ऑनलाईन सेवा आल्या म्हणून दुकानदार रस्त्यावर उतरले होते का? व्यावसायिक स्पर्धेत तंत्रज्ञान गरजेचेच

Goa Taxi Operator Protest: ‘ॲप’चा वापर जनसामान्यांसाठी सोयीचा; टॅक्सीचालकांच्या आंदोलनावर मान्यवरांनी मांडली मते
Goa Taxi Operator Protest: ‘ॲप’चा वापर जनसामान्यांसाठी सोयीचा; टॅक्सीचालकांच्या आंदोलनावर मान्यवरांनी मांडली मते
App Based Taxi ServiceCanva
Published on
Updated on

Goa Taxi Issue|Goa Taxi Driver Problem

पणजी: राज्यात टॅक्सीचालकांच्या आंदोलनावर अजूनही तोडगा निघालेला नाही; परंतु या आंदोलनाकडे मान्यवरांचा पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट आहे. ॲमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन वस्तू विक्री ॲप सुरू झाल्याने लोकांना वस्तू खरेदी करणे सोयीचे झाले म्हणून दुकानदार रस्त्यावर उतरले काय? असा सवालही मान्यवरांनी टॅक्सीचालकांच्या आंदोलनावरून उपस्थित केला आहे. तंत्रज्ञानाची गरज आहे आणि ते स्वीकारणे महत्त्वाचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांच्या मागण्यांवर सोमवारी सरकार तोडगा काढण्याची शक्यता आहे. शुक्रवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या टॅक्सी व्यावसायिकांच्या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही.

Goa Taxi Operator Protest: ‘ॲप’चा वापर जनसामान्यांसाठी सोयीचा; टॅक्सीचालकांच्या आंदोलनावर मान्यवरांनी मांडली मते
Goa Taxi Driver Protest: राज्याबाहेरील टॅक्सी सेवेत आणि स्थानिक मात्र आंदोलनात! होतोय तिसऱ्याचाच लाभ

टॅक्सी व्यावसायिकांनी मुख्यमंत्र्यांबरोबरील बैठकीत आपला असंतोषही व्यक्त केला, त्यामुळे सव्वा ते दीड तास चर्चा करूनही त्यावर काही तोडगा निघण्याची शक्यता नसल्याने मुख्यमंत्री तेथून बाहेर पडले. आता सोमवारी ११.३० वाजता बैठक घेण्याचे निश्‍चित झाल्याने त्यावर सरकारची भूमिका काय राहणार आहे, हे समजून येईल. या सर्व पार्श्‍वभूमीवर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून या आंदोलनाविषयी ‘गोमन्तक’ने मते जाणून घेतली.

टॅक्सीचालकांचे दर सहा महिन्यांनी आंदोलन सुरू होते, त्याचा परिणाम पर्यटकांच्या मानसिकतेवर होतो. त्यामुळे राज्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलतो. सरकारने आता यावर कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. त्याशिवाय अशा आंदोलनात राजकारण्यांचा समावेश होता कामा नये. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट असे वस्तू विक्री करणारे ॲप आले, अजूनही येत आहेत म्हणून दुकानदार रस्त्यावर आलेत का? टॅक्सीचालकांनी खरेतर तंत्रज्ञानाला जोडले गेले पाहिजे आणि सरकारने राज्याची होणारी बदनामी थांबविली पाहिजे.

मनोज काकुलो, उद्योजक

टॅक्सीचालक खऱ्या अर्थाने सामान्यांना पिळतात. त्यांनी खरेतर मीटरप्रमाणे जे भाडे होईल ते आकारायला हवे. अव्वाच्या सव्वा दर सांगतात आणि दिवसातून एक किंवा दोन फेऱ्या मारतात. खरेतर त्यांनी आता स्पर्धेत टिकण्यासाठी जादा फेऱ्या मारण्याची मानसिकता तयार करायला हवी. नवे तंत्रज्ञान स्वीकारायला हवे. आज ना उद्या राज्यात ओला-उबेरसारख्या टॅक्सी सेवा येऊ शकतात, त्यामुळे अशा आव्हानांना तोंड देण्याची त्यांनी तयारी ठेवली पाहिजे.

मुरारी तपस्वी, नागरिक

राज्यातील टॅक्सीचालक पर्यटकांकडून जे भाडे घेतात, ते विमानसेवेपेक्षाही अधिक असते. टॅक्सीचालकांच्या मतांचा विचार न करता सरकारने त्यांची एकाधिकारशाही मोडीत काढावी. तंत्रज्ञान स्वीकारावे आणि स्पर्धेत उतरावेच लागेल, असे त्यांना ठणकावून सांगावे. देशातील अनेक शहरांत ओला-उबेरसारख्या सेवा आहेत, त्या गोव्यात आलेल्या नाहीत म्हणून तरी बरे. सरकारने गोवा माईल्सला सहकार्य केले, त्यामुळे कमीतकमी दरात ती सेवा पर्यटकांना मिळत आहे आणि तिला विरोध करणे चुकीचे आहे.

धनंजय जोग, नागरिक, पणजी

देशभरात सर्वत्र ॲपबेस टॅक्सी सेवा आहेत. टॅक्सी आंदोलन हे चुकीच्या पद्धतीचे आहे. अशी आंदोलने पर्यटनासाठी चांगली नाहीत. राज्यात स्विगी, झोमॅटोसारख्या सुविधा आल्या म्हणून लहान हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट बंद झाली का, तेही व्यवसाय करीत आहेत ना? टॅक्सीचालकांनी सरकारने केलेल्या आवाहनानुसार आपला स्वतःचा ॲप आणायला हवा. आंदोलनामुळे पर्यटकांनी जर गोव्याकडे पाठ फिरविली तर नुकसान राज्याबरोबर टॅक्सीचालकांचेही होणार आहे.

नीलेश शहा, चेअरमन, ट्रॅव्हल्स ॲण्ड ट्युरिझम असोसिएशन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com