Goa Tourism : ...तर गोव्याला बसणार तब्बल पाचशे कोटींचा फटका

ई-व्‍हिसा बंदचा परिणाम; ब्रिटिश पर्यटक नाराज, बुकिंग होतेय रद्द
Foreign Tourists
Foreign TouristsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourism : भारत सरकारने ब्रिटिश पर्यटकांसाठी पूर्वीची ई-व्हिसा सुविधा बंद केल्याने देशात ब्रिटिश पर्यटक येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा थेट परिणाम गोव्याच्या पर्यटन आणि आदरतिथ्य उद्योगांवर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ब्रिटिशांनी गोव्याकडे पाठ फिरविली तर 400 ते 500 कोटींचा फटका गोवा राज्याला बसणार आहे. त्‍याचप्रमाणे रशियन चार्टर विमानही रद्द झाले आहे. एकूणच राज्यासाठी हा दुहेरी धक्‍का मानला जात आहे.

कोरोना संकटाच्या पूर्वीच्या आकडेवारीनुसार गोव्यात प्रतिवर्ष 40 ते 50 हजार ब्रिटिश पर्यटक येत असून ते दरडोई सरासरी 98 हजार रुपये खर्च करतात. ही एकूण उलाढाल 400 ते 500 कोटींच्या घरात जात असल्याची माहिती आहे. यूकेतून भारतात येणाऱ्या पर्यटकांना ई-व्हिसा पद्धत बंद करून आता व्हिसा केंद्रात जाऊन प्रत्यक्ष व्हिसा घेण्याची सक्ती केली आहे. यामुळे भारतात येणाऱ्या ब्रिटिश पर्यटकांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्याचा विपरित परिणाम राज्यातील हॉटेल्स व इतर पर्यटन उद्योगावर झाला आहे.

यापूर्वी ज्या पर्यटकांनी आपली गोव्याची सफर बुक केली होती, त्यांनी लागलीच बुकिंग रद्द करणे सुरू केले आहे. दररोज सरासरी प्रत्येक हॉटेलमध्ये सात ते आठ बुकिंग रद्द होत आहेत. कोरोनामुळे जाम झालेला गोव्यातील आदरतिथ्य उद्योग या नव्या बदलामुळे पुर्णतः हादरून गेला आहे. गोव्यात सर्वात जास्त पर्यटक रशियातून येत असतात. त्यापाठोपाठ ब्रिटिश पर्यटक येत असतात. रशिया-युक्रेन युद्धामुळे गोव्यात येणारा रशियन पर्यटक याआधीच कमी झाला होता. आता ब्रिटिश पर्यटकही या नव्या धोरणामुळे राज्यात अल्प प्रमाणात येतील. या पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी ट्विटद्वारे, ‘यावर तोडगा काढण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना तोडगा काढण्याची विनंती करूया’, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना आवाहन केले आहे. ब्रिटिश पर्यटकांवर गोव्यातील लहान आणि मध्यम हॉटेल्स चालकांचा व्यवसाय चालतो. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना या आपत्तीतूनबाहेर काढण्यासाठी आम्ही आमचा राजकिय अहंकार बाजूला ठेवून एकत्र येऊया, असे सरदेसाई यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Foreign Tourists
Chikungunya Spread in Goa : गोव्यात चिकुनगुनियाच्या रुग्णांत मोठी वाढ

‘आझुर एअरलाईन्स’कडून बुकिंग रद्द

रशियातील सर्वात मोठी चार्टर विमान कंपनी असलेल्या ‘आझुर एअरलाईन्स’ने ऑक्टोबरमधील आपली सर्व बुकिंग रद्द केली आहेत. गोवा विमानतळ प्राधिकरणाचे संचालक धनंजय राव यांनी सांगितले, की पहिले चार्टर विमान 13 ऑक्टोबरला दाबोळी विमानतळावर उतरणार होते. मात्र, तत्पूर्वी मंगळवारी या कंपनीने बुक केलेले स्लॉटस् रद्द केले. ही विमाने का रद्द केली आहेत, याचे कोणतेही कारण दिलेले नाही. मात्र, कझाकिस्‍तानमधून ‘स्काट एअरलाईन्स’चे चार्टर विमान 19 ऑक्टोबरला गोव्यात येणार, असे ते म्हणाले.

केंद्र सरकारकडून तोडगा अपेक्षित

1 पर्यटन उद्योगाशी एसकेएएल संघटनेचे गोवा विभागाचे अध्यक्ष शेखर दिवाडकर यांनी ‘गोव्यात अजूनही अनेक हॉटेल्स बंद अवस्थेत ठेवण्यात आली आहेत. या हंगामात चांगला व्यवसाय होईल, या अपेक्षेने आता ते ती उघडायच्या प्रतीक्षेत होती. मात्र, या नव्या व्हिसा धोरणामुळे हा देखील हंगाम त्यांच्या हातचा जाईल’, अशी भीती व्यक्त केली.

2 टुर्स अँड ट्रॅव्हल्स असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष नीलेश शहा म्हणाले, युकेच्या पर्यटकांना ई-व्हिसाची सोय करावी, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली होती. मुख्यमंत्री, पर्यटन मंत्र्यांना तशी पत्रेही पाठविली होती. त्यांनी हा विषय केंद्राकडेही नेला होता. पण कदाचित दोन्ही बाजूंनी व्यवस्थित विषय न हाताळल्याने ही मागणी मान्य झाली नाही, असे वाटते.

अडचण काय?

नवीन व्हिसा पद्धतीमुळे ब्रिटिश पर्यटकांना भारतात प्रवास करण्यासाठी युकेत असलेल्या 9 व्हिसा केंद्रांपैकी एका केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन व्हिसा घ्यावा लागतो. या सर्व केंद्रांतील प्रतीक्षा यादी नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत बुक असल्याने पर्यटकांना भारतीय व्हिसा लवकर मिळणे शक्य होत नाही.

दरम्यान या संदर्भात पंतप्रधान मोदींकडे जाऊन तत्काळ तोडगा काढण्याची गरज आहे. ब्रिटिश पर्यटकामुळे राज्याला प्रतिवर्ष 40 ते 50 कोटी जीएसटी कर मिळतो. ब्रिटिश पर्यटक गोव्यात येण्याचे बंद झाल्यास राज्याला या करावर पाणी सोडावे लागेल. मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्‍न तत्काळ केंद्राकडे मांडण्याची गरज आहे, असं आमदार विजय सरदेसाईंनी म्हटलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com