
पणजी: कांदा खरेदी घोटाळाप्रकरणी चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने गोवा राज्य मार्केटिंग व सप्लाय फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक काशिनाथ नाईक यांना निलंबित केले. मार्केटिंग फेडरेशनविरोधात नाशिक पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
गेल्या वर्षी नाशिक नाफेड कार्यालयाकडून अत्यंत कमी दरात कांद्याची खरेदी करून तोच कांदा जादा दराने बाजारात विक्री करीत गोवा फेडरेशनने तब्बल ५ कोटी ५६ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात गोवा फेडरेशनविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘नाफेड’चे जयंत रमाकांत कारेकर यांनी याविषयी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे, की ऑक्टोबर २०२४ ते डिसेंबर २०२४ यादरम्यान संशयित नाईक यांनी गोवा फेडरेशनच्या माध्यमातून नाशिक नाफेड कार्यालयाकडून जिल्ह्यातील फेडरेशन व वेगवेगळ्या ‘एफपीसी’कडून पुरवठा केलेला १,५८३.१७८ टन कांदा अवघ्या ३५ रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केला.
मात्र, गोवा फेडरेशनने हा अल्पदरात खरेदी केलेला कांदा स्वत:च्या फायद्यासाठी चढ्या दराने बाजारात विक्री करीत ५ कोटी ५६ लाख २१ हजार १६० रुपयांचा स्वत:चा फायदा केला.
प्रत्यक्षात सदरील कांदा गोवा फेडरेशनचे ‘नाफेड’च्या योजनेनुसार सामान्य जनतेला उपलब्ध करून देणे गरजेचे होते. परंतु तसे न करता गोवा फेडरेशनने नाफेड आणि सामान्य जनतेचीही फसवणूक करीत साडेपाच कोटी रुपयांचा अपहार केला आहे.
ही बाब उघडकीस आल्याने यासंदर्भात मुंबई नाका पोलिसांत गोवा फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक नाईक यांच्याविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाकामी गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
दरम्यान, नाफेड व एनसीसीएफने खरेदी केलेला कांदा गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात आदी राज्यांमध्ये पाठवण्याची योजना होती. मात्र, खोटी वाहतूक कागदपत्रे तयार करून कांद्याचा खोटा पुरवठा दाखवण्यात आला, असा आरोप केला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.