Goa Tourism: सरत्या 2023 ला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात देशोदेशीचे पर्यटक दाखल झाले आहेत.
त्याचसोबत सध्या गोव्यात पर्यटन हंगाम सुरु झाल्याने पर्यटकांसाठी खास आकर्षण असलेल्या गोव्यातील बिचेसवर (Goa Beach) यंग ब्रिगेडसह आबालवृद्धांची गर्दी झालेली पाहायला मिळतेय.
येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी दृष्टी मरीन तर्फे बीचवर जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. काही अतिउत्साही पर्यटकांमुळे तसेच समुद्राचा अंदाज न आल्याने काही दुर्घटना घडल्या असून मागील काही दिवसात जीवरक्षकांनी केलेली अनमोल कामगिरी समोर आली आहे.
यंदाच्या पर्यटन हंगामात तेरा जणांना बुडण्यापासून वाचवण्यात जीवरक्षकांना यश आल्याची माहिती मिळाली आहे. तसेच सहा बेपत्ता मुलांचा शोध लावण्यात जीवरक्षकांना यश आलं आहे.
वागतोर येथे घडलेल्या दुर्घटनेत पाण्यात खेळणाऱ्या तीन लहान मुलांना समुद्राच्या खोल भागातून रेस्क्यू करण्यात दृष्टी सागरी जीवरक्षकांना यश आलंय.
तर मोरजी बीचवर गस्त घालणाऱ्या जीवरक्षकांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याने समुद्रात बुडणाऱ्या गुजरातमधील दोन अतिउत्साही युवकांना वाचवण्याचे धाडसी काम जीवरक्षकांनी केलंय.
पाळोळे समुद्रात कयाकिंग करताना झालेल्या अपघातात एका जोडप्याला तर काब दे रामा समुद्रात भरकटलेल्या कर्नाटकातील दोघा तरुणांना वाचवण्यात जीवरक्षकांनी अथक प्रयत्न केले आहेत.
याकामी अनुक्रमे सचिन किर्लोस्कर सत्यवान वेळीप आणि शांता वेळीप यांनी महत्वाची कामगिरी बजावलीय. तसेच बागा आणि हणजूण किनाऱ्यावर घडलेल्या घटनांमध्येही जीवरक्षकांनी महत्वाची कामगिरी केलीय.
दोन्ही किनाऱ्यांवर मद्यपान करून खोल समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना वाचवण्यात जीवरक्षकांना यश आलंय.
तसेच पाण्यात पडल्याने अस्वस्थ झालेल्या आणि ज्यांना वैद्यकीय उपचाराची गरज आहे अशा परिस्थितीतील पर्यटकांना सुयोग्य उपचार मिळावेत यासाठी जीवरक्षकांनी जवळच्या आरोग्य केंद्रात नेत त्यांचे जीव वाचवले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.