Digambar Kamat दिगंबर कामत हे जरी सत्ताधारी पक्षात असले तरी सरकारात त्यांच्या शब्दाला पूर्वीसारखे वजन राहिलेले नाही, हे मडगाव पालिका नोकर भरतीच्या प्रकरणावरून स्पष्ट झाले आहे.
मडगाव पालिकेने हाती घेतलेली ही नोकर भरती नगरविकास मंत्र्यांनी बंद पाडल्याने नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांच्यासह कित्येक नगरसेवक नाराज आहेत.
आमची नगरपालिका खरेच सत्ताधारी पक्षाची आहे का? असा नगराध्यक्ष शिराेडकर यांनी जाहीररीत्या विचारलेला प्रश्न, मडगावची राजकीय परिस्थिती विषद करण्यासाठी पुरेसा म्हणावा लागेल.
मडगावच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, दिगंबर कामत यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर मडगावच्या कित्येक समस्यांवर ताेडगा काढला जाईल, अशी मतदारांची अपेक्षा होती. मात्र, मागच्या एका वर्षाचा आढावा घेतल्यास असे काहीही झालेले दिसून येत नाही.
उलट मडगावातील समस्या अधिकच बिकट झाल्या आहेत, असे वाटते. कचऱ्याच्या समस्येवर मडगाव पालिकेला प्रभावी तोडगा काढण्यात अपयश आल्याने पालिकेवर मडगावचा कचरा साळगाव आणि काकोड्याला पाठविण्याची वेळ आली आहे.
मडगावची शान असलेल्या नगरपालिका इमारतीवर लक्ष टाकले तर मडगावची अवस्था सध्या काय झाली आहे, हे कळण्यास वेळ लागत नाही, अशी प्रतिक्रिया मडगावातील सामाजिक प्रश्र्नावर भाष्य करणारे विवेक नाईक यांनी व्यक्त केली.
मडगावच्या मानाने मुरगावात काही प्रमाणात नाराजी कमी आहे, अशी माहिती तेथील नागरिकांनी दिली. संकल्प आमोणकर हे सत्ताधारी पक्षात गेल्यावर त्यांना चांगले पद मिळेल अशी अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांना होती.
मात्र, आमोणकर यांना ते मिळाले नाही. असे जरी असले तरी सत्ताधारी पक्षात असल्याचा फायदा घेत त्यांनी आपल्या मतदारसंघात काही प्रमाणात विकासकामे चालू ठेवल्याने त्यांना नाराजीचा दाह कमी सोसावा लागतो.
असे जरी असले तरी मुरगाव मतदारसंघातील कोळशाचे प्रदूषण आमदार झाल्यानंतर कमी करणार, हे आश्र्वासन आमोणकर यांनी दिले होते. त्या आघाडीवर ते सपशेल अपयशी ठरले आहेत.
याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना कोळसा प्रदूषणविरोधी चळवळीतील नेते शंकर पोळजी यांनी सांगितले, आमोणकर यांनी कोळसा प्रदूषण कमी करणार हे आश्वासन देऊन निवडणूक लढविली होती. पण ते सत्ताधारी पक्षात गेल्यानंतर मुरगावातील प्रदूषण कमी होण्याऐवजी ते अधिकच वाढले आहे.
नुवेचे मतदार असलेले राजकीय विश्लेषक आणि माजी आमदार ॲड. राधाराव ग्रासियस यांनी यासंबंधी प्रतिक्रिया व्यक्त करताना, सिक्वेरा यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना स्वत: फायदा काय झाला, हे मला माहीत नाही. मात्र, मतदारसंघाला काडीचाही फायदा झाला नाही हे दिसून येते, असे सांगितले.
इतरांना हा चांगला धडा
सत्ताधारी पक्षात गेल्यानंतर मोठमोठी पदे मिळतात आणि विकासकामे जोमाने होतात, असा जो आमदारांमध्ये भ्रम हाेता, तो निश्चितच दूर झाला असेल.
जेव्हा राजकीय गरज नसते तेव्हा सत्ताधारी पक्षाजवळ गेल्यास त्याचा काहीही फायदा होत नाही व सत्ताधारी पक्षावर विश्वास ठेवणे किती धोकादायक असते, याचा धडा इतर आमदारांना मिळाला असेल, असे मत माजी आमदार राधाराव ग्रासियस यांनी व्यक्त केले.
नुवेतील मतदार नाराज
नुवे मतदारसंघ हा मुख्यत: भाजपविरोधी असल्याने त्यांचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी काँग्रेस साेडून भाजपात प्रवेश केल्याने सामान्य लोक प्रचंड नाराज आहेत. त्यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर ही नाराजी दूर होईल, अशी अपेक्षा होती.
पण त्यांना अजूनही मंत्रिपद मिळालेले नाही. या परिस्थितीत सिक्वेरा यांनी काँग्रेस पक्ष का सोडला आणि त्याचा त्यांना काय फायदा झाला, हा प्रश्र्न नुवेतील मतदार विचारत आहेत.
काँग्रेस सोडून भाजप पक्षात प्रवेश केल्यामुळे मला कुठलीही खंत वाटत नाही. वरून आनंद होतोय. याचे कारण म्हणजे सत्ताधारी पक्षात असल्याने मी मुरगाव मतदारसंघात बऱ्यापैकी विकासकामे राबवू शकलाे.
मी माझ्या जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली होती ती पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. मुरगाव मतदारसंघात प्रदूषण वाढले, या आरोपातही तथ्य नाही.
- संकल्प आमोणकर, आमदार, मुरगाव
मागच्या एक वर्षात मडगावात कुठलाही बदल झालेला नाही. एक वर्षांपूर्वी जे मडगाव होते, ते त्याच समस्यांसह तसेच आहे. मडगावातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे.
पार्किंग समस्येवर प्रभावी तोडगा न काढल्यामुळे शहरात मिळेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली दिसते. - शर्मद रायतूरकर, भाजप नेते
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.