Goa Politics: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांच्या पणजीतील सभेला राज्य सरकारातील मंत्री व आमदारांची उपस्थिती होती. यामध्ये सर्वात चर्चेचा विषय ठरला तो मंत्री आणि आमदारांनी परिधान केलेला संघाचा गणवेश.
पणजीतील बांदोडकर फुटबॉल मैदानावर सायंकाळी भागवत यांची सभा पार पडली. त्या सभेसाठी भाजपच्या सर्व आमदारांसह मंत्र्यांनाही निमंत्रण होते.
त्यामुळे सर्वांनी उपस्थिती लावली. त्यात लक्ष वेधले ते मंत्री विश्वजीत राणे संघाच्या पेहरावामध्ये होते. त्याशिवाय त्यांच्या पत्नी आमदार डॉ. दिव्या राणेही होत्या.
त्याचबरोबर संघाच्या गणवेशात आलेल्यांमध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत, खासदार श्रीपाद नाईक, सभापती रमेश तवडकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, माजी खासदार नरेंद्र सावईकर, खासदार विनय तेंडुलकर, आमदार चंद्रकांत शेट्ये, आमदार दाजी साळकर यांचा समावेश होता.
ही सर्व मंडळी खाकी गडद रंगाची पॅंट, पांढरा सदरा आणि काळी टोपी, अशा पेहराव्यात असल्याने ते लक्ष वेधत होते.
दरम्यान, कांपाल येथील बांदोडकर मैदानावर झालेल्या सभेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
शनिवार सुट्टीचा दिवस असला तरी पणजीतील बांदोडकर मार्गावर वाहनांची मोठी गर्दी होती. सभास्थळी येणाऱ्या लोकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था कांपाल मैदानावर करण्यात आली होती.
काही मिनिटांत ‘पोस्ट’
संघाच्या पेहरावामध्ये असलेल्या आमदारांनी आपापल्या समाजमाध्यमांतील अकाउंटवरून छायाचित्रे कशी झळकतील याचे पक्के नियोजन केले होते. संघाच्या राजमार्गावरून पुढे मोठ्या पदापर्यंत जाणाऱ्या अनेक नेत्यांचे उदाहरण समोर असल्यामुळे अनेक नेत्यांनी हा पेहराव केल्याचे दिसून आले.
ढवळीकर शपथबद्ध
या सभेला मगोपचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर उपस्थित होते. त्यांनी संघाचा पेहराव केला नसला तरी ते विश्वजीत राणे यांच्या रांगेत बसलेले होते. त्याशिवाय संघाच्या स्वयंसेवकांना जी शपथ दिली जाते, ती शपथ ढवळीकर यांनीही घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.