Goa Marathi Film Festival: गोवा मराठी चित्रपट महोत्सवात कोणते खास सिनेमे पहाल? कोणत्या कलाकारांना भेटाल? वाचा माहिती..

Goa Marathi Film Festival: विन्सन वर्ल्ड' आयोजित गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन पणजी येथील आयनॉक्स सिनेगृहात सकाळी 10.30 वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे.
Goa Marathi Film Festival
Goa Marathi Film FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

विन्सन वर्ल्ड' आयोजित गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन पणजी येथील आयनॉक्स सिनेगृहात सकाळी 10.30 वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘कृतज्ञता सन्मान’ प्रदान करण्यात येईल. डॉ. आगाशे यांनी केवळ मराठी रंगभूमी व चित्रसृष्टीतच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, सई मांजरेकर, सुबोध भावे, रोहिणी हट्टंगडी, उपेंद्र लिमये, अजिंक्य देव, प्रसाद ओक, मृणाल कुलकर्णी, छाया कदम, किशोर कदम, जितेंद्र जोशी, गजेंद्र अहिरे, वैभव मांगले, भुषण प्रधान, गौरी इंगवले, राजेश्वरी सचदेव, शिवाली परब, नंदिनी चिकटे, अशोक समर्थ, शीतल समर्थ, पार्थ भालेराव, रोहित माने तसेच इतर नामवंत कलाकार व दिग्दर्शक या महोत्सवात उपस्थित असतील.

एप्रिल मे ९९

१९९९ चा उन्हाळा. कोकणातल्या एका शांत गावात राहणारे तीन जिवलग मित्र- कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश मे महिन्याच्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्याच्या तयारीत असतात. मजा, मस्ती, क्रिकेट, आणि समुद्राच्या कुशीत हरवलेलं बालपण… पण जेव्हा पुण्याहून जाई नावाची एक मुलगी गावात येते तेव्हा हे सर्व अचानक बदलते. मैत्रीतले ताण, पहिले प्रेम आणि स्वतःला शोधण्याचा प्रवास यांची सुरुवात होते. ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट आहे नात्यांमधल्या बदलत्या छटा, भावनिक गुंतवणूक, आणि यौवनाच्या उंबरठ्यावरची गोंधळलेली मनःस्थिती यांचा. हा चित्रपट म्हणजे एका पिढीच्या आठवणींना उजाळा देणारी, गोडसर, हळवी आणि नॉस्टॅल्जिक सफर आहे.

जारण

चाळीशीतली आयटी प्रोफेशनल, राधा, पुण्यात एकटी राहते. नवरा परदेशात आणि मनात जुन्या अपघाताचे घाव. तिचं समुपदेशन चालू असतानाच कोकणातल्या आईवडिलांचा फोन येतो. वाडा पाडण्यापूर्वी छोटं गेट-टुगेदर ठेवलंय. राधा आपल्या मुलीला, सईला घेऊन बालपणाच्या वाड्याकडे निघते. त्या वाड्यात लपलेलं आहे एक गूढ... गंगूचा शाप. वाड्यात परतल्यावर राधा अडगळीच्या खोलीत लहानपणीची बाहुली शोधते, जिचा वापर गंगूने जारणासाठी केला होता. ती बाहुली पुण्यात आणल्यानंतर, राधाच्या आयुष्यात एक भीतीदायक, अंधश्रद्धा आणि वास्तवाच्या सीमारेषेवरचा काळ सुरू होतो. गंगूचा शाप अजूनही जिवंत आहे का? ही गोष्ट आहे मन, भूतकाळ आणि अज्ञात भय यांच्या संघर्षाची – "जारण".

स्थळ

ग्रामीण भारतातील पार्श्वभूमीवर घडणारा स्थळ हा चित्रपट सविताच्या प्रवासावर आधारित आहे. ती शिक्षण आणि चांगल्या भविष्याचे स्वप्न पाहणारी एक महत्त्वाकांक्षी तरुणी आहे. पण तिच्या आकांक्षा तिच्या पारंपारिक समुदायाच्या कठोर अपेक्षांशी भिडतात. तिचे शेतकरी पालक तिचे लग्न लावण्यासाठी प्रयत्न करतात आणि सविता लग्नाच्या चक्रात अडकते - जिथे तिचे मूल्य बुद्धिमत्ता किंवा महत्त्वाकांक्षेपेक्षा सौंदर्य, हुंडा आणि शिस्त यावरून मोजले जाते.

मुलीचे लग्न हेच तिची ओळख आणि अस्तित्व निश्चित करते अशा जगात, तिला ठरवावे लागते की स्वतःसाठी जगायचे की इतरांसाठी...  

आता थांबायचं नाय

‘आता थांबायचं नाय' हा गजबजलेल्या मुंबईतील सत्यकथेवर आधारित प्रेरणादायी चित्रपट आहे. ४० ते ५० वयोगटातील मध्यमवयीन बीएमसी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी वयाच्या या टप्प्यावर रात्रशाळेत परत जाऊन दहावीच्या परीक्षेला बसण्याचा एक असामान्य आणि अशक्य पर्याय निवडला आहे. शारीरिकदृष्ट्या कठीण नोकऱ्या, घरगुती जबाबदाऱ्या आणि सामाजिक उपहास याचा सतत त्रास सहन करत ते स्वप्न पाहण्याचे धाडस करतात. शिक्षण व्यवस्थेलाच नव्हे तर वय, वर्ग आणि महत्त्वाकांक्षेबद्दल खोलवर रुजलेल्या रूढींनाही ते आव्हान देतात. साध्या शैक्षणिक प्रयत्नातून सुरू होणारी गोष्ट स्वाभिमानाची एक शक्तिशाली कृती बनते जी सिद्ध करते की 'आता थांबायचे नाय'…. म्हणजेच अजून उशीर झालेला नाही.

घात

‘घात’ एक अनुभव आहे. या चित्रपटाची कथा, त्याचे चित्रण, त्यातील प्रत्येक पात्रे सगळं इतकं खोलवर जाऊन बसतं की, प्रेक्षकांना स्वतः त्याच जंगलात, त्याच परिस्थितीत असल्यासारखं वाटतं. माओवादी बंडखोरांनी घेरलेल्या जंगलात उलगडणारी ही कथा, प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण करते. ज्यात सामान्य नागरिक, पोलिस आणि बंडखोर यांच्यातील तणावपूर्ण संघर्ष आहे. विशेष म्हणजे, विदर्भाच्या दुर्गम भागात शूट करण्यात आलेला हा चित्रपट, विदर्भातील कलाकारांच्या अभिनयामुळे अधिकच खास बनला आहे. ‘घात’ हा केवळ एक मनोरंजन नाही, तर एक प्रेरणादायी चित्रपट आहे. 

सुशीला सुजीत

सुशीला सुजीत ही कथा एका अनपेक्षित परिस्थितीभोवती फिरते जी दोन अनोळखी व्यक्तींना- एक विवाहित महिला आणि एक प्लंबर- काही तासांसाठी एकत्र आणते. एके दिवशी त्यांच्या बाथरूमचा गळणारा शॉवर आणि बेडरूमचा नादुरूस्त लॉक दुरुस्त करण्यासाठी रमाकांत सुजीत नावाच्या प्लंबरला फोन करून कामावर निघून जातो. सुजीतचे काम सुरू असताना अचानक आलेल्या वाऱ्याच्या झुळूकीने बेडरूमचा दरवाजा बंद होतो आणि सुशीला आणि सुजीत आत बंद होतात. त्यांचे मोबाईल फोन आणि इंटरकॉम दुसऱ्या खोलीत असल्याने, ते मदतीसाठी कॉलही करू शकत नाहीत. ३६ व्या मजल्यावर अडकलेले, खाली कोणालाही इशारा करण्याचा कोणताही मार्ग नसताना दोघांनाही एका विचित्र आणि अनपेक्षित परिस्थितीतून एकत्र जावे लागते.

घरत गणपती 

नातेसंबंधातील प्रेम, गोडवा आपल्या सणांच्या माध्यमांतून अधिक दृढ होत असतो. मायेने आणि आपलेपणाने माणसं जोडणाऱ्या घरत कुटुंबातील ‘श्री गणराया’च्या आगमनाच्या वेळी घडणारी गोष्ट चित्रपटात पहायला मिळणार आहे. कोकणात घडणारा हा चित्रपट घरत कुटुंबाच्या गौरी गणपतीचे स्वागत करण्याची वार्षिक परंपरा दाखवतो. तीन पिढ्यात चाललेली ही प्रचलित प्रथा पिढ्यांमधील फरकांना दूर करून आणि त्यांचे बंध मजबूत करून कुटुंबाला कशी जवळ आणते यावर प्रकाश टाकतो. शहरातील चालीरीती, संयुक्त कुटुंबाच्या चालीरीती आणि गैरसमजुतीमुळे होणार गोंधळ, विनोद यावर घरत गणपती टिप्पणी करतो आणि त्यातूनच आपली माणसे शोधतो. 

कुर्ला ते वेंगुर्ला

कालौघात सर्वच क्षेत्रांत आमूलाग्र बदल झाले आहेत. तंत्रज्ञान, दळणवळण, आर्थिक स्थिती, शिक्षण क्षेत्रात झालेल्या बदलांसह नव्या पिढीच्या आशा-आकांक्षाही बदलल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील युवा पिढीच्या मानसिकतेचा वेध घेणारी एका लग्नाची रंजक गोष्ट ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या चित्रपटातून उलगडणार आहे. गेल्या काही वर्षांत गावातील मुलांचे लग्न जमणे ही एक समस्याच बनली आहे. याच गोष्टीचा वेध घेत हा चित्रपट अतिशय वेगळ्या पद्धतीने हाताळण्यात आला आहे. आजच्या काळातील मुला-मुलींच्या आकांक्षा, त्यांच्या पालकांची इच्छा-अपेक्षा, गाव आणि शहरातील स्थिती असे मुद्दे मनोरंजक पद्धतीने दाखवण्यात आले आहेत.

Goa Marathi Film Festival
Marathi Films: महाराष्ट्रात, गोव्यात मराठी भाषेतील चित्रपट का चालू शकत नाहीत?

सिनेमॅन

’सिनेमॅन’च्या अनोख्या कथानकाचा प्रवास हा या चित्रपटाच्या नावाप्रमाणेच आकर्षक आहे. चित्रपटात, चित्रपटाचा नायक शिक्षण क्षेत्रातून निवृत्ती घेऊन ‘चिल्ड्रेन फिल्म क्लब’चा (सीएफसी) सदस्य होतो.तो लहान मुलांकरिता योग्य असलेले चित्रपट दाखवण्यासाठी फार लांबचा पल्ला गाठत असतो. लहान मुलांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून त्यांना अगदी जग जिंकल्यासारखे वाटते. गावागावांत चित्रपट घेऊन जाणार्‍या सामान्य माणसाची कहाणी म्हणजेच ’सिनेमॅन.’ आधुनिक काळात चित्रपट पाहण्याचे बदललेले स्वरुप आणि त्याचे मुलांवर होणारे बरे-वाईट परिणाम यांवर चित्रपटात प्रभावी भाष्य करण्यात आले आहे.  

Goa Marathi Film Festival
National Film Awards Winners List: 71 व्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा; 'ट्वेल्थ फेल' सर्वोत्तम चित्रपट, 'नाळ-2'चाही यथोचित सन्मान

गुलकंद

गुलकंदचे किमान दहा आरोग्यदायी फायदे आहेत पण हा चित्रपट ११ व्या फायद्याबद्दल आहे आणि कदाचित सर्वात कमी लेखला गेलेला- तो म्हणजे आनंद. गुलकंद ही एक गोड, सुगंधित आणि आनंददायी कथा आहे जी ती संपल्यानंतरही बराच काळ टिकते.

हा चित्रपट प्रेमाचा शोध घेतो- बहरलेल्या तारुण्यात नाही तर त्याच्या दुसऱ्या डावात. जेव्हा तरुण प्रेमी एकत्र येतात, तेव्हा जग अनेकदा त्यांना वेगळे करण्याचा कट रचते पण जेव्हा वयस्कर प्रेमी पुन्हा एकत्र येतात तेव्हा काय होते? गुलकंद विसरलेली स्वप्ने, अपूर्ण संभाषणे आणि पुन्हा जागृत झालेल्या संबंधांच्या शांत सौंदर्याचा उलगडा करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com