Mopa Airport: मोपा विमानतळाला कुणाचे नाव द्यावे यावरून राज्यात दोन गट निर्माण झाले आहेत. त्यातच आता सरकारी शाळांना स्वातंत्र्यसैनिकांची नावे देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. पण बहुतांश गावात शाळा एक आणि स्वातंत्र्यसैनिक अनेक, अशी उदाहरणे आहेत. त्यामुळे नावे द्यायची कोणाची?, यावरून एक नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
गोवा मुक्तिच्या हिरक महोत्सवानिमित्त राज्यातील सरकारी शाळांना गोवा मुक्तिलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांची नावे देण्याचा प्रस्ताव सरकारने पुढे आणला आहे. प्रत्येक शाळेच्या पालक शिक्षक समितीने नावाची शिफारस करावी, असे परिपत्रक शिक्षण खात्याने जारी केले आहे.
यावर ज्येष्ठ पत्रकार संदेश प्रभुदेसाई म्हणाले, ‘हा निर्णय स्तुत्य असला तरी तो व्यवहार्य ठरणार का?, याबाबत साशंकता आहे. अनेक गावांत या नामकरणावरून वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.’
प्रभुदेसाई हे काणकोण येथील असून त्यांचे आई आणि वडील या दोघांनीही गोवा मुक्त लढ्यात आपले योगदान दिलेले आहे. या काणकोण गावाने सर्वात जास्तपान स्वातंत्र्यसैनिक गोवा मुक्तिलढ्याला दिले आहेत.
येथे किमान 30 ते 40 स्वातंत्र्यसैनिकांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. यापैकी कोणाचे नाव शाळेला द्यावे, यावरून नक्कीच वाद निर्माण होऊ शकतो. हा निर्णय सरकारसाठी तापदायक ठरण्याची शक्यता आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
निर्णय स्वागतार्ह, पण..
स्वातंत्र्यसैनिक पुत्र डॉ. मुकुल रायतुरकर म्हणाले, की स्वातंत्र्यसैनिकांची नावे शाळांना देण्यात काहीच हरकत नाही. पण त्यांनी जो समाजवादाचा पुरस्कार केला होता आणि गोव्याला त्या विचाराने दिशा देण्याचा प्रयत्न केला होता.
त्यांचे काय? हा विचार समाजात आणि प्रशासनात रुजावा यासाठी काही प्रयत्न होणार का? हे महत्त्वाचे आहे. तर ‘हा निर्णय स्वागतार्ह आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यसैनिकांच्या कामाची ओळख होईल.
मात्र, अशी नावे देताना ख्रिस्ती समाजातील स्वातंत्र्यसैनिकांनी जे कार्य केले त्यांचाही विसर पडता कामा नये’, अशी प्रतिक्रिया मडगाव येथील 18 जून क्रांती समिती अध्यक्ष अविनाश शिरोडकर यांनी दिली.
पूर्वीपासूनच मतभेद
यापूर्वी काणकोण पालिका उद्यानात भारतकार हेगडे देसाई यांचा पुतळा स्थापन करावा, असा ठराव घेण्यात आला होता. मात्र, काही स्थानिकांनी त्याला विरोध करताना अन्य स्वातंत्र्यसैनिकांचा पुतळा का नको? असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे नंतर हा प्रस्तावच बारगळला.
जर हेगडे देसाई यांच्यासारख्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकाच्या नावाला विरोध होतो तर अन्य नावांच्या बाबतीत काय होऊ शकते? अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी भूमिगत काम केले असून त्यांच्या नावाची नोंदणी नाही. अशांवर तो अन्याय होईल, असे प्रभुदेसाई म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.