली. धरणे कार्यक्रमाचे निमंत्रक प्रा. गजानन मांद्रेकर यांनी प्रास्ताविक केले.
"कुळ व मुंडकार, कसेल त्याची जमीन, शैक्षणिक विकास यांसह अनेक मोठे प्रकल्प आदी भाऊमुळे शक्य झाले. मगो पक्षाचे नेते व मंत्री सुदिन ढवळीकर यांनी पेडणेवासीयांच्या मागणीचा आदर करून भाऊंच्या नावासाठी आग्रह धरावा. अन्यथा सरकारातून ताबडतोब बाहेर पडावे. त्यांनी बेगडी प्रेम दाखवू नये."
-परशुराम कोटकर, माजी आमदार
"हिंदवी स्वराज स्थापनेच्या कार्यात छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण होते, तसेच गोवा राज्याच्या जडणघडणीत पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या नावाचा विसर पडू नये, असे व्यक्तिमत्त्व आहे. या नामकरणासाठी पंचायतींसह आदींनी ठराव घ्यावा. पुढील वर्षी भाऊसाहेबांच्या महानिर्वाणास 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय विमानतळ व स्मृतिनिमित्त भव्यदिव्य कार्यक्रम करण्यासाठी सहभागी होऊया."
- रमाकांत खलप, माजी मंत्री
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.