...तर राज्यात कोरोनाच्‍या चौथ्या लाटेची शक्‍यता

डॉ. राजेंद्र बोरकर : लसीकरणासाठी तातडीने पुढे या, ज्येष्ठांनी बुस्‍टर डोस घेणेही आवश्‍यक
corona wave in goa
corona wave in goaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोव्‍यात कोरोनाची तिसरी लाट अधिक उत्‍पात न घडविता संपली. कोरोनाचा ओमिक्रॉन बीए-2 हा विषाणू आता तिसऱ्या लाटेत सापडला. तो वेगाने पसरतो, पण हानी करत नाही. लोकांनी योग्‍य ती काळजी घेतली नाही तर जूनमध्ये कोरोनाची चौथी लाट येऊ शकते, असा इशारा राज्‍याचे कोरोना लसीकरणप्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिला. तर, राज्‍य सरकार व आरोग्‍य खात्‍याच्‍या वतीने लसीकरणाची आवश्‍यक ती सर्व यंत्रणा सज्ज आहे. पण लोक गाफील आहेत.

अनेकांनी तर लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. यापूर्वीच्‍या तीन लाटांचा विचार करता, जूनमध्ये चौथ्या लाटेला सुरूवात होऊ शकते, अशी भीती साथीरोगतज्‍ज्ञ डॉ. उत्‍कर्ष बेतोडकर यांनी व्‍यक्‍त केली. गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात ते बोलत होते. त्‍यात लसीकरण विभागाचे डॉ. प्रशांत सूर्यवंशीही सहभागी झाले होते. संपादक-संचालक राजू नायक यांच्‍याशी उपस्‍थित पाहुण्यांची कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर विविध पैलूंवर चर्चा झाली.

आरोग्‍य खात्‍याने 16 जानेवारी 2021 मध्ये लसीकरणास सुरूवात केली. लसीकरणापूर्वी राज्‍यात एकूण 762 लोकांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. तर, लसीकरण सुरू झाल्‍यानंतर 3070 लोकांचा मृत्‍यू झाला. यातील महत्त्वाची बाब म्‍हणजे 3070 मृतांपैकी 2016 लोकांनी कोरोनाची लसच घेतली नव्‍हती. अन्‍य मृत्‍यूंना केवळ कोरोना कारणीभूत नव्‍हता तर त्‍या रुग्‍णांना इतरही दुर्धर आजार आधीपासूनच होते, अशी माहिती डॉ. सूर्यवंशी यांनी दिली.

यापूर्वी राज्‍यात कोरोना चाचणीची यंत्रणा नव्‍हती. पुणे येथील प्रयोगशाळेवर आपण अवलंबून होतो. देशातील अनेक ठिकाणांहून त्‍यांच्‍याकडे सँपल्‍स येत असल्‍याने त्‍यांच्‍यावरील कामाचा ताण वाढला होता. परिणामी चाचणी अहवाल मिळायला वेळ लागत होता. आता आरोग्‍य खात्‍याकडे स्‍वतःची चाचणी प्रयोगशाळा आहे. यामुळे अहवाल झटपट मिळू लागतील व विषाणूचे गांभीर्य लवकर समजेल. सध्या ओमिक्रॉन बीए-2 जगभरात आढळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्‍याची आरोग्य यंत्रणा सज्ज असल्‍याचे डॉ. बेतोडकर यांनी सांगितले.

अधिकाधिक लोकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा यासाठी आरोग्‍य खाते सर्वोतोपरी प्रयत्‍न करत आहे. लसीकरणासाठी दहा लोक एकत्र आल्‍यास त्‍यांच्‍या घरी किंवा कामाच्‍या ठिकाणीही आम्‍ही लसीकरण करू शकतो. पण लोक दहाच्‍या पटीत असणे आवश्‍यक आहे. कारण दहा लसींचे एक पॅकेट असते. ते संपले नाहीत तर मग शिल्लक राहतात. अशाने बाहेर काढलेले डोस खराब होतात. डोस वाया जाऊ नयेत किंवा खराब होऊ नयेत यासाठी आम्‍ही ही दक्षता घेत असल्‍याचे डॉ. बोरकर यांनी सांगितले. कोरोनाच्‍या पहिल्‍या डोसमुळे लोकांची 50 टक्‍के रोगप्रतिकारशक्‍ती वाढली, दुसऱ्या डोसमुळे 75 टक्‍के वाढली तर बुस्‍टर डोस घेतल्‍यास 90 टक्‍क्‍यांपर्यंत वाढेल. यासाठी दोन डोस घेऊन नऊ महिने झालेल्‍या लोकांनी बुस्‍टर डोस घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्‍यांनी केले.

corona wave in goa
धारबांदोड्यात दुचाकीचा भीषण अपघात, तिघे जखमी

कोरोनाची भीती संपली या गैरसमजुतीतून लोकांनी लसीकरणाकडे पाठ फिरविली आहे. राज्‍याकडे लसींचा मुबलक साठा आहे. आता भीती नसली तरीही लोकांनी लसीकरणासाठी पुढे यावे. ओमिक्रॉन बीए-2 चे बाधीत वाढले तर लसीकरणासाठी पुन्‍हा गर्दी होईल. अशी गर्दी होऊ नये तसेच प्रशासनावर ताण येऊ नये यासाठी लोकांनी आतापासूनच सजग व्‍हायला हवे. यासाठी लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. कारण गाव पातळीवर, तालुका पातळीवर लसीकरण मोहीम राबवून एकाचवेळी अनेक लोकांचे लसीकरण होईल आणि संभाव्‍य ओमिक्रॉन बीए-2 ला रोखता येईल, असे आवाहन यावेळी उपस्‍थित डॉक्‍टरांनी केले.

corona wave in goa
लैंगिक छळप्रकरणी आयकरच्या दोन निरीक्षकांना सशर्त जामीन

लोक कोरोना संपल्‍यासारखे वागत आहेत. तसेच सर्व व्‍यवहार सुरू केल्‍याने बहुतांश ठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे. कोरोनाच्‍या तिसऱ्या लाटेने फारसे नुकसान केले नसले तरी चौथी लाट नुकसान करणार नाही, असेही सांगता येत नाही. ओमिक्रॉन बीए-2 मुळे जीवितहानी होण्याची शक्‍यता कमी असली तरी रुग्‍णसंख्या वाढल्‍यास यापूर्वीचीच परिस्‍थिती पाहावी लागेल, असा इशारा यावेळी डॉक्‍टरांनी दिला. सक्‍तीचे नसले तरी गर्दीच्‍या ठिकाणी नागरिकांनी मास्‍क वापरावे. तसेच शक्‍य असेल त्‍याठिकाणी सामाजिक अंतर राखावे, असे आवाहनही त्‍यांनी केले.

राज्‍यात 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू आहे. तसेच वय वर्षे 61 वरील व्‍यक्‍तीस बुस्‍टर डोस देण्यात येत आहे. पोलिस, अग्‍निशामक दल, पंचायतीराज, कोराेनायोद्धा म्हणून काम केलेल्‍या सरकारी खात्‍यांतील अधिकारी, कर्मचारी आणि सहभागी लोकांना मोफत बुस्‍टर डोस दिला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com