Ponda : कुळेतील जगप्रसिद्ध दूधसागर धबधब्यावर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या फारच मोठी असून पावसाळ्यात या धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक जीवाचा आटापिटा करून दूधसागर गाठतात.
मात्र, यंदा सांगेतील मैनापी धबधब्यावर दोघाजणांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर सरकारने वन खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व धबधब्यांवर जाण्यास पर्यटक व स्थानिकांना बंदी घातली. या बंदीची इतर राज्यातून दूधसागर धबधब्यावर येणाऱ्यांना कल्पना नसल्याने सध्या गोंधळ उडाला आहे.
विशेष म्हणजे दूधसागर धबधब्यावर पर्यटकांसाठी ट्रेकिंग यंदा सुरू केले नसल्याने पर्यटक मिळेल त्या वाटेने दूधसागर गाठण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचा फायदा रेल्वेचे काही कर्मचारी उठवत असून काही लोकांच्या मध्यस्थीने चिरीमिरी घेऊन या पर्यटकांना सोडण्याचे प्रकारही घडत असल्याने कुळे पोलिस व रेल्वे पोलिसांनी त्याची दखल घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
इतर राज्यातून येणारे पर्यटक कुळे पोलिस स्थानकावर उतरण्याऐवजी दूधसागरपासून दोन किलोमीटर आधीच रेल्वे ट्रॅकवर उतरतात आणि चालत येतात. वास्तविक अशाप्रकारे उतरणे हा गुन्हा असून त्याची दखल दोन रेल्वे व वन खात्याने घेतली होती.
रेल्वे पोलिसांनी अशा ‘घुसखोर’ पर्यटकांना उठाबशा काढायला लावल्या होत्या. समज देऊन या लोकांना परत पाठवले असले तरी अजूनही बाहेरील राज्यातील पर्यटकांना दूधसागरवरील बंदी माहीत नसल्याने पर्यटकांचे तांडे दूधसागरकडे रवाना होत असल्याचे रेल्वेतील प्रवाशांवरून स्पष्ट होत आहे.
‘ट्रेकिंग’ला पसंती
वास्तविक राज्य सरकारने दूधसागर धबधब्यावरील अंदाधुंदी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. दरवर्षी सुरू होणारे ट्रेकिंग यंदा सुरू करण्यास परवानगी दिली नसल्याने कुळेतील टूर ऑपरेटर्स, गाईड तसेच हॉटेल व इतर व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे राज्य सरकारने दूधसागरवरील पर्यटन अधिक सुरक्षित आणि सुटसुटीत करण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.